Saturday, 2 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



vकेंद्र शासनाचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसंच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जाहीर

vकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासह सर्वसामान्यांसाठी विविध घोषणा

vहा निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची प्रतिक्रिया 

vपाचव्या महाॲग्रो  राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला औरंगाबाद इथं प्रारंभ

आणि 

vपालघरला काल दिवसभरात भूकंपाचे सहा धक्के

****



 शेतकरी, असंघटीत कामगार, लघु आणि मध्यम उद्योजक तसंच वैयक्तिक करदात्यांसाठी अनेक लाभदायी तरतुदी असलेला अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारनं प्रस्तावित केलेल्या तरतुदी याप्रमाणे...



छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ दोन हेक्टरपर्यंतच्या जमीनधारक १२ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे तीन टप्प्यांमध्ये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मत्स्य व्यवसाय विकास विभाग स्थापन केला जाईल, पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत व्याजदरात दोन टक्के सूट मिळेल, तर संकटग्रस्त शेतकऱ्यांना व्याजदरात पाच टक्के सूट मिळेल.



 असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृत्ती वेतन मिळेल. यासाठी २९ वर्ष वय असलेल्या कामगारांना दरमहा १०० रुपये जमा करावे लागतील, तर १८व्या वर्षी ह्या योजनेत सहभागी होणाऱ्यांना दरमहा केवळ ५५ रुपये भरावे लागतील. केंद्र सरकारही तितकीच रक्कम दरमहा आपल्या योगदानाच्या स्वरुपात जमा करणार आहे.



 याशिवाय वैयक्तिक आयकर दात्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केलं आहे. भविष्य निर्वाह निधी, काही विशिष्ट बचत योजना आणि विमा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचं साडे सहा लाख रुपयांपर्यंतचं निव्वळ उत्पन्नही करमुक्त केलं आहे. प्रमाणित वजावटीची मर्यादा १० हजार  रुपयांनी वाढवून ५० हजार रुपये करण्यात आली आहे. बँक आणि टपाल कार्यालयातल्या ठेवींवर आता १० हजार रुपयांऐवजी ४० हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर आयकर आकारणी होणार नाही. घरभाड्यावरील वजावटीत वाढ करण्यात आली असून, ही मर्यादा एक लाख ८० हजार रुपयांवरुन दोन लाख ४० हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. याशिवाय दुसऱ्या घरांसाठी काल्पनिक भाड्यावर द्यावा लागणारा आयकरही समाप्त करण्यात आला आहे.



 छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात दोन टक्के सूट देण्यात आली असून, ९० टक्के व्यापारी वस्तू सेवा कर विवरण पत्रं दर तीन महिन्यांनी सादर करू शकणार आहेत.



 या प्रमुख तरतुदींसोबतच, भटके विमुक्त विकासासाठी कल्याण मंडळ, गोवंश विकासासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोग, पुढच्या महिन्यापर्यंत देशातल्या प्रत्येक घराचं विद्युतीकरण, आगामी पाच वर्षांत एक लाख खेड्यांचं डिजिटायझेशन, ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाख रुपयांवरून ३० लाख रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ, भविष्य निर्वाह निधी अंतर्गत मृत्यू विम्याची रक्कम अडीच लाख रुपयांवरून सहा लाख रुपये, आदी तरतुदींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे.



 संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे तीन लाख कोटी रुपये करण्यात आली असून, शिक्षण, आरोग्य, बालविकास, रेल्वे, अनुसूचित जाती जमाती विकास, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, आदी विभागांसाठीची तरतूदही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.



 पुढच्या दहा वर्षांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, भौतिक सुविधा, डिजिटल भारत, प्रदुषण मुक्त भारत, ग्रामोद्योग विकास, स्वच्छ नद्या आणि पेयजल, मानवी अंतराळ मोहीम, किनारपट्टी आणि जलमार्गांचा पूर्ण वापर, अन्न धान्य क्षेत्रात स्वयंपूर्णता, सुदृढ भारत, आणि किमान शासन कमाल प्रशासन, या द्वारे भारतीय अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन डॉलरची बनवण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.

****



 या ऐतिहासिक अंतरिम अर्थसंकल्पातून सरकारनं देश बळकट करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं असून, लोकसभा निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाची ही नांदी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांचा विकास सुनिश्चित केल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली तर या अर्थसंकल्पामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी बळ मिळेल, असं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यक्त केलं.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा अर्थसंकल्प, देशातला सर्वसामान्य माणूस हाच केंद्र बिंदू मानून, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या, प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच असल्याचं म्हटलं आहे.

****



 दरम्यान, हा अर्थसंकल्प भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. मतं मिळवण्यासाठीच्या या अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि युवकांचे मुद्दे डावलल्याचं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तर या अर्थसंकल्पातून गरीबांना काहीही फायदा होणार नसल्याची टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 



 काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी जाहीर घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, मात्र मध्यम वर्गीयांसाठी केलेल्या घोषणांची त्यांनी प्रशंसा केली.



 केंद्र सरकारचा कार्यकाळ फक्त तीन महिनेच शिल्लक असताना, अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या घोषणा केल्या, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते के करुणाकरन यांनी म्हटलं आहे.

****



 शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची घोषणा म्हणजेच एका दिवसाला फक्त सतरा रुपये मदत ही शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. काल संध्याकाळी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अर्थसंकल्पात रोजगार आणि शेती हे विषय हेतुपुरस्पर सामील केल्याचं मत, सर्व नेत्यांनी व्यक्त केल्याचं ते म्हणाले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत सोमवारी आपण निवडणूक आयोगाशी संपर्क साधणार असल्याचं ते म्हणाले.

****



 अर्थसंकल्पातल्या तरतुदी निराशाजनक असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद इथं, वार्ताहरांशी बोलताना आंबेडकर यांनी, न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच, राममंदीर बांधण्याची तारीख निश्चित करणं हे असंवैधानिक असल्याचं म्हटलं. सामाजिक शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न निष्फळ करण्यासाठी, शांतता मोर्चे काढणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.  

****



 जलयुक्त शिवार योजना आणि पाण्याचा काटकसरीनं वापर यातूनच, मराठवाड्यातला दुष्काळ संपवता येईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित पाचव्या महा ॲग्रो या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले.....



गटशेतीचा प्रयोग नेहमी फायदेशीर आहे. आणि सरकारणं त्याला मदत करायचं, प्रोत्साहान करायचं, त्याला अनूदान देण्याचं धोरण स्विकारलं आणि म्हणून दुष्काळ संपवायचा असेल तर जलयुक्त शिवारातून, पाणी साठवण्यातून, पाणी अडविण्यातून,  ते जपूण वापरण्यातूनचं होऊ शकत.

****



 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या आडत हमालीतून सरकारनं शेतकऱ्यांची मुक्तता केली असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला असल्याचं बागडे यांनी सांगितलं,



 यावेळी, पद्मश्री भंवरलाल जैन प्रयोगशील शेतकरी पुरस्कार एकूण १२ शेती गट आणि शेतकरी कंपन्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या चार दिवसीय प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित २०० कंपन्यांचे स्टॉल, पीक प्रात्याक्षिकासह चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत.

****



 जालना इथं आजपासून तीन दिवसीय अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाला सुरूवात होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे  शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचं वाटप ही या प्रदर्शनात केलं जाणार आहे.

****



 पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी आणि आसपासच्या परिसरात काल भूकंपाचे सहा धक्के बसले. सकाळी सात ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार पूर्णांक एक रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के बसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भूकंपाच्या या धक्क्यांदरम्यान, भीतीने घराबाहेर पळताना, एका दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.

****



 बीड जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात  आला असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. परळी तालुक्यातल्या तळेगाव इथल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ आणि पांगरी इथल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

 हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं आयोजित संत नामदेव मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याची काल सांगता झाली, राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं नरसी इथं दाखल झाले होते.

****



 सातवं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पळसप इथं आयोजित करण्यात आलं आहे. ग्रामीण कथाकार ललिता गादगे या संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत. लातूरच्या वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि पळसपच्या किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

*****

***

No comments: