Tuesday, 19 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९  फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरता युती करण्याचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा निर्णय

Ø लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला २५ तर शिवसेनेला २३ जागा; विधानसभेसाठी मित्र पक्षांच्या वगळून उर्वरित जागांचं समान वाटप होणार

Ø काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराला उद्या नांदेडमधून सुरुवात

Ø मराठवाडा आणि विदर्भात उद्या आणि परवा वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज 

आणि

Ø सोलापूर-तुळजापूर मार्गावरच्या मोटार अपघातात सात जणांचा मृत्यू

****



 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक युती करून लढण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं काल घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत युतीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष २५ आणि शिवसेना २३ जागा लढवणार आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागा दोन्ही पक्षांमध्ये समान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.  तत्पूर्वी या दोन पक्षांमध्ये युती करण्यासंदर्भात एक बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला.



 शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारधारेचे असल्याचं, तसंच ही युती व्हावी, ही जनतेची इच्छा असल्याचं नमूद करत व्यापक हितासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा करताना सांगितलं.



 नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची भूमिका मान्य असून, आता हा प्रकल्प स्थानिक जनतेला मान्य असलेल्या ठिकाणी उभारण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आपापसातले समज -गैरसमज दूर झाल्याचं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना - भाजप एकत्र आले तर महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मजबूत राज्य बनेल, असं ते म्हणाले.



 शिवसेना हा भाजपचा सर्वात जुन्या मित्रपक्षांपैकी एक असल्याचं सांगत, सगळे मतभेद विसरत ही युती झाल्यानं आपल्याला अतिशय आनंद झाल्याचं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले. ही युती कमीत कमी पंचेचाळीस जागा जिंकेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

****



 भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप भारतानं केला आहे. पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले जाधव यांच्या खटल्याची कालपासून हेग इथल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढे जाहीर सुनावणी सुरु झाली. यावेळी भारताची बाजू मांडताना माजी महा न्याय अभिकर्ता हरीश साळवे यांनी कोणत्याही वकीलाच्या हस्तक्षेपाशिवाय जाधव यांना अटक करणं बेकायदेशीर घोषित केलं पाहिजे, असं सांगितलं.

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत काल दोन दहशतवादी मारले गेले. पिंगलीना भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलानं या भागात शोध मोहीम सुरु केली होती. त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हे अतिरेकी मारले गेले. या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आलं, तर एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात, १४ तारखेला पुलवामा इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी, काल मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

****



 शिक्षण क्षेत्राचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी या क्षेत्रात काळानुरुप बदल होणं आवश्यक असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसंच कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्यांना व्यासपीठ मिळावं, येणाऱ्या काळात विद्यार्थी रोगमुक्त आणि सुरक्षित असावा यासाठी तावडे यांनी काल मुंबईत बारा स्वयंसेवी संस्थाबरोबर सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी नवकल्पनांचं मूल्यमापन करणं आणि त्या कल्पनांचं विश्लेषण करणं महत्त्वपूर्ण असून, विविध जिल्ह्यांमध्ये नवप्रकल्पांची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं तावडे म्हणाले.

****



 निवडणूक आयोगानं पध्दतशीर मतदार जनजागृती आणि मतदार सहभाग मोहीम हाती घेतली असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल वार्ताहरांना दिली. यामध्ये मतदारांसाठी माहिती आणि पडताळणी कार्यक्रम राबवला जाणार असून मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करुन घेण्यासाठी एक नऊ पाच शून्य ही मोफत मदत वाहिनी सुरु करण्यात आली आहे. या क्रमांकावर दूरध्वनी किंवा एस एम एस करून मतदान यादीत आपलं नाव असल्याची खात्री मतदारांना करून घेता येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन या संकेतस्थळावर मतदारांना ही पडताळणी तसंच नव्यानं मतदार नोंदणी करता येईल, असं ते म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि मित्र पक्ष- महाआघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला उद्या नांदेड इथून सुरुवात होणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या आघाडीची ही पहिली संयुक्त प्रचार सभा असणार आहे. या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह घटक पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असं ते म्हणाले.

****



 मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान अस्थिर होणार असल्यामुळे उद्या आणि परवा काही भागांत वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जालना, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची, तसंच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****



 सोलापूर-तुळजापूर मार्गावरच्या शीळ घाटात एका मोटारीवर उसाच्या मळीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये  सोलापूरहून तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश असल्याचं तसंच जखमींना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 विहिरीत खोदकाम करताना क्रेन तुटून अंगावर पडल्यानं दोन मजुरांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी इथं काल संध्याकाळी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी  विविध सामाजिक तसंच अन्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 गुरू रविदास यांचीही जयंती आज देशभरात साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून, संत रविदास यांच्या शांति, सद्भाव आणि बंधुभावाच्या संदेशाचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****



 केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सद्यस्थितीचा आढावा राज्याचे  कृषी सचिव एकनाथ डवले यांनी काल  घेतला. या योजनेत जिल्ह्यातल्या एक हजार तीनशे पंचावन्न गावांचा समावेश  असल्याची, तसंच पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या अट्ठेचाळीस हजार नऊशे तीन इतकी असल्याची माहिती अपर आयुक्त डॉक्टर विजयकुमार फड यांनी यावेळी दिली.

*****

***

No comments: