Monday, 18 February 2019

Text - AIR News Bullein, Aurangabad 18.02.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप भारतानं केला आहे. पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी जाधव यांच्या खटल्याची आजपासून हेग इथल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढे जाहीर सुनावणी सुरु झाली. यावेळी भारताची बाजू मांडताना माजी महान्यायअभिकर्ता हरीश साळवे यांनी कोणत्याही वकीलाच्या हस्तक्षेपाशिवाय जाधव यांना अटक करणं बेकायदेशीर घोषित केलं पाहिजे, असं सांगितलं. जाधव यांना वकील देण्यासंदर्भात भारतानं १३ वेळा पाकिस्तानशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या वैयक्तिक अधिकाराचं उल्लंघन केलं गेलं असून त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानकडे सबळ पुरावे नसल्याकडेही त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. सीमापार दहशतवादासाठी पाकिस्तानवर जगभरातून ताशेरे ओढले जात असल्याचं सांगून साळवे यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. आजपासून सलग चार दिवस ही सुनावणी होणार असून, उद्या पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या कथित आरोपाखाली एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यदंड ठोठावला, मात्र हा दिखाऊ खटला असल्याचा आरोप करत भारतानं त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.  

****

स्त्रोतांचा योग्य प्रकारे वापर व्हावा यासाठी, भारताला कमी, मात्र मोठ्या बँकांची आवश्यकता असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज अर्थसंकल्पानंतरच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या बँका अधिक सक्षम असाव्यात, असं सांगतानाच जेटली यांनी, गेल्या पाच वर्षात महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही सांगितलं.

****

शिक्षण क्षेत्राचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी या क्षेत्रात काळानुरुप बदल होणं आवश्यक असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसंच कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्यांना व्यासपीठ मिळावं, येणाऱ्या काळात विद्यार्थी रोगमुक्त आणि सुरक्षित असावा यासाठी तावडे यांनी आज मुंबईत बारा स्वयंसेवी संस्थाबरोबर सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी नवकल्पनांचं मूल्यमापन करणं आणि त्या कल्पनांचं विश्लेषण करणं महत्त्वपूर्ण असून, विविध जिल्ह्यांमध्ये नवप्रकल्पांची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं तावडे म्हणाले.

****

शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा आणि शहरी भागातल्या गृह निर्माण संस्थेतल्या ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल मिळावा, यासाठी शासनानं कॉप शॉप हा उपक्रम सुरू केला असून, अशा योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीतून थेट लाभ होत असून, शेतकरी, उत्पादक कंपन्या, बचत गट यांच्या शेती उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू इथं बंद पाळण्यात आला. जिंतूर इथं तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर सेलू इथं विद्यार्थ्यांनी मदत फेरी काढून, शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी निधी जमा केला. सर्व व्यापारी आणि शैक्षणिक संस्थांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान अस्थिर होणार असल्यामुळे येत्या २० आणि २१ फेब्रुवारीला काही भागांत वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जालना, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची, तसंच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****

अहमदनगर शहरातले व्यापारी आणि उद्योजकांच्या घर तसंच कार्यालयावर आयकर विभागानं आज दुपारी छापे टाकले आहेत. ही नियमित कारवाई असून, कागदपत्रांची तपासणी सुरू आहे, अद्यापपर्यंत काही आक्षेपार्ह आढळलं नसल्याचं आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

****

No comments: