Saturday, 2 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURNAGABAD 02.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 पुणे जिल्ह्यातल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातल्या सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. आज त्यांना पुण्यातल्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती, मात्र आपण कोणत्याही बेकायदेशीर कारवाईत सहभागी झालेलो नाही, असा दावा करत त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूरमध्ये दोन रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. २९४ किलोमीटर लांबीच्या आंदल-सैंथीया-पाकुर-माल्दा आणि खाना-सैंथीया या विद्युतीकरण केलेल्या मार्गांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत, या विद्युतीकरणामुळे उत्तर आणि इशान्येकडील भागात कोळसा, दगडाच्या चिपा आणि खडी वाहून नेणं सोपं होईल. याबरोबरच पंतप्रधान २० किलोमीटर लांबीच्या हिजली-नारायणगढ हा तिसरा रेल्वेरुळही राष्ट्राला अर्पण करणार आहेत.

****



 समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा विकास करणं हे या सरकारचं प्रमुख लक्ष्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं मध्यमवर्गींयाच्या गरजा लक्षात घेत, त्यांचं आर्थिक नियोजन कोलमडणार नाही, याची काळजी घेतल्याचं ते म्हणाले. काळा पैसा आणि विमुद्रीकरणामुळे सरकारचं कर संकलन वाढलं असल्याचंही गोयल यांनी नमूद केलं.  

****



 २०१९च्या अंतरिम अर्थसंकल्पाचं उद्योगजगतानं स्वागत केलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात काही ना काही तरतूद केली असल्याचं भारतीय उद्योग संघटनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष पिरुज खंबाटा यांनी म्हटलं आहे. बांधकाम क्षेत्राला आणि आयकर दात्यांना अर्थसंकल्पानं दिलासा दिल्याची प्रतिक्रिया, आखिल भारतीय कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पातल्या कर सवलतींमुळे भारतीय उद्योग वाढीसाठी मोठी मदत होणार असल्याचं, भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघ - फिक्कीचे अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प चांगला आणि अर्थव्यवस्थेला पुरक असल्याची प्रतिक्रिया, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

****



 निवडणूक आयोग पुन्हा बॅलट पेपरद्वारे निवडणूक घेणार नसल्याचं, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी म्हटलं आहे. कोलकाता इथं काल आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत सर्व राजकीय पक्षांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. दोन दशकांहून अधिक कालावधीपासून आपल्या देशात मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे, तसंच आयोगाचं गेल्या काही काळापासून हेच धोरण असल्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले.

****



 स्पर्धा परीक्षांमधली नकारात्मक गुण पद्धती ही कायदेशीरदृष्ट्या चुकीची बाब असल्याचं मत नोंदवत मद्रास उच्च न्यायालयानं, ही पद्धत तात्काळ बंद करावी असं म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी नकारात्मक गुणपद्धतीनं आय आय टी- जे ई ई परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची याचिका निकाली काढताना न्यायालयानं सदर मत नोंदवलं.

****



 मुंबईत झालेल्या चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचा काल समारोप झाला. अध्यक्षस्थानी राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ या होत्या. दुष्काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती आदी आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करण्याची गरज यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली. जागतिक परिषदेच्या निमित्तानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानुसार, आपत्ती निवारणासाठी पुढाकार घेणं, त्याबाबतची जागरूकता वाढवणं आणि जोखमीची माहिती देऊन योग्य पद्धतीनं आपत्ती निवारणाचं कार्य करणं आणि या कार्याचा नियमित आढावा घेण्याचं निश्चित करण्यात आलं.

****



 कोलकाता इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस जागतिक गटाच्या पात्रता फेरीत आज रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीची इटलीच्या मार्को सेकिनाटो आणि सिमॉन बोलेली या जोडीशी लढत होणार आहे. पात्रता फेरीतलं आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. या फेरीतल्या एकेरीच्या पहिल्या सामन्यात काल इटलीच्या आंद्रिआ सेप्पीनं भारताच्या रामकुमार रामनाथनचा सहा - चार, सहा - दोन असा पराभव करत इटलीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या अग्रमानांकित प्रज्ञेश गुणेश्वरनचाही पराभव झाला.

*****

***

No comments: