Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या
आरोपात पुणे पोलिसांनी मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक अवैध
असल्याचं सांगत त्यांना तात्काळ सोडून देण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले. न्यायालयानं
काल तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन
अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं तेलतुंबडे यांना चार आठवड्यांचं संरक्षण
दिलं असल्यामुळे ही अटक अवैध असून, त्यांचं हे संरक्षण ११ फेब्रुवारीपर्यंत कायम असल्याचं
अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वदाने यांनी म्हटलं आहे.
****
मानव
विकास कार्यक्रमांतर्गत समाजातल्या अतिगरीब, कर्ज पीडित, महिलांना तसंच महिला आधारित
कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ‘तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस’ या नवीन उपक्रमाची घोषणा अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुंबईत आज बचतगटांच्या परिषदेत ते बोलत होते. या
योजनेअंतर्गत अतिगरीब व्यक्तीला प्रती व्यक्ती १० हजार रुपयांचं कर्ज, कर्ज विळख्यात
अडकलेल्या स्वयंसहाय्य बचतगटातल्या सदस्यांना कर्ज परतफेडीसाठी २० हजार रुपयांपर्यंतचं
कर्ज रुपातील अर्थसहाय्य, सोशल एन्टरप्रायझेस क्षेत्रात उद्योग करणाऱ्या महिला उद्योजकांना
दोन लाख रुपयांपर्यंतचं खेळतं भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल.
****
चित्रपट,
नाटक आणि मालिकेतल्या कामगारांचा असंघटित कामगार मंडळामध्ये समावेश करून त्यांच्या
हक्कांसाठी त्वरित समिती स्थापन करणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनी दिली. मुंबईत आज चित्रपट, नाटक आणि मालिकेत काम करणाऱ्या कामगारांच्या
शिष्टमंडळानं आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निलंगेकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते
बोलत होते. असंघटित कामगार मंडळात या कामगारांचा समावेश झाल्यास या अंतर्गत येणाऱ्या
सर्व योजनांचा लाभ त्यांना देता येईल, असं निलंगेकर यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या विकासासाठी शासनानं भरीव निधीची तरतूद केली आहे, जनसुधारणा होऊन जिल्ह्याच्या
विकासासाठी निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. औरंगाबाद
इथं आज जिल्हा नियेाजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या आरोग्य प्रश्नांवर
शासकीय आणि वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, आमदार
इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या घाटीतल्या बांधकामाबाबत काही त्रुटी आढळल्या
तर चौकशी करण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
****
बीड
इथले अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांना पाच लाख रूपयांची लाच घेताना आज लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. पुरवठा विभागातल्या एका कर्मचाऱ्यास त्याला अनुरुप
विभागीय चौकशीचा अहवाल देण्यासाठी त्यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी
पाच लाख रुपये आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं.
या कारवाईनंतर कांबळे यांच्या नांदेड, औरंगाबाद, तळेगाव आणि बीड इथल्या निवासस्थानी
छापे मारण्यात आले. या कारवाईत अन्य एक कर्मचारी महादेव महाकुंडे याला देखील अटक करण्यात
आली.
****
बुलडाणा
जिल्ह्यातल्या शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत आणि लिपीक राघव इंगळे यांनाही
आज एक लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. एका हॉटेलला ना
हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकाकडून त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी
केली होती.
****
राज्यातल्या
२६४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर
केला. त्यासाठी चार फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, मतदान
२४ फेब्रुवारीला होणार आहे. यात औरंगाबाद विभागांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन
ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
****
धुळे
इथं दोन दिवसीय ‘अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’ला आजपासून सुरुवात
झाली. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, भाजपाचे राष्ट्रीय
उपाध्यक्ष खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते संमलेनाचं उद्घाटन झालं. केंद्रीय
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यावेळी उपस्थित होते. डॉ.अशोक मोडक यांनी लिहिलेल्या
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आलं.
****
कोलकाता
इथं सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस पात्रता स्पर्धेत पुरुष दुहेरीत आज भारतानं इटलीचा
पराभव केला. भारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांच्या जोडीनं इटलीच्या मार्को
सेकिनाटो आणि सिमॉन बोलेली या जोडीचा चार - सहा, सहा - तीन, सहा - चार असा पराभव केला.
याआधीच्या एकेरीच्या सामन्यात इटलीचे खेळाडू विजयी ठरल्यानं इटली दोन - एकनं आघाडीवर
आहे.
****
No comments:
Post a Comment