Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 01 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्य
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक; महाराष्ट्र विकास आघाडीचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचे किसन कथोरे यांचे अर्ज दाखल
** मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या
सरकारनं १६९ विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; भारतीय जनता पक्षाचा सभात्याग तर चार
सदस्य तटस्थ
** अधिवेशन आणि
हंगामी अध्यक्षाची निवड नियमबाह्य असल्याचा विरोधी पक्षाचा आरोप
** औरंगाबाद- अहमदनगर
रस्त्यावर गोलवाडी फाट्याजवळ मोटारगाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात जालना जिल्ह्यातल्या चार तरूणांचा
मृत्यू
आणि
** राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचं दीर्घ आजारानं निधन
****
राज्य विधानसभा अध्यक्षपदासाठी आज सकाळी अकरा वाजता निवडणूक होत
आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्यावतीनं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काल या पदासाठी
उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षानं मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना या
पदासाठी उमेदवारी दिली असून त्यांनीही काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आघाडीतल्या प्रमुख पक्षांनी सर्व संमतीनं
या पदासाठी पटोले यांचं नाव निश्चित केलं, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पटोले
यांच्या नावाला मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. थोरात यांच्यासह शिवसेनेचे गटनेते
एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी नाना पटोले यांना
अर्ज दाखल केल्यानंतर शुभेच्छा दिल्या. पटोलेच विजयी होतील, असा विश्वास तिघांनी व्यक्त
केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे उमेदवार कथोरे यांनी पक्षांन आपल्यावर विश्वास टाकला असून, आपण या निवडणुकीत
विजय होऊ, अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाराष्ट्र विकास
आघाडी सरकारनं राज्य विधानसभेतला विश्वासदर्शक ठराव १६९ विरुद्ध शून्य मतांनी काल जिंकला.
भाजपाच्या सदस्यांनी अधिवेशनाचं कामकाज नियमबाह्य पद्धतीनं सुरु असल्याचं म्हणत सभात्याग
केला. तर चार सदस्य तटस्थ राहिले. यात अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन- एमआयएमचे
दोन, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येकी एका
सदस्याचा समावेश आहे.
त्याआधी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात विश्वासदर्शक
ठराव मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, तसंच गटनेते जयंत पाटील, शिवसेना
नेते सुनिल प्रभू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. प्रस्तावावर आधी आवाजी मतदान
झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खुल्या पद्धतीनं मतदान घेऊन,
प्रस्तावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मत देणाऱ्यांची प्रत्यक्ष मोजणी केली केली.
त्याआधी काल सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधकांनी
गोंधळ घातला. हे अधिवेशन नियमाला धरून बोलावलेलं नाही, अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांच्या
आदेशाची गरज आहे असा आक्षेप भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
मात्र राज्यपालांनी आदेश काढल्यानंतर सात दिवसांच्या आत अधिवेशन बोलावलं असल्यानं,
ते नियमानुसारच आहे असं म्हणत, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस
यांचा आक्षेप फेटाळून लावला.
यानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी
घेतलेली शपथ, संविधानानुसार विहीत नमुन्याप्रमाणे नव्हती, त्यामुळे ती ग्राह्य धरता
येत नाही असा आरोपही केला, आधीच्या हंगामी अध्यक्षांच्या जागी, दिलीप वळसे पाटील यांची
हंगामी अध्यक्ष म्हणून झालेली निवड नियमबाह्य आहे, सत्ताधाऱ्यांना गुप्त मतदानाची भिती
वाटत असल्यानंच अशा रितीनं नियमबाह्य पद्धतीनं निवड झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र वळसे पाटील यांनी हा मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, त्यानुसारच राज्यपालांनी आपली
अध्यक्ष म्हणून केलेल्या निवडीला मान्यता दिल्याचं सभागृहात स्पष्ट केलं. शपधविधीची
घटना सभागृहाबाहेरची आहे, असं स्पष्ट करून त्यांनी त्याबाबतचा मुद्दाही फेटाळून लावला.
या ठरावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हंगामी
अध्यक्षांनी घोडेबाजार रोखल्यामुळे त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
देखील सर्व सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले ……….
आम्हाला तो महाराष्ट्र अपेक्षित आहेत जो साधुसंतांचा,
विरांचा, क्रांतिकारकांचा आणि समाजसुधारकांचा समाज ज्यांची शपथ घेऊन आपण हा कारभार
सुरु करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आपण घडवायचं आणि तो घडवल्या शिवाय आम्ही राहणार नाही. मी पुन्हा
एकदा शपथ घेतो सर्वांना धन्यवाद देतो.
****
महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या सहा मत्र्यांनी शपथ घेताना त्यांच्या नेत्यांची नावं घेणं नियमबाह्य
असल्यानं सदरचा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांच्याकडे याचिका दाखल केली असून, राज्यपालांनी या प्रकरणी न्याय दिला नाही
तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
यंदाच्या
पावसानं लातूर जिल्ह्यात उपलब्ध झालेलं पाणी वापरण्यासाठी आधुनिक जल व्यवस्थापनाची
गरज असल्याचं एकमत काल जल परिषदेत मांडण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या
वतीनं आयोजित दोन दिवसीय जल परिषदेचं उद्घाटन काल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या
हस्ते झालं. पाणी काटकसरीनं वापरणं, नळाला मीटर बसवणं आणि पाण्याचं धोरण निश्चित करण्यासाठी
ही जलपरिषद महत्वाची ठरणार असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यावेळी म्हणाले. महानगरपालिकेचे
आयुक्त एम डी सिंह यांनी, पाणी वितरणात सुलभता यावी, पाणी वाटपाचे दिवस कमी व्हावेत
यासाठी केले जात असलेल्या उपायाची माहिती दिली. आज या परिषदेचा समारोप होणार आहे.
****
औरंगाबाद- अहमदनगर रस्त्यावर गोलवाडी फाट्याजवळ एक मोटारगाडी झाडावर आदळून
झालेल्या अपघातात चार तरूणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जालना जिल्ह्यातल्या
शेवली या गावचे हे तरूण शिर्डी इथं देवदर्शनासाठी जात असताना काल मध्यरात्री हा अपघात
झाला.
****
धुळे तालुक्यातल्या विंचूर गावाजवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी
पिकअप व्हॅन नदीपुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघात सात जणांचा जागीच मृत्यू झाला
तर १५ जण जखमी झाले आहेत. मध्यप्रेदशातल्या सेंधवा तालुक्यातल्या धवल्यागिरी इथून उस्मानाबाद
जिल्ह्यात ऊसतोडणीच्या कामासाठी हे आदिवासी मजूर आपल्या मुलाबाळांसह जात असतांना काल
मध्यरात्री हा अपघात झाला.
****
जागतिक
एड्स दिन आज पाळला जातो. औरंगाबाद इथं काल यानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या
एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथकाच्या वतीनं जनजागृतीपर फेरी काढण्यात आली. या फेरी
दरम्यान एड्स जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आलं आणि माहिती पत्रकांचं वाटप
करण्यात आलं.
बीड इथंही
काल वैयक्तिक, सामाजिक आणि शासकीय पातळीवर जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रभातफेरी
काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी या फेरीचं उद्घाटन केलं.
****
नांदेड जिल्ह्यात
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या वैयक्तिक
शौचालयांचं बांधकाम पूर्ण
करण्याचं आवाहन, जिल्हा
परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी
केलं आहे. हिमायतनगर तालुक्यात जवळगाव इथं काल शौचालय बांधकामाची पाहणी
केल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं. गावस्तरावर बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या
वापराबाबत सरपंच, ग्रामसेवक,
विविध समित्या, महिला बचतगट यांनी पुढाकार
घेवून जनजागृती करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या बाराशिव
इथल्या बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं दिला जाणारा 'राज्यस्तरीय
बाराशिव साहित्य पुरस्कार' प्रसाद कुमठेकर यांना मराठवाडा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष
कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. कुमठेकर यांना 'बारकुल्या
बारकुल्या ष्टोऱ्या' या पुस्तकासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ
नगरपरिषदेच्या इमारतीसाठी जमिन हस्तांतरणाचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. आता
लवकरच नगरपरिषद कार्यालयाची भव्य इमारत होणार असल्याची माहिती नगर परिषदेचे गटनेते
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नेते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७७ वर्षांचे
होते. दिघोळे हे १९८५ ते १९९९ या काळात सलग तीन वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून
निवडून आले होते. युती शासनाच्या काळात त्यांनी साडेतीन वर्षे ऊर्जा आणि ग्रामविकास
राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन.
नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश
उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.
****
नांदेड इथ प्रादेशिक परिवहन
कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्यामार्फत काल "रस्ता सुरक्षा महा
वॉकेथॉन" रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी रॅलीला हिरवा झेंडा
दाखवला. विद्यार्थ्यांनी विविध रस्ता सुरक्षात्मक घोषणा देऊन नागरिकांचं लक्ष वेधून
घेतलं.
****
No comments:
Post a Comment