Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांचा काहीही संबंध नसल्याचा
निर्वाळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - एसीबीनं दिला आहे. विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठात आज दाखल केलेल्या शपथपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. विदर्भ सिंचन
महामंडळाअंतर्गत झालेल्या बारा प्रकल्पातल्या कथित घोटाळ्याशी अजित पवार यांचा काहीही
संबंध आढळला नसल्याचं, एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी दिलेल्या शपथपत्रात म्हटलं
आहे. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष पवार यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या प्रकल्पांची
कंत्राटं देताना भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
दरम्यान, हे शपथपत्र दिशाभूल करणारं असून, न्यायालयात
ते टिकणार नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याविरोधात आपण विधीमंडळात आवाज उठवण्याचा इशारा फडणवीस यांनी दिल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे. संबंधित कागदपत्रांवर मंत्र्यांच्या सह्या असताना, प्रशासकीय त्रुटींसाठी
फक्त अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरलं जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
****
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ आजही
ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं एमआयएम पक्षाच्या नेतृत्वात
भव्य मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात अनेक मुस्लिम
संघटना आणि नागरिक शांततेत सहभागी झाले.
जालना तालुक्यातल्या रामनगर इथं आज सकाळी नागरिकत्व
दुरुस्ती कायद्याविरोधात बाजारपेठेतले व्यवहार दोन तास बंद ठेवण्यात आले. मुस्लीम समाबांधवांनी
जालना-मंठा मार्गावरून शांततेत मोर्चा काढून पोलिस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर
केलं.
बीड, परभणी आणि हिंगोलीत मात्र या आंदोलनाला हिंसक
वळण लागलं.
परभणी शहरात आज पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र
प्रतिसाद मिऴाला. मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासनाला
निवेदन देऊन मोर्चा विसर्जित होताच समाजकंटकांनी दगडफेक सुरू केल्यानं तणाव निर्माण
झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. पाथरी आणि पालम इथंही आज मुस्लिम संघटनांनी बंद पाळून मोर्चा
काढला.
बीड इथं एका बसवर तसंच पोलिसांच्या वाहनावर आंदोलकांनी
दगडफेक केली. पोलिसांना तत्काळ लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
हिंगोली इथंही आंदोलकांनी काही बसवर दगडफेक केली,
त्यामुळे हिंगोली आगारातून बससेवा आज बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर
इथं मुस्लिम बांधवांनी आज निषेध मोर्चा काढला.
****
गावे सुखी आणि समृद्ध झाली तरच देशाचा विकास होईल.
असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यात उन्नत भारत अभियानाच्या
विभागीय समन्वय संस्थेचं लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत
होते. परम संगणकाचे जनक डॉ विजय भटकर यावेळी उपस्थित होते, अनेक विद्यापीठांच्या समन्वयातून
संशोधन आणि प्रगतीचा लाभ ग्रामीण जनजीवनाला करून देण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं डॉ
भटकर यांनी सांगितलं.
****
औषधनिर्माण शास्त्र शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्वाचा
समजला जाणारा ‘प्रा. जी. पी. श्रीवास्तव’ राष्ट्रीय पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना आज चेन्नई इथं प्रदान करण्यात
आला. असोसिएशन ऑफ फॉमास्युटिकल रिसर्च या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो.
विद्यापीठातले सर्व विद्यार्थी तसंच सहकारी प्राध्यापक
आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची भावना कुलगुरू येवले यांनी व्यक्त
केली
****
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची दूरदृष्टी आणि अंकुशराव
कदम यांचे प्रशासन यामुळे एमजीएम विद्यापीठ आज उभं राहिलं असे गौरवोद्गार राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले आहेत. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव
कदम यांचा आज औरंगाबाद इथं शरद पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरात झाडे जगवली म्हणून या
संस्थेचे रूप बहरलं. शिक्षण, सेवा, संशोधन हे ब्रीद घेऊन या महात्मा गांधी मिशन संस्थेची
वाटचाल सुरू असल्याचा उल्लेख पवार यांनी केला.
****
राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प
जालना यांच्या संयुक्त विद्यमानं आज जालना इथं महिलांसाठी 'डिजिटल सखी' ही एकदिवसीय
कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत,
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी उपस्थित महिलांशी डिजिटल ॲप्लिकेशनच्या
माध्यमातून संवाद साधला.
****
No comments:
Post a Comment