Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं ३० सप्टेंबर
२०१९ पर्यंतच दोन लाख रुपयांचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. नागपूर हिवाळी
विधानसभा अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली आहे. महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या
माध्यमातून ही कर्जमाफी केली जाईल असं ठाकरे म्हणाले. मार्चपासून या कर्जमाफीची अंमलबजावणी
करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचं
ते म्हणाले. कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय ही कर्जमाफी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री
ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, या सरकारनं निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफी करण्याचं दिलेलं
आश्वासन पाळलं नसल्याचं जाहीर करत विरोधी पक्ष भाजपनं सभात्याग केला.
****
उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा
नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं विधानसभेत
दिलं. कॅगच्या अहवालामध्ये गेल्या सरकारच्या काळात ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामांचा
घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला होता,
त्यावर फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलं. एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उपयोगिता
प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचं असतं. केवळ २०१८ पर्यंतच्या कालावधीत ६५
हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामाची ३२ हजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रं सादर करण्यात आलेली
नाहीत म्हणून त्यास घोटाळा म्हणणे चूक असल्याचं ते म्हणाले.
****
सहासष्ठावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ
येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्या
हस्ते हे पुरस्कार दिले जातील. हेलारो या गुजराती चित्रपटाला यंदाच्या सर्वोत्कृष्ट
चित्रपटाच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातले अभिनेते आयुष्मान
खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून, तर किर्ती सुरेश या तेलुगु
अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. उरी चित्रपटासाठी
आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिला जाईल. ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. ‘नाळ’ या चित्रपटातला
बालकलाकार ‘श्रीनिवास पोफळे’ याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा आणि सुधाकर रेड्डी यांना
सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
औरंगाबाद
शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत महिला अत्याचारासंबंधीच्या गुन्ह्यात घट झाल्याची
माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी दिली. ते आज औरंगाबाद इथं जिल्हा
माहिती कार्यालयाच्या वतीनं पत्रकारांसाठी आयोजित ‘महिला सुरक्षा कार्यशाळे’त बोलत
होते. शहर पोलिस दल लवकरच महिलांसाठी ‘निर्भया सेफ सिटी उपक्रम’ राबवणार आहे. या उपक्रमात
महिलांना पाच मिनिटात मदत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी विधिज्ञ अर्चना
गोंधळेकर यांनी महिला सुरक्षेसंबंधी विविध कायद्यांची माहिती दिली.
****
उस्मानाबाद नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके
यांच्याविरुद्ध राष्ट्र्वादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी दाखल
केलेला अविश्वास प्रस्ताव आज मंजूर झाला. अविश्वास ठरावाच्या बाजूनं २८ तर विरोधात
३ जणांनी मतदान केलं. तर एक सदस्य तटस्थ राहिला आणि ४ सदस्य गैरहजर होते.
****
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी
केंद्र सरकार नियोजन करत असल्याची माहिती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या
समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक दलवाई यांनी परभणी इथं आज एका पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांनी
उत्पादन केलेल्या मालाला गाव स्तरावरच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यादृष्टीनं प्रयत्न सुरु
असल्याचं ते म्हणाले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं प्रतिहेक्टरी उत्पादन वाढविणं आणि
यासोबतच शेतीवर होणारा खर्च कमी करण्याचं काम विद्यापीठस्तरावर करण्यात येत असल्याचं
त्यांनी सांगितलं. विद्यापीठाचं तंत्रज्ञान आणि शासनाचं धोरण यांच्यात समन्वय साधण्यासाठी
प्रयत्न करण्यात येत असल्याचं डॉ.दलवाई यावेळी म्हणाले.
****
सुधारित नागरिकत्व कायदयाच्या विरोधात साक्री शहरातल्या
मुस्लिम समाज आणि भारिप वंचित बहुजन आघाडीनं आज मूक मोर्चा काढला. महाराष्ट्रात हा
कायदा लागू करू नये, हे विधेयक रद्द करून समाजाला न्याय द्यावा अशा मागणीचं निवेदन
यावेळी तहसिलदार प्रविण चव्हाण यांना देण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment