Tuesday, 21 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ लागतं त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचं सादरीकरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचं जिल्हानिहाय नियोजन करणं गरजेचं असून त्या त्या भागातील गरजा, तिथले उद्योग, लघुउद्योग, उत्पादन साधने आदींची माहिती घेऊन त्या अनुषंगानं अभ्यासक्रमांची आखणी होणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचं मोठे योगदान असल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी नमुद केलं.
****

 सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत अन्न आणि औषधाच्या तपासणीसाठी असलेल्या प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामाचा त्यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. 
****

 गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद आटोक्यात आणण्यात प्रशासनाला बऱ्याच अंशी यश आलं असून, विकासाच्या माध्यमातूनच नक्षलवाद संपवण्यावर शासनाचा भर असल्याचं राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली गडचिरोली भेट होती. नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा शिंदे यांनी या निमित्त वार्तालाप करताना दिला. याप्रसंगी काही आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचा पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****

 नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगाराणी आंबुलगेकर याची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पदम नरसारेड्डी सतपलवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र विकास आघाडीमार्फत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.
****

 शेती नैसर्गिक संकटांमुळे अडचणित सापडत असून त्यामुळे शेतकरी तणावाखाली वावरत असल्यानं त्याला तणावमुक्त करण्याचं काम साहित्य करू शकतं, असा विश्र्वास साहित्यिक प्राचार्य डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त केला आहे.  नांदेड जिल्ह्य़ाच्या नायगाव तालुक्यातील बरबडा इथ आज चौथ्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्दघाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. प्रा. नारायण शिंदे संमेलनाचे अध्यक्ष असून त्यांच्या हस्ते सकळाच्या सत्रात ग्रंथ दिंडीचं उदघाटन करण्यात आलं होत.
****

 औरंगाबाद महापालिकेच्या एप्रिल महिन्यातील नियोजित निवडणुकीत सर्व ११५ वार्डांमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी अखिल भारतीय हिंदी हास्य आणि वीर रस  संमेलन, विविध खेळांच्या स्पर्धा आणि विविध उपक्रम होणार असल्याची माहिती आमदार दानवे यांनी यावेळी दिली.
****

 औरंगाबाद शहरातल्या कटकटगेट भागात आज चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या पंचवीस लाख ऐंशी हजार रूपयांच्या नोटांसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून पकडलं. शेख उमर शेख गुलामनवी, शेख मोईन शेख मुनीर आणि सैय्यद अझहरूद्यीन सैय्यद अहेमद यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
****

 बीड नगर पालिका विषय समिती सभापतींची आज बिनविरोध निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी सविता राजेंद्र काळे यांची यात निवड झाली तर नियोजन सभापती म्हणून भिमराव वाघचौरे यांना निवडण्यात आलं. पाणी पुरवठा सभापती म्हणून रविंद्र कदम, शिक्षण सभापतीपदी मुन्ना इनामदार आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी विनोद मुळूक आणि मोहम्मद सादेक यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी या सभापतींचा सत्कार केला.
****

 साईबाबांचं जन्मस्थळ हे पाथरी असून  राज्य शासनान या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून निर्णय घ्यावा या आशयाचा ठराव आज परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. खासदार संजय जाधव, साईबाबा मंदिर विकास कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉक्ट राहूल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर आदी या निमित्त आयोजित बैठकीस उपस्थित होते.
****

 हिंगोली इथं आज सलग व्या दिवशी विविध संघटनांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व नोंदणी विरोधात गांधी चौकात धरणं आंदोलन सुरू आहे. याला रद्द करण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत. 
*****
***

No comments: