आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
येत्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं
राज्यभरातल्या शालेय
विद्यार्थ्यांना समृद्ध पर्यावरणाच्या संकल्पाची शपथ देण्यात येणार आहे.
राज्याचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून संयुक्तपणे
आज मंत्रालयात झालेल्या एका समारंभात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थांना
पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना
पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन केलं. हे पर्यावरण रक्षण संकल्प शपथ अभियान राज्यभरातल्या
विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहे.
****
सुधारित
नागरिकत्व कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याची मागणी करणा-या याचिकांवर आज सर्वोच्च
न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं
पीठ, यासंदर्भात दाखल झालेल्या एकशे त्रेचाळीस याचिकांवर ही सुनावणी घेणार आहे. या
याचिकांमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीगनं, तसंच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दाखल
केलेल्या याचिकांचा समावेश आहे.
****
चीनमध्ये पसरत चाललेल्या नोव्हल कोरोना व्हायरस रोगाच्या
साथीच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून
केंद्र सरकारनं देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळांवरची आरोग्यविषयक तपासणी
कडक केली आहे.विशेषत: चीन आणि हाँगकाँगहून येणा-या सर्व प्रवाशांची कडकपणे आरोग्य तपासणी
करण्यात येत आहे. नागरी उड्डयन मंत्रालयानं यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत.
दरम्यान,
चीनमधल्या वुहान शहरात प्रवास करून अमेरिकेत परतलेल्या एका अमेरिकन नागरिकाला या रोगाची
लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
भारतीय
खेळाडू सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत आजपासून थायलंड मास्टर सुपर ३०० स्पर्धेमध्ये
आपले सामने खेळणार आहेत. आगामी ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीनं या स्पर्धेत
विजय मिळवणं या दोन खेळाडूंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. भारताच्या पी.व्ही सिंधू,व्ही.साईप्रणित
तसंच पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रानकीरेड्डी आणि चिराग सेट्टी यांचा ऑलिंपिक
स्पर्धेतला प्रवेश जवळपास निश्चित आहे.
****
मुंबईतल्या
इंदू मिल परिसरात उभारल्या जात असलेल्या, डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम गतीनं केल्यास येत्या दोन वर्षात पूर्ण होऊ
शकतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल
मुंबईत या स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक झाली त्यात ते बोलत होते. आतापर्यंत
या स्मारकाचं पंचवीस टक्के काम झाल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालं.
****
No comments:
Post a Comment