Tuesday, 21 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 21.01.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
खोट्या बातम्या या माध्यम क्षेत्रासमोरचं नवं संकट म्हणून पुढं येत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार काल प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  खोट्या बातम्यांचं प्रसारण करणारे पत्रकार असल्याचा दावा करतात आणि या जबाबदार व्यवसायाला बदनाम करतात, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
औरंगाबादची मुष्टीयोद्धा शर्वरी कल्याणकर हिनं गुवाहटी इथं सुरू `खेलो इंडीया` क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिची अंतिम फेरीतली लढत हरयाणाच्या माही राघव विरुद्ध आज होत आहे. दरम्यान, काल सलग अकराव्या दिवशी त्रेसष्ट सुवर्णपदकांसह महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता आणि वेदांत बाफना यांनी काल जलतरणात सुवर्णपदकं मिळवली. 
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या बरबडा इथं आज चौथं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. प्राचार्य नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाच्या ग्रंथदिंडीचं आज सकाऴी प्राचार्य़ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झालं. दरम्यान, कथाकथन, कवी संमेलन, आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या इतिहास आणि प्राचीन संस्कृती विभागात आजपासून इतिहास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात चर्चा, परिसंवाद, नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती विभागप्रमुख डॉ.उमेश बगाडे यांनी दिली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते आज दुपारी दोन वाजता या महोत्सवाचं उदघाटन होणार आहे. यावेळी गिरीश कर्नांड लिखित ‘तलेदंड या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
****
मेलबोर्न इथं सुरू ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडू प्रज्नेश गुन्नेश्वरनला पहिल्या फेरीत पराभव सहन करावा लागला. जपानच्या तत्सुमा इतोनं त्याला ६-४, ६-२ आणि ७-५ असं पराभूत केलं. प्रज्नेशची ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्याची ही पाचवी वेळ आहे. प्रज्नेशनं यापुर्वी फ्रेंच खुल्या, अमेरिकी आणि विंबल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठीही पात्रता मिळवली आहे. 
****


No comments: