Tuesday, 21 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 21.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जानेवारी २०२० दुपारी१.०० वाजता
****
प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना संबोधून केले जाणारे अर्ज तसंच निवेदनं या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत. हे अर्ज किंवा निवेदनं संबंधित क्षेत्रीय स्तरावरच्या यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून, त्यावर कार्यवाहीबाबत लोकशाही दिनी आढावा घेतला जाईल. अमरावती इथं आज मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा शुभारंभ विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त पियूष सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
****
इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला `जीसॅट-३०` उपग्रहाला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. `प्रॉपेल्शन` या उपग्रहाला पुढं ढकलण्याच्या प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. यासाठी दोन तास एकोणतीस मिनिटांचा अवधी लागला. या उपग्रहाला अकरा अंश कोनात प्रस्थापित करण्यात आलं असल्याची माहितीही इस्त्रोनं दिली आहे.
****
जोगबनी-विराटनगर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राच्या तपासणी नाक्याचं आज  विराट नगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी उदघाटन केलं. दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हे उदघाटन करण्यात आलं. हे दोन्ही देशांमधल्या व्यापाराचं महत्वाचं स्थान असून २६० एकर जागेवर १४० कोटी रुपये खर्च करून ही तपासणी चौकी उभारण्यात आली आहे.
****
मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांतील जनतेचं स्थापना दिनानिमित्त अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका संदेशामध्ये या राज्यांच्या रहिवाशांना उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात  उपाध्यक्षपदाची निवडणूक आता सुरू आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या बरबडा इथं आज चौथं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. प्राचार्य नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाच्या ग्रंथदिंडीचं प्राचार्य़ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झालं. दरम्यान, कथाकथन, कवी संमेलन, आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. संमेलनस्थळी पुस्तकांची दालनं थाटण्यात आली आहेत. 
****
नांदेड इथं जनता दल धर्मनिरपेक्षचा पहिला सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार अहमदनगर इथले पत्रकार सुधीर लंके यांना जाहीर झाला आहे. सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार समाजवादी विचारवंत सदाशीवराव पाटील यांना देण्यात येणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचं उद्या नांदेड इथं वितरण केलं जाणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या पालवन इथं तेरा आणि चौदा फेब्रुवारीला पहिलं वृक्ष संमेलन होणार असल्याची घोषणा अभिनेते आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. दोन दिवसीय या संमेलनात वृक्षदिंडी, झाड- पक्षी आणि जल व्यवस्थापना संदर्भातले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात आवकाळी पावसामुऴे घराची पडझड आणि नुकसान झालेल्या  नुकसानग्रस्तांना आज महिला आणि बालकल्याणमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती संगीता तायडे, तहसीलदार संतोष काकडे उपस्थित होते.
****
गुवाहाटीमध्ये सुरू खेलो इंडीया युवा स्पर्धेत आज सत्तावन्न सुवर्णपदकांसाठी विविध सामने होत आहेत. फुटबॉल, हॉकी, लॉन बॉल्स, जलतरण, भारोत्तोलन, बॅडमिंटन आणि टेनिस मधील सुवर्णपदाकांचा यात समावेश आहे. औरंगाबादची मुष्टीयोद्धा शर्वरी कल्याणकर हिनं सत्तर किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली असून ती आज विजेतेपदाच्या लढतीत हरियाणाच्या माही राघवविरुद्ध झुंजणार आहे.  जलतरणामध्ये आसामच्या शिवांगी शर्मा आणि कर्नाटकच्या श्रीहरि नटराजनच्या कामगिरीबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. शिवांगीनं आतापर्यंत चार सुवर्णपदकं जिंकली असून श्रीहरिनं तीन सुवर्णपदकं पटकवली आहेत. पदक तालिकेत आज बाराव्या दिवशीही महाराष्ट्र संघ त्रेसष्ट सुवर्ण आणि बासष्ट रौप्य पदकांसह अव्वलस्थानी असून संघानं दोनशे चार पदकं जिंकली आहेत.
****


No comments: