Wednesday, 22 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 22.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२० दुपारी१.०० वाजता
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पंतप्रधान राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींनी हे पुरस्कार प्रदान केले. यावेळी, महाराष्ट्राच्या अथर्व मनोजकुमार लोहार या सर्वात कमी वयाच्या तबलावादकाला कला आणि संस्कृती विभागाचा पुरस्कार देण्यात आला तर देवेश पंकज याला प्रतिभावान युवा गणितज्ज्ञ म्हणून गौरवण्यात आलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या एकशे त्रेचाळीस याचिकांच्या एकत्रित सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. या याचिकांपैकी फक्त साठ याचिकांच्या प्रती केंद्र सरकारला प्राप्त झाल्याचं सांगत, या याचिकांवर प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारला अजून काही अवधी हवा असल्याचं महान्यायवादी के.के.वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्यायालयानं सरकारला चार आठवड्यांचा अवधी मंजूर केला.
या कायद्याला तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या कार्यवाहीला सध्या स्थगिती द्यावी, अशी मागणी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली. यावर, केंद्रसरकारची बाजू ऐकल्याशिवाय काहीही निर्णय देणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. तसंच, या याचिकांची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णयही न्यायालयानं आज घेतला. याशिवाय, सर्वोच्च न्यायालय या याचिकांवर निर्णय देईपर्यंत कोणत्याही उच्च न्यायालयानं या कायद्यासंदर्भातल्या याचिकांची सुनावणी करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं आज दिले.
****
सदनाच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा संसदेनं आढावा घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सदनाचे अध्यक्ष, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं कोणत्यातरी राजकीय पक्षाशी संबंधित असतात, त्यामुळे याबाबत विचार करण्याची वेळ आली असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. हा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांऐवजी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालच्या एखाद्या संसदीय प्राधिकरणाकडे ठेवण्याबाबत संसदेनं गांभीर्यानं विचार करावा, असंही न्यायालयानं सुचवलं आहे. मणिपूर विधानसभेतले भाजपा सदस्य आणि मणिपूरचे वनमंत्री श्यामकुमार यांना अपात्र ठरवावं यासाठी काँग्रेस नेत्यानं केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं हे वक्तव्य केलं.
****
ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर इथल्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमाराला या कारखान्याच्या ड्रायरमध्ये झालेल्या स्फोटानंतर परिसरात आग भडकली. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
****
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा उत्कृष्ठ जिल्हा सहकारी बँकेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा  वैकुंठभाई मेहता पुरस्कार  या बँकेनं सलग सातव्यांदा जिंकला आहे. सातारा जिल्हा सहकारी बँकेनं द्वितीय, तर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. येत्या दहा फेब्रुवारीला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवेळी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानापोटी उडीद आणि मूग या पिकांचा विमा भरणाऱ्या सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.यासाठी अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युअरन्स या केंद्र सरकारच्या विमा कंपनीकडून एक्क्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार अट्ठ्याऐंशी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
****
कोल्हापूर मधल्या मेजर ध्यानचंद हॉकी क्रीडासंकुलाच्या विकासासाठी केंद्र सरकारनं साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी दोन कोटी अडीच लाख रुपये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर महापालिकेकडे सोपवण्यात आल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी आज कोल्हापूर इथे वार्ताहरांशी बोलताना दिली.
****
राज्यातल्या, अन्न आणि औषधांच्या तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामाचा त्यांनी काल मंत्रालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
****


No comments: