Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 May 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८
मे
२०२० सायंकाळी ६.००
****
Ø मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित नऊ
सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
Ø सीबीएसईकडून बारावीच्या
उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
Ø नंदूरबार जिल्ह्यातले १७ तर अहमदनगर जिल्ह्यातले
सात रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
आणि
Ø शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार
- लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून
आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये
मुख्यमंत्र्यांसह, विधान परिषदेच्या उपसभापती
डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, रणजितसिंह
मोहिते-पाटील, रमेश कराड, प्रविण दटके,
गोपिचंद पडळकर, अमोल मिटकरी, आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक
निंबाळकर यांनी सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची
राज भवनात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचं विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईने बारावीच्या उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं
आहे. या परीक्षा आता १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत. परीक्षार्थींनी मास्क वापरणं
तसंच सॅनिटायझर सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आपल्या पाल्याला कोणताही आजार
होणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यावी, असंही मंडळानं म्हटलं आहे.
****
भारतीय
आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरने कोविड - १९च्या चाचण्यासंदर्भात सुधारित धोरण
जारी केलं आहे. गेल्या चौदा दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या व्यक्ती, संसर्ग
झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, संसर्गाची लक्षणं दिसत असलेले डॉक्टर
तसंच आरोग्य कर्मचारी, तसंच श्वसनाच्या गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांचीही आता कोरोना
विषाणू संसर्ग चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती कोरोना विषाणू बाधित झाल्यानंतर
पाचव्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत रुग्णाच्या संपर्कात आलेले आणि अतिजोखीम असलेल्या
व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसतील, तरीही कोरोना संसर्ग चाचणी केली जाणार आहे.
हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधले श्वसनाचे गंभीर आजार असलेले रुग्ण, शंभर फॅरेनहाईटपेक्षा
तीव्र तापाचे रुग्ण, तसंच खोकला असलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्याचे निर्देश आयसीएमआरने
दिले आहेत.
****
अमरावती इथं कोविड
19 आजारासंबंधी चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा आठवडाभरात कार्यान्वित होणार आहे. डॉ.
पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली
असल्याचं, अधिष्ठाता डॉ. पी. आर. सोमवंशी यांनी
सांगितलं. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाकडून
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना संसर्ग चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात
आली आहे. यासाठी ५० लाख रुपये निधी जिल्हा नियोजनातून देण्यात आला आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात
रुग्णालयात उपचार घेणारे १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, उर्वरित
दोन रुग्णांना आज सुटी दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण २१ रुग्ण कोरोना विषाणू बाधित
होते. यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यातले ०७ रुग्ण आज कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. या सर्वांना आज बूथ
हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १० जणांवर उपचार सुरू
आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
****
औरंगाबाद इथं
आतापर्यंत ३२२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं घरी परतले आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या आज १ हजार २१ वर पोहोचली, यापैकी ३२ रुग्णांचा आतापर्यंत
मृत्यू झाला आहे
****
गडचिरोली जिल्ह्यात
संस्थात्मक विलगीकरण केलेल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ५ झाली आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
*****
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी मनाला वेदना देणारी
असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मतकरी यांनी लहानांचं
भावविश्व साकारलं, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केलं, या शब्दांत
मुख्यमंत्र्यांनी मतकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सांस्कृतिक
कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करताना, साहित्यिक,
नाटककार, दिग्दर्शक, चित्रकार, आस्वादक, अशा एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र
मुकला, अशी भावना व्यक्त केली. मतकरी यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रात
भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं, देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं
आहे. मतकरी यांचं काल रात्री निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते.
****
शेतकऱ्यांच्या
कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वास, राज्याचे वैद्यकीय शिक्षण
आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिलं
आहे. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात पानगाव इथं व्यंकटेश जिनिंग प्रेसिंग मध्ये
शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ देशमुख यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत
होते. जिल्ह्यातल्या अहमदपूर, जळकोट आणि उदगीर तालुक्यातल्या ४ हजार ३१४ कापूस उत्पादक
शेतकऱ्यांनी पानगाव इथं कापूस खरेदी केंद्रात नोंद केली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी
बी-बियाणे आणि खताची टंचाई भासणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, ग्रामीण
भागात रोजगार हमी योजनांची कामं तत्काळ सुरु करावीत, पाणी टंचाई आणि शेतीच्या कामास
प्रथम प्राधान्य देण्यात यावं, अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी केल्या.
****
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक तसंच शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांनी ‘पीएम केयर्स निधी’ ५१ लाख रुपये मदत जमा केली आहे. संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण
यांनी आज या निधीचं पत्र औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त सुनील
केंद्रेकर यांच्याकडे सुपूर्द केलं. यावेळी आमदार संजय शिरसाठ, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर उपस्थित होते. गेल्या आठवड्यात
मुख्यमंत्री सहायता निधीतही ५१ लाख रुपये मदत जमा केल्याचं
चव्हाण यांनी यावेळी सांगितलं
****
जालना
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात
आला आहे. मात्र असं असूनही या भागातले नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. प्रतिबंधित
क्षेत्रातल्या नागरिकांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहावं. अत्यावश्यक कामासाठी बाहेर
पडताना मास्क वापरावा, तसंच शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे.
****
संचारबंदीच्या काळात तरुणांना महात्मा गांधी राष्ट्रीय
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे लातूरचे
जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे. केंद्र सरकारने यासाठी ४० हजार कोटीचे
पॅकेजही जाहीर केलं असून याअंतर्गत शेतकऱ्यांना आणि मजुरांना काम मिळवून द्यावं अशी
मागणी सस्तापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या अर्धापूर तालूक्यातील पिंपळगाव महादेव इथल्या यशोदाबाई खंडागळे यांना
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
शिक्षक शिवा कांबळे यांनी अन्नधान्याची मदत केली आहे. यशोदाबाई ह्या सैन्य दलातील हुतात्मा
सैनिक शंकर खंडागळे यांच्या आई असून, संचारबंदीच्या काळात अडचण निर्माण झाल्यानं, त्यांना ही मदत करण्यात आली.
****
परभणी इथं संचारबंदी काळात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची
जप्त केलेली वाहनं, २०० रुपये दंड आकारून सोडण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. संबंधित वाहनधारकांनी उद्यापासून आपली वाहनं योग्य कागदपत्रे दाखवून सामाजिक
अंतराच्या नियमाचं पालन करत सोडवून न्यावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे. यानंतरही रस्त्यांवर
विनाकारण फिरतांना आढळल्यास मोटार वाहन कायद्या प्रमाणे संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात
येईल असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनानं दिला आहे. पोलिस प्रशासनानं एकूण १ हजार ७५८
दुचाकी, तर १५७ चारचाकी वाहनं जप्त केलेली आहेत.
****
जालना
इथं बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या तसंच जिल्ह्याबाहेर जाण्यास इच्छुक नागरिकांची जिल्हा
सामान्य रुग्णालयात तपासणी करून आरोग्य प्रमाणपात्र दिलं जात आहे. यासाठी नागरिकांनी
या रुग्णालयाबाहेर आज रांगा लावल्याचं दिसून आलं.
****
नाशिक जिल्ह्यात संचारबंदीच्या
काळात नियमांच पालन करुन पाच हजाराहून आधिक औद्योगिक आस्थापन आणि कारखाने सुरू करण्यात
आले आहेत. यामुळे ६० हजाराहून अधिक कामगारांचा रोजगार सुरू झाला आहे.
२० एप्रिल नंतर महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाने ४४६ कंपन्याना आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पाच हजार औद्योगिक आस्थापनांना काम सुरू
करण्यास परवानगी दिली आहे.
****
सोलापूर जिल्ह्याच्या
पंढरपूर तालुक्यातील पुळूज इथले जवान धनाजी होनमाने यांच्या पार्थिव देहावर जिल्हा परिषद
शाळेच्या पटांगणात आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. होनमाने यांना
गडचिरोली इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment