Saturday, 30 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२० दुपारी १.०० वा.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात कोरोना विषाणूचे अठ्ठावीस नवे रुग्ण आढळले आहेत. भवानी नगर, जुना मोंढा इथं पाच, उस्मानपुरा चार, जुना बाजार, सुराणा नगर, नारळी बाग, शिवशंकर कॉलनी, रोशन गेट परिसर इथं प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मुझफ्फर नगर, हडको, व्यंकटेश नगर, हमालवाडी, न्यू वस्ती जुनाबाजार, मनजीत नगर, आकाशवाणी परिसर, शिवाजी नगर, रेहमानिया कॉलनी, नारेगाव परिसर, न्याय नगर या भागांमधे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. यात अठरा पुरूष आणि दहा महिला रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता ‍एक हजार चारशे सत्त्याऐंशी झाली आहे. यातील नऊशे सदोतीस रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात सध्या चारशे एक्क्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी आणि  परिचारिका तसंच वडगाव कोल्हाटी इथल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण बेचाळीस जणांना याची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या तपासणी अहवालात हे स्पष्ट झालं असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांनी दिली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचा आणखी एक रूग्ण आढळला आहे. जिल्हयातल्या  रुग्णांची संख्या आता एकशे चव्वेचाळीस झाली आहे. आज सकाळी एकशे अठ्ठावीस रूग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील एकशे नऊ जणांना याची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पाच जणांचे अहवाल प्राप्त व्हायचे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. 
****

 नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे पंधरा रुग्ण आज आढळले असून या रुग्णांची संख्या एक हजार एकशे सहासष्ट झाली आहे. यात मालेगांव मधील ७६३ नाशिकमधील एकशे एकोणऐंशी आणि अन्य भागांतील १६८ रुग्ण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. जिल्हा बाहेरच्या ५६ रुग्णांवरही नाशिकमधे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकसष्ट रुग्णांपैकी ४८ मालेगांवचे आणि आठ शहरातले आहेत. नाशिक जिल्ह्यात या विषाणूचे सातशे श्यहाऐंशी रुग्ण बरे झाले असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणू चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरु केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ही प्रयोगशाळा  सुरु करण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. येत्या २० ते २५ दिवसांत ही प्रयोगशाळा सुरू होईल, असंही त्यांनी कणकवली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. 
****

 रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातल्या राजवाडी इथं मुंबहून परतलेल्या चाकरमान्यांचं आज आरती ओवाळून गावात स्वागत करण्यात आलं. मुंबईहून आल्यावर त्यांना चौदा दिवस कोरोना विषाणू प्रतिबंधाची खबरदारी म्हणून गावातल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष आज पूर्ण झाल्याबद्दल देशवासीयांना पत्र लिहीलं आहे. आपल्या सरकारनं मिळवलेल्या यशाचा यात उल्लेख करताना त्यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला परतवून लावण्याचा देशाचा संकल्प याद्वारे जाहीर केला आहे. देशवासीयांच्या आशा आणि आकांक्षांना पूर्ण करण्याकडे देशाचा मोठ्या गतीनं प्रवास सुरू असून याच वेळी वैश्र्विक महामारी कोरोना विषाणूच्या संकटानं आपल्या देशाला ग्रासलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देश एकीकडे आर्थिक संसाधनं आणि आधुनिक आरोग्य सुविधांनी संपन्न असताना दुसरीकडे विशाल लोकसंख्या आणि मर्यादित संसाधनांच्या समस्येनं देशाला घेरलं असल्याचं पंतप्रधानांनी या पत्रात नमुद केलं आहे.  
****

 पाकिस्तानी लष्करानं आज जम्मू काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबार केला. सकाळी दहा वाजता हा गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे. पाकिस्तानी लष्करानं विनाकारण हा गोळीबार सुरू केला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा गोळीबार सुरूच होता असं या प्रवक्त्यानं  सांगितलं आहे.
****

 ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं आज ठाण्यामधे दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६० वर्षाच्या होत्या. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचं त्यांनी संपादन केलं होतं. `मी:स्मिता पाटील`, `नूतन`, `”तें’ची प्रिया` ही त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. `उजळल्या दाही दिशा`, `झाले मोकळे आकाश` या दोन कादंबऱ्याही ललिता ताम्हणे यांनी  लिहिल्या आहेत.
*****
***

No comments: