Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
राज्याच्या
प्रतिबंधित- कंटेनमेंट क्षेत्र वगळता अन्य भागात विविध व्यवहार
सुरू करण्यास राज्य सरकारची
परवानगी. शाळा, महाविद्यालयं बंदच राहणार.
Ø राज्यातल्या
५२
हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं
वितरण सुरळीत सुरु. अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ.
Ø
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांची जयंती साजरी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी
केलं अभिवादन.
आणि
Ø
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूरसह अनेक
ठिकाणी मोसमी पावसाची हजेरी.
****
प्रतिबंधित- कंटेनमेंट
क्षेत्र वगळता अन्य भागात विविध व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य
सरकारनं आज घेतला आहे. या संदर्भातल्या मार्गदर्शक
सूचना आज राज्य सरकारनं जारी केल्या.
राज्यातल्या सर्वाधिक
रूग्णांची संख्या आणि कंटेनमेंट क्षेत्र असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रासह, पुणे, सोलापूर,
औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, आणि नागपूर या महानगरपालिकांच्या
हद्दीत विविध व्यवहार सुरू करण्यासही राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. या महानगरपालिकांच्या
क्षेत्रात पहिल्या टप्प्यात येत्या ३ जून म्हणजे बुधवारपासून काही अटींवर समुद्र किनारे, सार्वजनिक किंवा खाजगी मैदानं, बागांमध्ये
शारिरीक व्यायाम करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये सायकलिंग, धावणे, चालणे यासारख्या व्यायामांचा समावेश आहे.
प्लंबर, इलेक्ट्रीशियन,
पेस्ट कंट्रोल आणि तांत्रिक स्वयं रोजगार व्यवसाय करणाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा
वापर आणि एकमेकांत अंतर ठेऊन व्यवसाय करण्यास, वाहन दुरूस्तीचे गॅरेज आणि वर्कशॉपही
सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व शासकीय कार्यालयं
१५ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात पाच जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी पाच
वाजेपर्यंत मॉल्स आणि व्यापारी
संकुलं वगळता सर्व दुकानं आणि बाजारपेठा एकदिवस एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची या आधारावर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कपड्यांच्या
दुकानातल्या ट्रायल रूम्स बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एकदा खरेदी केलेले
कपडे बदलण्यासही परवानगी असणार नाही.
टॅक्सी, रिक्षा, चारचाकी वाहनातून चालकासह दोन
व्यक्तींना, तर दुचाकीवर केवळ एका व्यक्तीलाच प्रवासाची
परवानगी देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्याला आठ
जूनपासून प्रारंभ होईल, या टप्प्यात सर्व खाजगी कार्यालय १० टक्के कर्मचाऱ्यांच्या
उपस्थितीत सुरू करता येतील.
शाळा, महाविद्यालयं,
शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय विमान सेवा,
मेट्रो रेल, चित्रपट गृहं, जिम्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह,
मद्यालयं, प्रेक्षागृहं, सभामंडप तसंच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य गर्दी होणारे कार्यक्रमांवर राज्यभर बंदी कायम असणार आहे. याशिवाय धार्मिक आणि प्रार्थना
स्थळंही बंदच राहणार आहेत. सलून, ब्युटीपार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट
आणि इतर अतिथी सेवांवरही राज्य सरकारनं बंदी कायम
ठेवली आहे. या सेवा वगळता अन्य सर्व सेवा राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात
आली आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची
आज जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या
मातोश्री निवासस्थानी पुण्यश्लोक
अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं. प्रजेच्या
सुखासाठी अहिल्यादेवींनी दानधर्माच्या माध्यमातून अनेक चांगली कामं केली, जी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष
देतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही अहिल्यादेवींना अभिवादन केलं. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा,
हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्यातल्या ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरु असून
मे महिन्यात ७३ लाख ६५ हजार ४०० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी
पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
तसंच या
काळात ३२ लाख ७७ हजार ७७८ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलं असून, पंतप्रधान गरीब कल्याण
अन्न योजनेत एप्रिल ते जून या काळात प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ५ किलो तांदूळ, तसंच
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला १ किलो तूर किंवा चणा डाळ मोफत देण्याची योजना सुरु असल्याची
माहिती ही भुजबळ यांनी दिली. टंचाई
भासवून चढ्या दरानं धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मराठवाड्यात अनेक ठिकाणी
आज मोसमी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड
तालुका परिसरात दुपारी ४ वाजेनंतर
वादळी वारा, मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार इथंही आज ५ वाजेच्या सुमारास पावसाच्या
सरी कोसळल्या. जालना जिल्ह्यातल्या
भोकरदन तालुक्यातल्या राजूर परिसरात सुमारे अर्धातास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली.
लातूर जिल्ह्यातल्या लातूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतही आज ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातल्या
नर्सी नामदेव परिसरात काही वेळापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. बीड
जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातही आज विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं येत्या तीन दिवस मराठवाड्यात
मोसमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
गंगापूर इथं असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या वखारीला काल रात्री लागलेली आग पूर्णपणे
विझवण्यात आज दुपारी यश आलं. औरंगाबाद महानगर पालिकेच्या दोन, तर गंगापूर नगरपरिषदेच्या
एका बंबाच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणायला अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाच
तास लागले. या भीषण आगीमुळे गोदाम पूर्णपणे कोसळलं. या घटनेत जीवित हानी झाली नसली,
तरी सोयाबीन, तांदूळ, कापसाच्या गाठी, तूर आणि मका मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याची
माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
परतूर तालुक्यातल्या मापेगाव इथल्या ४५ वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल आज सकाळी कोरोना
विषाणूग्रस्त असा आला आहे. जालना तालुक्यातल्या गोलापांगरी इथल्या एका अंगणवाडी सेविकेचा
अहवालही कोरोनाबाधित असा आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी
दिली. मापेगाव इथला रुग्ण परवा दुपारी न्यूमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा
सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. काल पहाटे या रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार
सुरू असताना मृत्यू झाला होता. जालना जिल्ह्यातला कोरोना विषाणुमुळे झालेला हा पहिला
मृत्यू आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज
आणखी दोन कोरोनाविषाणू बाधित रूग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात एकूण कोरोनाविषाणू बाधित
रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. हे दोन्ही रूग्ण मुखेड तालुक्यातल्या भेंडेगाव इथले
आहेत. ते मुंबईहून नुकतेच परतले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १०३ रूग्ण बरे होऊन
घरी परतले आहेत, तर ३५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड शहरात प्रतिबंधित
क्षेत्रामधल्या नागरिकांना
मानसिक आधार देऊन त्यांचं समुपदेशन करण्यासाठी इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातल्या
सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्या भागात हे तज्ज्ञ फिरून समुपदेशन करतील,
अशी माहिती जिल्हाधिकारी
डॉ. विपिन ईटनकर यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या
प्रत्येक कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या त्या भागतल्या
नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार असल्याचं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी
सांगितलं आहे. या भागांमध्ये एकेका महिला अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या अधिकाऱ्याकडे आपल्या मागण्या आणि समस्या वैयक्तिक पातळीवरही नोंदवता येणार आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्हाट्सअप ग्रुपची सुरुवात करणारा लातूर जिल्हा राज्यात एकमेव
असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता परभणी जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक
उपाययोजना म्हणून, उद्या एक
जूनपासून पुढील आदेशापर्यंत दुपारी
तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त कोणालाही
फिरता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकानं आणि आस्थापना सुरू करण्यासंदर्भात दिवस, वेळ आणि वार निश्चीत
करण्यात आले असून, सकाळी ७ ते दुपारी
३ वाजेपर्यंतच हे व्यवहार सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर
शहरात आज तीन कोरोनाबाधित रुग्ण
आढळून आले. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातली कोरोना बाधितांची संख्या आता एकोणसाठ वर
पोहोचली आहे. त्यापैकी ३३ रुग्ण बरे
झाले असून, २३ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment