Saturday, 23 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.05.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख पंचवीस हजार १०१ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यामुळे तीन हजार सातशे वीस जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमधे याची लागण झालेल्यांची संख्या सहा हजार सहाशे चोपन्न झाली असून आता पर्यंतची ही सर्वाधिक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमधे देशातील सर्वाधिक ६३ मृत्यू झाले आहेत. 
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवे २३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता १२४१ झाली आहे. शहरातल्या सादाफ नगर, रेहमानिया कॉलनी महेमूदपुरा, औरंगपुरा ,एन-८ ,एन-४, गणेश नगर , बायजीपुरा, एमजीएम परिसर, सिडको एन 5, हडको एन १२, पहाडसिंगपुरा, भवानीनगर आणि गंगापूर तालुक्यातल्या वडगाव कोल्हाटी इथं प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. औरंगाबाद शहरातील ठाकरे नगर, पुंडलिक नगर इथं प्रत्येकी दोन, न्याय नगर , बजरंग चौक एन सात इथं प्रत्येकी तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात सहा महिला आणि सतरा पुरुषांचा समावेश असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे तीन नवे रुग्ण आज आढळले आहेत.  आज सकाळी ८८ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात ही माहिती समोर आली आहे. हे तिनही रुग्ण नांदेड शहरातल्या कुंभार टेकडी परिसरातले असून, ते एका बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली  आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबहून परतलेले आहेत. यापैकी एक जण औंढा नागनाथ इथं विलगीकरण कक्षात असून अन्य पाच जणांना वसमत इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १०७ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून यापैकी ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर अठरा जण उपचार घेत  आहेत.
*****

 सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे चाळीस रुग्ण आज आढळले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*****
***

No comments: