Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** देशभरात दोन महिन्याच्या खंडानंतर कालपासून विमान सेवेला प्रारंभ
** दहा दिवसानंतर विमानातलं मधलं सीट रिकामं ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
** राज्यात काल आणखी दोन हजार ४३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद तर ६० जणांचा मृत्यू
** औरंगाबादमध्येही पाच रूग्णांचा मृत्यू तर २० नवे रूग्ण तर ८९ रूग्णांना उपचारानंतर सुटी
** जालना, नांदेड आणि हिंगोलीत रूग्णांच्या संख्येत वाढ
** राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा
आणि
** मराठवाड्यात उष्णतेची लाट; नागरिकांनी दक्षता घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना
****
देशभरात दोन महिन्याच्या खंडानंतर कालपासून विमान सेवेला प्रारंभ झाला. दिल्लीतून पहिलं विमान हे काल सकाळी पावणे पाच वाजता पुण्यासाठी रवाना झालं. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरूनही देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली. दोन महिन्यांच्या खंडानंतर या विमानतळावरून दररोज ५० विमानांच्या उड्डाण तसंच अवतरणाला परवानगी देण्यात आली आहे. ८० वर्षांपेक्षा वयस्कर नागरिक, आजारी असलेले लोक आणि गर्भवतींना सध्याच्या परिस्थितीत प्रवास टाळण्याचा सल्ला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने दिला आहे. राज्य सरकारनं परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक मानक प्रकिया निश्चित केली आहे. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे. या मानक प्रकियेनुसार येणाऱ्या प्रवाशांना विविध नियमांचं पालन करत १४ दिवस आपल्या घरीच विलगीकरणात राहावं लागणं बंधनकारक केलं आहे. काल दिवसभरात ४७ विमानांनी मुंबईत ये-जा केली, यातून चार हजार ८५२ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईतून तीन हजार ७५२ प्रवासी इतरत्र गेले तर अकराशे प्रवाशी मुंबईत आले.
कालपासून सुरू होणारी हैदराबाद- शिर्डी विमानसेवा स्थगित करण्यात आली. राज्य सरकारनं असमर्थता दर्शवल्याने हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान काल रद्द करण्यात आलं. २९ प्रवाशांनी या विमानात प्रवासाचं आरक्षण केलं होतं, यामध्ये जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद, जिल्ह्यातल्या प्रवाशांचा समावेश होता. औरंगाबाद विमानतळावरून मात्र एकाही विमानाचं उड्डाण झालं नाही.
****
एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांसह प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतर मधलं आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकारनं विमान वाहतूक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीची परवानगी दिल्यानंतर विमान वाहतूक कंपनीकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन होत नसल्याची तक्रार करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. यायाचिकेच्या सुनावणी दरम्यानं न्यायालयानं हे आदेश दिले. यासंदर्भात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला या नव्या परिपत्रकाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याकरता दोन जूनपर्यंत अवधी दिला आहे.
****
विदेशातून विमान, जहाज आणि रस्ते मार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांकरता आरोग्य मंत्रालयानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक आहे यात सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा समावेश आहे. यासाठी येणारा खर्च प्रवाशांन स्वत: करायचा आहे.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ४३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ इतकी झाली आहे. काल दिवसभरात या आजारानं ६० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एक हजार ६९५ रुग्ण मृत्यू पावले आहेत. काल एक हजार १८६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून ६९५ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होऊन घरी परतले आहेत. या विभागात १ हजार ५०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत ****
औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कटकट गेट इथली ५५ वर्षीय महिला, गारखेडा इथला ४८ वर्षीय पुरुष, रोहीदास नगर इथली ३५वर्षीय महिला, कैलास नगरमधली ७५ वर्षीय महिला आणि सिल्लोड शहरातल्या अब्दलशहा नगर इथल्या ५५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या एक हजार ३०५ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये हडको एन ११ परिसरातल्या सुभाषचंद्र नगर इथं चार, भवानी नगर इथं दोन, रोशन गेट, हुसेन कॉलनी, बायजीपुरा, इटखेडा, अल्तमश कॉलनी, जवाहर नगर, शाह बाजार, सिडको एन सहा परिसरातलं मयूर नगर, राम नगर, गजानन मंदिर परिसर, जहांगीर कॉलनी, रोहिला गल्ली, समता नगर, जुना मोंढा इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे.
दरम्यान, काल ८९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत औरंगाबाद शहरात ७७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ४७६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी १३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. बाधितांमध्ये शहरातल्या जुना जालना भागातल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर जालना तालुक्यातल्या नूतनवाडी इथले दोन, अंबड तालुक्यातल्या मठपिंपळगाव इथं दोन, शिरनेर इथं एक, मंठा तालुक्यातल्या हनुमंतखेडा आणि कानडी इथं प्रत्येकी एक, तर परतूर शहरातला एक रुग्ण आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या १३३ झाली आहे. काल सापडलेल्या रुग्णांमध्ये नांदेडच्या इतवारा भागातले दोन, मित्तलनगर, आनंद कॉलनी जिजामाता कॉलनीत प्रत्येकी एक, तर किनवट तालुक्यातल्या देहली तांडा, माहूर तालुक्यातल्या वडसा इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे. या रुग्णांपैकी एका रुग्णाचा काल मृत्यू झाला, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात या आजारामुळे मरण पावलेल्यांची संख्या सात झाली आहे.
दरम्यान, अनिवासी भारतीय यात्री निवासातल्या कोविड सुश्रुषा केंद्रातले चार रूग्ण बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
हिंगोली तालुक्यातल्या पहेनी इथं मुंबईहून परतलेल्या एका तीस वर्षीय महिलेस कोरोना विषाणूची बाधा झाली. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या १६० झाली आहे. यापैकी ९० जण बरे झाले आहेत.
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातल्या कामठा इथं विलगीकरणात असलेल्या एका महिलेचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल येण्यापूर्वीच ती विनापरवाना गाव सोडून नांदेडला निघून गेल्याचं समोर आलं. या महिलेविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल कोरोना विषाणूची लागण झालेले सात नवे रुग्ण आढळले आहेत. यात एका रुग्णाचा १० दिवसांनंतरचा दुसरा अहवाल बाधित आला आहे. अकोले तालुक्यात लिंगदेव इथं आलेल्या घाटकोपर इथल्या व्यक्तीचा अहवालही बाधित आला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या बाधित व्यक्तींची संख्या आता ८० झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली.
****
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, पुढील उपचारासाठी ते काल मुंबईला रवाना झाले. त्यांना ब्रीज कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी चव्हाण यांच्या दूरध्वनीवरुन चौकशी केली. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी ही माहिती दिली.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजेपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश काढले. इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक परभणी जिल्ह्यात येत आहेत. तपासणीनंतर यापैकी काही व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून येत असल्यामुळे, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. परभणी शहर महानगरपालिका आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर, जिल्ह्यातल्या सर्व नगर परिषद, नगर पंचायत हद्द आणि तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू राहील. अत्यावश्यक सेवांना यापूर्वी देण्यात आलेली सूट या संचारबंदीतही कायम राहील. या काळात कोणीही व्यक्ती, वाहने रस्त्याने, बाजारामध्ये घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
****
नाशिक शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत बाजार समिती आवारात स्वच्छता मोहीम आणि जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. या बाजार समितीतून मुंबईच्या बाजारात भाजीपाला पुरवला जातो.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा पद्धतीनं अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते म्हणाले..
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मला काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या आम्ही अभ्यास करायचं की अभ्यास करायचा नाही मला सगळ्याच विद्यार्थ्यांना एक विनंती करायची की आपण जो अभ्यास करतो तो आपल्यासाठी शिक्षण आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरते त्याच्यामुळे परीक्षा रद्द झाली का परीक्षा झाली नाही तरीसुद्धा अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आपलं आहे.कोविडच्या संकंटात सुद्धा आपण घरात बसून वेगवेगळ्या प्रकारच Knowledge मिळवणं हे देखील स्वत:साठी Achievement असू शकतं माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करायची की परीक्षा रद्द करण्याचा किंवा तुमच्या बाबतीतला हिताचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेतील हा विश्वास मला पण द्यायचं
अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीनं दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल आणि शासनास सादर करावा, अशा सूचना दूरदृष्यसंवाद प्रणाली माध्यमातून कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या आमंत्रणावरून घेतलेली ही सदिच्छा भेट होती, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांना सांगितलं. या बैठकीत कोणत्याही राजकीय मुद्यांवर चर्चा झाली नाही, असंही पटेल यांनी सांगितलं.
दरम्यान, या भेटीनंतर पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्भवलेली स्थिती, याशिवाय राजकीय विषयावरही या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं सामना या दैनिकांन दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकार चालवण्याची क्षमता नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आपण राज्यापालांकडे केली असल्याचं राणे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत अडकलेल्या विविध जिल्ह्यातल्या ६८३ प्रवाशांचं काल सकाळी साडेनऊ वाजता मदुराई एक्सप्रेसमधून परभणी रेल्वेस्थानकावर आगमन झालं. यात बीड जिल्ह्यातले ३१०, हिंगोलीतले ६०, वाशिममधील २९, यवतमाळ इथले ४, लातूर इथले २५, उस्मानाबादचे २०, नांदेडमधले ९, परभणीतले १९७, बुलडाण्यातले २५ आणि जालना जिल्ह्यातल्या ३ प्रवाशांचा समावेश आहे. संबंधित जिल्हा स्थानावरुन आलेल्या बसद्वारे हे प्रवाशी आपल्या मूळ गावी रवाना झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली.
****
नांदेड इथून एक हजार २९ प्रवाशी घेऊन विशेष श्रमिक रेल्वे काल सकाळी साडे अकरा वाजता बिहारकडे रवाना झाली. ही गाडी पाटणा, गया, मार्गे अरारी रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार आहे. गाडीतल्या एक हजार ४६० प्रवाशांची तिकिटं नांदेड जिल्हा प्रशासनानं काढली होती. यापैकी एक हजार २९ प्रवासी रवाना झाले. गाडीत मागील अडीच महिन्यापासून नांदेडच्या लंगर साहेब गुरुद्वारात अडकून पडलेल्या १५० पेक्षा आधिक प्रवाशांचा समावेश होता.
दरम्यान, नांदेड इथून आज पश्चिम बंगालमध्ये जाणारी विशेष श्रमिक रेल्वे पश्चिम बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे आणि रेल्वे विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली आहे. पुढील रेल्वेची व्यवस्था कामगारांना नंतर कळवण्यात येईल, असं अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितलं.
****
कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या मुस्लीम बांधवांनी काल रमजान ईदची नमाज आपापल्या घरीच सामाजिक अंतर पाळत अदा केली. यंदा गळाभेट आणि हस्तांदोलन करण्याचे टाळून एकमेकांना दुरूनच शुभेच्छा देण्यात आल्या.
लातूर जिल्ह्यात ईद उल फित्रची नमाज ईदगाहवर पठण न करता, मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली. उस्मानाबादमध्येही रमजान ईदचा सण घरातच नमाज पठण करून साजरा करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात पाथरी इथं शारीरिक अंतर राखून रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातल्या पाथरी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी, तरबेज खान रहेमान खान दुर्राणी, तारेख खान अब्दुल्ला खान दुर्राणी यांच्यासह एकूण १२५ जणांविरूध्द सामूहिकरित्या नमाज पठण केल्याबद्दल तसेच संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १७ आरोपींची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
औरंगाबाद इथंही सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळत इदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यात सर्व आस्थापना, दुकानं सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश काल जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जारी केले. क्रिडासंकुलं, क्रिडांगणं आणि इतर सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तीक व्यायामासाठी खुल्या राहतील, मात्र प्रेक्षक गॅलरी तसेच सामूहिक क्रिडा प्रकार हे बंद असतील. कोरोनाविषाणू विषयक सर्व नियमावली आणि सामाजिक अंतराविषयक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर सर्व शारिरिक कसरती, व्यायाम, आणि तत्सम कृतींना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, सलून यांना देखील सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
****
लातूर इथं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंगतर्फे काल महापालिका कर्मचाऱ्यांना कोविड-१९ विषाणूशी प्रादुर्भाविरुध्द उपाय म्हणून रोगप्रतिकारक, शक्तीवर्धक शक्ती ड्रॉपचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपायुक्त वसुधा फड, मंडल अधिकारी संजय कुलकर्णी उपस्थितीत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या अनदूर इथल्या प्रभाकर धुमाळ यांनी टाळेबंदीच्या काळात त्यांच्या नऊ दुकान गाळ्यांचं एक महिन्याच भाडं माफ केलं आहे. नव्यानं उद्योग करणाऱ्या या तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…
लॉकडाउनमुळं दुकान बंद राहीलनं यांना अडचणीत सापडलेल्या या नवउद्योजकांना श्री धुमाळ यांनी एक महिन्याचा १८ हजार रुपयांचे भांडे माफ केले आहे या अडचणीच्या काळात माणुसकीच्या भावनेला नवउद्योजकांना आधार देत इतर दुकानांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
मराठवाडा आणि विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात काल सर्वाधिक ४६ पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं.
मराठवाड्यात काल परभणी इथं सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. नांदेड आणि हिंगोली इथं सरासरी ४५, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद सरासरी ४३, जालना ४२ पूर्णांक चार, तर लातूर इथं ४१ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातल्या सर्वच भागात उष्णतेची लाट आली असून, नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
****
नांदेड इथं मातंग ग्रुप डेव्हलपमेंट परिवार आणि रशिया ग्रुप नांदेड यांच्या वतीने काल शहरातल्या हमालपुरा, गांधीनगर आणि पंढरपूर नगरातल्या ६५ गरजू आणि गरीब समाजबांधवांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, साबण आदि साहित्याचा यामध्ये समावेश होता
****
चालू खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात बँकातर्फे पीक कर्ज वाटप सुरू आहे. कोरोनो विषाणू प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी माहिती दिली ते म्हणाले..
कोविडच्या काळामध्ये पीक कर्जासाठी अर्ज करता येईल अशी फॅसिलिटी औरंगाबाद जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे Link address आहे तो http://kcp. setuonline.com/ या address वर जाऊन पत्ती शेतकरी स्वतः वन नंबर टाकून आधार नंबर टाकून त्या ठिकाणी पीक कर्जाची मागणी नोंदवू शकतो सगळ्या बँकांना अर्ज करण्यासाठी त्यांना त्याबद्दल सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर बॅंका शेतकऱ्यांना मेसेज पाठवून वेळ आणि तारीख घेऊन त्याप्रमाणे त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बँकेमध्ये सह्या करण्यासाठी बोलतील आणि कर्ज वाटप केले जाईल
ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला नव्हता, अशा सर्व शेतकऱ्यांना या संकेतस्थळावरून सदर योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पूर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह तुळशीराम ठाकूर यांचे काल दीर्घ आजारानं निधन झालं. काल दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
****
परभणी जिल्ह्यात आरोग्य विभाग अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी आज, उद्या आणि परवा थेट मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी २६ ते २८ या कालावधीत संचारबंदी लागू केल्यामुळं या मुलाखती २९ आणि ३० मे रोजी घेण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागानं कळवल आहे.
****
नांदेड शहरात महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोरोनाविषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर दीपोत्सव, मिरवणूक आदी कार्यक्रम रद्द करून शहरातल्या क्षेत्रीय समाज संघटनेच्यावतीनं नेरला कुष्ठधाम आश्रम आणि सुमन बाल महिला केंद्रात अन्नदान करण्यात आलं.
****
हिंगोलीच्या पोलिस जमादारास लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी बडतर्फ केलं आहे तर पोलिस निरीक्षकाविरूद्धही निलंबनाची कारवाई केली आहे. माळसेलू इथल्या एका तक्रारदाराचे अतिक्रमण काढून देण्यासाठी जमादार नंदकुमार मस्के याने २५ हजार रुपयाची लाच मागितली होती, यात २० हजार रुपये पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्यासाठी तर पाच हजार रुपये स्वत:साठी मागितले होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाई जाणवू लागली असून जिल्ह्यातल्या १२४ गावांसाठी १७८ विहीरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या १३ गावाना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये परंडा तालुक्यात आठ, भूम तालुक्यात तीन, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यात प्रत्येकी एक टॅंकर सुरु करून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं आज ‘जिल्हा परिषद आपल्या गावी’ हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं कळवण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्राम पंचायतींना भेट देतील. तसंच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढू नये, यादृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करणार आहेत.
***
आंतरजिल्हा प्रवासासाठीच्या ई-पासमध्ये फेरफार करत त्याची मुदत वाढवून प्रवास केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातल्या एका वाहन मालकावर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास इथापे असं आरोपीचं नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातल्या एरंडोलीचा रहिवासी आहे. गडचिरोलीनजिक पारडी नाक्यावर तैनात पोलिस आणि महसूल विभागाच्या वाहन तपासणी पथकानं ही बाब उघडकीस आणली.
****
ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंह यांचं काल सकाळी पंजाबमध्ये मोहाली इथं निधन झालं, ते ९६ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून ते विविध विकारांनी आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिंह यांच्या कारकिर्दीत भारतीय हॉकी संघाने १९४८, १९५२, आणि १९५६ मध्ये झालेल्या अनुक्रमे लंडन, हेलसिंकी आणि मेलबर्न इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात वैयक्तिकरित्या सर्वाधिक गोल करण्याच्या त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे. भारत सरकारने १९५७ साली त्यांना पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीरसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. बलबीर सिंह यांचा सर्वोत्तम खेळ सदैव लक्षात राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment