Tuesday, 26 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.05.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 May 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०२० सायंकाळी ६.००
****

Ø मराठवाड्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत ४१ ने वाढ; लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात आढळले नवे रुग्ण
Ø देशातला कोरोना विषाणू संसर्गाचा दर दोन पूर्णांक ८७ शतांश टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के 
Ø केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आतापर्यंत २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत - देवेंद्र फडणवीस
आणि
Ø जीएम बियाण्यांना परवानगी मिळावी यासाठी शेतकरी संघटनेचं २८ मे रोजी ई-मेल आंदोलन
****

  मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात  आज कोरोना विषाणू बाधा झालेले एकूण ४१ रुग्ण आढळले. यापैकी लातूर इथं १० रुग्ण आढळले असून, आता लातूर इथली रुग्णांची एकूण संख्या १०३ झाली आहे. बीड जिल्ह्यात आज दोन रुग्ण आढळले असून, आता जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४९ झाली आहे.
 उस्मानाबाद इथं आज तीन रुग्ण आढळले, यामुळे जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे. या पैकी ९ जणांना प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरित रुग्णांपैकी २७ जणांवर उस्मानाबाद जिल्ह्यात तर लातूर आणि सोलापूर इथं प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली.

बीड इथं आज २ जणांना कोरोना विषाणू लागण झाल्याचं आढळलं, त्यामुळे  आता जिल्ह्यातली रुग्णसंख्या ४९ झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात आज आणखी चार कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून  आले, त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या आता १३७ झाली आहे. आज आढळून आलेले सर्व चारही रूग्ण उमरी तालुक्यातले आहेत. १६ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सर्वांना ७ दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज २० कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८०० च्या वर रुग्ण बरे होवून घरी गेले असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

 दरम्यान, जिल्ह्यात आज २२ रुग्णांची वाढ झाल्यानं कोरोनाबाधितांची एकूण  संख्या १३२७ एवढी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 बुलडाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील एका ६० वर्षीय कोरोना विषाणू संशयित महिलेचा आज सकाळी लोणार ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिला आपल्या कुटुंबीयांसोबत २० मे रोजी मुंबईहून शारा या मूळगावी आली होती.
****

देशातला कोरोना विषाणू संसर्गाचा दर दोन पूर्णांक ८७ शतांश टक्के एवढा  असून, मृत्यू दर शून्य पूर्णांक ३ दशांश टक्के एवढा असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० टक्के मृत्यू वयोवृद्धांचे असल्यानं, वृद्धांची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना करत असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात दोन हजार ७६९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ६० हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

सध्या देशात सरकारी आणि खासगी अशा एकूण ६०० पेक्षा अधिक  प्रयोगशाळांमधून दररोज एक लाख दहा हजार कोरोना विषाणू संसर्ग नमुन्यांची चाचणी होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****

आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्तींच्या दृष्टीनं आधीच नियोजन करावं तसंच सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा बैठकीत बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं देखील हवामानाचा अंदाज पाहून  रेल्वे गाड्यांचे नियोजन करावं तसंच आवश्यक संरक्षण साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे तसंच गेल्या वर्षी कोल्हापूर सांगली भागात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातील पाण्याबाबत संबंधित विभागाशी समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळत नसल्याचे आरोप बिनबुडाचे  असून, गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध योजनांच्या माध्यमातून २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली असल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारनं गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत ४ हजार ५९२ कोटी रुपयांचं अन्नधान्य, प्रधानमंत्री किसान सन्मान आणि जनधनसह विविध योजनांमधून थेट ३ हजार ८०० कोटी रुपये, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत १ हजार ६२५ कोटी रुपयांची ७३ लाख १६ हजार गॅस सिलिंडर, श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी, तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १ हजार ६११ कोटी रुपये देण्यात आले असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.

आरोग्य सेवेसाठी २ हजार ५९ कोटी रुपये मदत करण्यात आली असून,  यामध्ये १० लाख पीपीई किट्स, १६ लाख एन 95 मास्क आणि ४४८ कोटी रुपये निधीचा समावेश असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

शेतमाल खरेदीसाठी एकूण ९ हजार ६९ कोटी रुपये केंद्राने राज्य सरकाला  दिले असून, यामध्ये कापूस खरेदीसाठी ५ हजार ६४७ कोटी, धान २ हजार ३११ कोटी, तूर ५९३ कोटी, चना १२५ कोटी तर पीक विम्यासाठीच्या ४०३ कोटी रुपये निधीचा समावेश असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी अंतर्गत आतापर्यंत प्राप्त झालेल्या करापैकी  महाराष्ट्राच्या वाट्याच्या १ हजार १४८ कोटी रुपयांऐवजी कराच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या अग्रीम वाट्यासह ५ हजार ६४८ कोटी रुपये केंद्राने महाराष्ट्र सरकारला दिला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. नोव्हेंबरनंतरच्या वाट्यासंदर्भात जीएसटी परिषद राज्यांसाठी अनुकूल निर्णय घेईल, अशी शक्यताही फडणवीस यांनी वर्तवली.

गृहनिर्माण, सुक्ष्म-लघू आणि मध्यम प्रकल्प, वीज महावितरण, रोजगार हमी  योजना, आदी योजनांच्या निधीतून तसंच अग्रीम आणि कर्जाच्या रुपात राज्य सरकारला सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होऊ शकतो, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी राज्य सरकारसंदर्भात केलेल्या  विधानावर फडणवीस यांनी टीका केली, सरकारमध्ये असून निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं म्हणणं, हे कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जबाबदारी झटकणं असल्याचं, फडणवीस यांनी नमूद केलं. ही सरकार बदलण्याची वेळ नाही, सरकार अस्थिर करण्याचा आपला कोणताही विचार नाही, सध्या कोरोना सोडून इतर विषयांकडे लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न होत असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५  शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्य तसंच २७ लाख २८ हजारावर शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यींना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जात आहे.   
****

भारतात जनुक सुधारित - जीएम बियाण्यांना परवानगी मिळवी यासाठी  शेतकरी संघटना येत्या २८ मे रोजी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधल्या संबंधीत मंत्र्यांना इमेल पाठवण्याचे आंदोलन करणार आहे. त्यानंतर च्या आठ दिवसात सरकारने जीएम बियाण्यांना परवानगी दिली नाही तर संघटनेमार्फत "मैं भी गुनेहगार" आंदोलनांतर्गत शेतकरी जाहीरपणे कापूस, सोयाबीन, मका, वांगी, मोहरी या पिकांच्या जीएम वाणाची लागवड करतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
****

 आगामी मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी आणि पूर्वनियेाजन करुन सज्ज राहण्याचे निर्देश औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय मान्सून पूर्वतयारी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात गोदावरी काठच्या एक हजार ५७२ गावांमध्ये विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, नोडल अधिकारी नियुक्त करावेत, नदीकाठच्या गावांमध्ये सरपंचाची बैठक घेऊन नियंत्रण व्यवस्थापन सज्ज ठेवावं, आदी सूचना आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाहेरील जिल्ह्यातून अथवा  परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती लपविल्यास अथवा विलगीकरणात न जाण्यास  राजकीय दबाव आणल्यास संबंधित कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असे निर्देश हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिले आहेत.
      ****

नांदेड शहराला ऊद्या पासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार  असल्याचं नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
*****
***

No comments: