Sunday, 24 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
राज्यातली सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता रेड झोनमधली विमानतळं सुरू करणं अत्यंत धोकादायक आहे, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. लाळेचे नमुने घेऊन चाचणी केल्याशिवाय प्रवाशांचं केवळ थर्मल स्कॅनिंग करणं पुरेसं नाही. रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणंही शक्य नाही. त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तिथला धोका वाढवणं चुकीचं आहे, असं त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात विमानसेवा सुरू होणं कठिण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विमानसेवा सुरू केल्यानंतर प्रवाशांना १४ दिवसांच्या विलगीकरणातून सूट देणं शक्य असल्याचं हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं होतं. पण अनेक राज्यांनी विलगीकरणाचे नियम शिथिल करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब आणि छत्तीसगड सरकारनंही देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याला विरोध केला आहे.
****
भारतीय रेल्वेकडून संपूर्ण देशात एक जूनपासून रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे.
प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही. या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावं लागेल आणि इतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट, पांघरूण, उशी, बेडरोल हे साहित्य मिळणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बधित रुग्णांमध्ये आज आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा साठ झाला आहे. नवीन रुग्णांमध्ये अंबड  तालुक्यातल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघांचा, जालना शहरातल्या एका खासगी रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्यासह पुष्पकनगरातील एका व्यक्तीचा आणि जालना तालुक्यातल्या निरखेडा इथल्या एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ४७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात नातेवाईकांच्या वादाचं रुपांतर मारामारीत झालं आणि यात दोन जणांची हत्या झाली. निलंगा तालुक्यातल्या बोळेगाव इथं आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईला राहणाऱ्या आणि नुकतच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एका जणाला घरात अलगीकरणात रहायला सांगितल्यानं वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहाजी पाटील आणि वैभव पाटील अशी मृतांची नावं आहेत. या घटनेसंदर्भात कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
****
सातारा जिल्ह्यात काल ७७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे साताऱ्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता २७८ झाली आहे. जिल्ह्यात सध्या १५८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
****
सांगली जिल्ह्यात आणखी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सांगलीत आतापर्यंत कोरोनाचे अठ्ठ्याहत्तर रुग्ण आढळले असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे. ४३ जण बरे झाले आहेत, तर ३३ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. काल रात्री उशिरा ४ जणांचे अहवाल कोरोनाबाधित असे आले आहेत. यापैकी दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात आणि दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, तर इतर १८ जणांवर उपचार सुरू आहेत.
****
अमरावती इथं आज पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात एका पाच वर्षीय बालिकेचा, तर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात परिचारिका असलेल्या एका महिलेचाही  समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १५७ इतकी झाली आहे.
****
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातल्या हातिया स्थानकाकडे श्रमिक विशेष रेल्वे काल रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून १ हजार ५४५ मजूर आणि कामगार झारखंडकडे रवाना झाले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीन प्रवाशांना अन्नाची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या, मास्क आणि सॅनिटायझरच वाटप करण्यात आलं.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...