Sunday, 31 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE –31 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
पाणी ही आपली एक जबाबदारी आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात गावागावात सोप्या पारंपरिक उपायांनी पाणी जिरवलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. येणाऱ्या पाच जून रोजी 'पर्यावरण दिना'निमित्त प्रत्येकानं आपापल्या परिसरात काही झाडं लावावीत, तसंच उष्णता वाढत असल्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी असंही ते म्हणाले.
कोरोनाच्या साथीच्या आजाराविरुद्ध देश लढा देत असतानाच, पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये अम्फानचा चक्रीवादळामुळे नागरिक, विशेषतः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तरीही जनतेनं मोठ्या धैर्यानं या परिस्थितीचा सामना केल्याचं सांगत, पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या नागरिकांच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच देशाच्या अनेक भागांमध्ये टोळधाडीनं केलेलं नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे कृषी विभाग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी  आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. नवीन शोधांवरही लक्ष देत आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
कोरोना विषाणूच्या साथीदरम्यान मोठ्या प्रयत्नांनी सावरलेली परिस्थिती पुन्हा बिघडू द्यायची नसेल, तर प्रत्येकानं परस्परांतलं ६ फुटांचं अंतर, चेहऱ्यावर मास्क आणि हात धुणे, या सावधगिरीच्या उपायांचं पालन करायचं आहे, हेही नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितलं.
****
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर आणि परिचारिकांना मानधन तत्वावर सेवेत घेण्यात यावं, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले आहेत. त्यानुसार ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरोगी आणि अंतर्वासिता पूर्ण केलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा ८० हजार रुपये मानधन दिलं जाईल. तसंच भूलतज्ज्ञ आणि अतीव दक्षता तज्ज्ञांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.
मुंबईतली परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर तातडीनं सेवेत घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३७ हजार ६५५ परवाने पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसंच राज्यभरात ५ लाख एकाहत्तर हजार ४३४ व्यक्तींचं विलगीकरण करण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
२२ मार्च ते २९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार राज्यात १ लाख १९ हजार २२२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २३ हजार ५३३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ९१ लाख ७४ हजार २७१ रुपयांचा दंड या कालावधीत आकारला गेला आहे. या दरम्यान पोलिसांवर हल्ले होण्याच्या २५५ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सकाळी ४२ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५४० झाली आहे. यापैकी नऊशे शहात्तर कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ७० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता चारशे चौऱ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
आज शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये भवानी नगर, जुना मोंढा इथल्या ४, कैलास नगर ३, एन-सहा सिडको ३, जाफर गेट, जुना मोंढा १, संजय नगर, मुकुंदवाडी १, रहीम नगर, जसवंतपुरा १, व्यंकटेश नगर, जालना रोड १, समता नगर १,  नवीन बायजीपुरा १, अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर १, किराडपुरा ३, पिसादेवी रोड १, बजाज नगर १, देवळाई परिसर १, नाथ नगर १, बालाजी नगर १, हमालवाडा १, जुना बाजार २, भोईवाडा १, मनजित नगर, आकाशवाणी परिसर २, सुराणा नगर १, आझम कॉलनी १, सादात नगर १, महेमूदपुरा, हडको १, निझामगंज कॉलनी १, शहागंज १, गल्ली क्रमांक २४ संजय नगर १, बीड बायपास रोड १, स्वप्न नगरी मधल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये २४ महिला आणि १८ पुरुष रुग्ण आहेत.
****

No comments: