Thursday, 28 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.05.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 May 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०२० सायंकाळी ६.००
****

Ø औरंगाबाद इथं कोविडचे नवीन ३८ तर जालन्यात नवीन २४ रुग्ण
Ø राज्यात आतापर्यंत २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू
Ø स्थलांतरित कामगारांचा प्रवासाच खर्च संबंधित राज्यांनी करावा, कामगारांकडून प्रवास भाडं घेऊ नये - सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Ø टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या गरीबांसाठी केंद्र सरकारनं तिजोरी उघडावी - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ांचं आवाहन
आणि
Ø महाराष्ट्रातल्या साडे ४०० किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आशियाई विकास बँकेकडून १७ कोटी ७० लाख डॉलर्सचं कर्ज
****

      औरंगाबाद जिल्ह्यात आज ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १ हजार ३९८ झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८६७ जण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून आतापर्यंत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातून आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. हे सर्व जण गंगापूरच्या फुलशिवरा इथले रहिवासी आहेत. या रुग्णांवर दहा दिवस उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याचं नोडल अधिकारी डॉ. सुदाम लगास यांनी सांगितलं. गंगापूरच्या या उपजिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या इथं तीन कोरोना विषाणू बाधितांवर उपचार सुरू असून एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याचं लगास यांनी सांगितलं.
****

 जालना जिल्ह्यात आज २४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या आता ११० झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव इथले सहा, काटखेडा इथल्या पाच, अंबड शहरातल्या शारदा नगरा पाच, बदनापूर इथं एक, राज्य राखीव दलातला एक पोलीस कर्मचारी आणि कोविड सुश्रषा केंद्रातल्या सहा जणांचा समावेश आहे.
****

 धुळे जिल्ह्यातील आणखी ४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली, त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १२४  झाली आहे. आज चार रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून आतापर्यंत ६५ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
****

 बुलडाणा इथं परदेशातन आलेला युवकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हा युवक १२ मे पासून विलगीकरणात होता, विलगीकरणाचा कालावधी पर्ण झाल्यानंतर त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या युवकाच्या संपर्कातील ९ जणांच विलगीकरण करण्यात आलं आहे.
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी सात व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यातली रुग्णांची संख्या २४ झाली आहे. त्यापैकी सात रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १७ जणांवर उपचार सुरू आहेत.
****

 अहमदनगर जिल्ह्यात आज ४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.

 दरम्यान, आज जिल्ह्यातून ४ जण कोरोना विषाणू मुक्त होऊन घरी परतले.
****

 राज्यात आतापर्यंत २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार ९५ पोलिसांना या आजाराचा संसर्ग झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. यामध्ये २३६ अधिकारी तर १ हजार ८५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी सुमारे ९०० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****

 स्थलांतरित कामगारांचा मूळ राज्यात परतीच्या प्रवासाचा खर्च संबंधित राज्य सरकारांनी वहन करावा, कामगारांकडून या प्रवासाचं भाडं घेऊ नये, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. या कामगारांच्या रेल्वेस्थानकावर जेवणाची व्यवस्था राज्य सरकारने करावी, तर प्रवासादरम्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी रेल्वेनं सांभाळावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे. काल बुधवारपर्यंत ३ हजार ७०० विशेष श्रमिक रेल्वे तसंच रस्ते मार्गाने ९१ लाख कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकाकडून यावेळी देण्यात आली.

 दरम्यान महाराष्ट्रातून आतापर्यंत ६९६ रेल्वेगाड्यांमधून ९ लाख ८२ हजार कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
****

 टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या गरीब गरजूंसाठी केंद्र सरकारनं आपली तिजोरी उघडावी, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षानं आज स्पीक अप इंडिया हे ऑनलाईन आंदोलन केलं, त्या अंतर्गत गांधी यांनी एका चित्रफितीद्वारे हे आवाहन केलं. पुढच्या सहा महिन्यांसाठी प्रत्येक गरजू कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडे सात हजार रुपये थेट द्यावेत, या मागणीचा गांधी यांनी पुनरुच्चार केला. ग्रामीण भागात कामगारांच्या हाताला काम मिळावं, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कामाची हमी दोनशे दिवसांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे.

 मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्पीक अप इंडिया या ऑनलाईन आंदोलनात सहभाग घेतला.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 महाराष्ट्रातल्या साडे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १७ कोटी ७० लाख डॉलर्स एवढं कर्ज मिळणार आहे. या करारावर आज केंद्रीय वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव समीर खरे आणि आशियाई विकास बँकेचे स्थानिक संचालक केनिची याकोयामा यांनी स्वाक्षरी केली. या योजनेत राज्यातल्या सात जिल्ह्यांमधले ११ राज्यमार्गांचा समावेश आहे. या योजनेमुळे राज्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या दळणवळण सुविधा बळकट होतील, असा विश्वास समीर खरे यांनी यावेळी वर्तवला.
****

 आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी राज्यातले सर्व आरोग्य कर्मचारी १२ जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष अरुण खरमाटे यांनी आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलताना हा इशारा दिला. गेल्या वर्षी राज्य सरकारने या कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता नव्याने भरती करण्याचं आरोग्य खात्यानं जाहीर केल्यामुळं हे आंदोलन करण्यात येत आहे.

 दरम्यान या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज अभिनव रक्तदान आंदोलन केलं.
****

 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लातूर, परभणी, वाशिम, धुळे इथं जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. 

 दरम्यान, उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं, सावरकर  जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आलं. सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाच पालन करत रक्तदान करण्यात आल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं.

 लातूर इथं केशवराज शैक्षणिक संकुलात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीकडे १० हजार मास्क सुपूर्द करण्यात आले.
****

खतं आणि बियाणांचा काळाबाजार करण्याऱ्या दुकानदार आणि कंपन्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. ते आज अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलत होते. बी- बियाणे, खते, कीटकनाशकांचा जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असून घरगुती बियाणांचा वापर करण्यापूर्वी त्यांची उगवणक्षमता तपासून पाहण्याचे निर्देश कृष विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  येत्या कर्जवाटपाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी सर्व बॅंकांना यावेळी दिल्या.
****

 महाराष्ट्रात विदर्भातल्या काही जिल्ह्यात आलेली टोळधाड भंडारा जिल्हामार्गे गोंदिया जिल्ह्याकडे गेली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पिकांवर तसंच झाडांवर कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तेमानी गावात आज सकाळी एक किलोमीटरच्या परिघात अग्निशमन दलाच्या दोन बंबांमधून कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली.

 दरम्यान, या टोळधाडीने राजस्थानातल्या २० जिल्ह्यात ९० हजार हेक्टरवरच्या पिकांचं तसंच झाडांचं नुकसान झाल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात उन्हाळ्यातही संकरीत ज्वारी, उन्हाळी भूईमुग, भाजीपाला या सारखी पीकं शेतकरी घेत आहेत. या दुष्काळी भागात मागील काही वर्षांत जलसंवर्धन झाल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांना या पदावरून त्वरित मुक्त करावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
*****
***

No comments: