आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या
दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष आज पूर्ण झाल्याबद्दल देशवासीयांना पत्र लिहीलं आहे.
आपल्या सरकारनं मिळवलेल्या यशाचा यात उल्लेख करताना त्यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला
परतवून लावण्याचा देशाचा संकल्प या पत्रामधे जाहीर केला आहे.
****
देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या एक
लाख ७३ हजार सातशे त्रेसष्ट झाली आहे. चोवीस तासांमधे यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची
संख्या आतापर्यंतची सर्वाधिक दोनशे पासष्ट असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे.
****
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलांनी
आज एका चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केलं. वानपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती
मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेऊन ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी
दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोरोना विषाणूचे अठ्ठावीस
नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता एक हजार चारशे सत्त्याऐंशी
झाली असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतुर तालुक्याच्या वाघी बोबडे
इथं कोरोना विषाणूच्या साठ वर्षीय रुग्णाचा आज
सकाळी मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची
संख्या आता दोन झाली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यात कोरोना विषाणूमुळे
एका सत्तावन्न वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या चार झाली
आहे.
****
श्रमिक विशेष गाड्यांद्वारे रेल्वेनं आतापर्यंत बावन्न
लाखांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवलं आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष
विनोद कुमार यादव यांनी ही माहिती दिली आहे.
****
देशांतर्गत आतापर्यंत पाचशे उड्डाणांद्वारे सुमारे
चाळीस हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीप
सिंग पुरी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
****
सांगली जिल्ह्यात
थकित कर्जवसुली साठी केन ॲग्रो साखर कारखान्यासह स्वामी रामानंद भारती आणि खानापूर
सूतगिरणी या संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. सांगली जिल्हा सहकारी
बँकेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment