Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
औरंगाबाद इथं आज तीन कोरोना विषाणूबाधितांचा मृत्यू;
एकूण मृतांची संख्या ६२
Ø
जालना इथल्या १९ तर
नांदेड जिल्ह्यात ७ रुग्णांना प्रकृती सुधारल्यानं रुग्णालयातून सुटी
Ø
कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचारासाठी
खासगी रुग्णालयं अंकित करावीत- सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
आणि
Ø
विरोधकांकडून सहकार्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याचा
प्रयत्न होत असल्याची महाविकास आघाडीची टीका
****
औरंगाबाद इथं आज तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये इंदिरानगर बायजीपुरा
भागातला ५६ वर्षीय पुरुष, हुसैन कॉलनीतला ३८ वर्षीय पुरुष, तसंच मकसूद कॉलनीतल्या ६५
वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तीन मृत्यूनंतर औरंगाबाद जिल्ह्यात या आजारामुळे मरण
पावलेल्यांची संख्या ६२ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद इथं आज नवीन ३० रुग्ण आढळले, त्यामुळे
जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १ हजार ३६० झाली असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी एकोणीस
जणांच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा झाल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
सध्या जालना जिल्ह्यात अठ्ठावन्न रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,
जालना तालुक्यातल्या वखारीवडगाव इथल्या एका महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे,
या महिलेचा चाचणी अहवाल आज प्राप्त झाला, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
संख्या अठ्ठ्याहत्तर झाली आहे. जिल्ह्यात या आजारामुळे आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू
झालेला नाही.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना आज उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आता पर्यंत ८६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या ४४ रुग्णांवर रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. यातील दोन महिला रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचं जिल्हा शल्य
चिकित्सक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाविषाणू
संसर्गामुळे आता पर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
धुळे जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रूग्ण
आढळले आहेत. हे दोघे शिरपूरच्या कारोना विषाणू बाधित एसटी बसचालक रुग्णाचे आईवडील आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची
संख्या एकशे वीस झाली आहे. तर तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे
रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत
किंवा माफक दरात उपचार करता येतील, अशी खासगी
रुग्णालयं अंकित करावीत, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोविडग्रस्तांवर
उपचाराच्या दरांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे
यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर, दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत सुनावणी झाली. देशात
अनेक खासगी तसंच धर्मदाय रुग्णालयांना सरकारने मोफत किंवा नाममात्र दराने भूखंड उपलब्ध
करून दिलेले आहेत, त्या रुग्णालयांनी कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असं
न्यायालयानं म्हटलं आहे. आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात
लूट केली जात असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे. शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा
नसलेल्या कोविड रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारने वहन करावा, अशी मागणीही
या याचिकेत करण्यात आली आहे.
****
कोविड संसर्गाला प्रतिबंध करताना, माता आणि बालकांच्या
आरोग्याची हेळसांड होऊ नये, यासाठी आवश्यक
औषधांचं घरपोहोच वितरण करणारी यंत्रणा उभारावी, असं केंद्र सरकारनं राज्य सरकार तसंच
केंद्रशासित प्रदेशांना सुचवलं आहे. स्तन्यदा माता, अर्भकं, बालकं तसंच किशोरवयीनांसाठी
राबवल्या जात असलेल्या रक्ताल्पता निवारण, जंतनाशक, तसंच अतिसार निर्मूलन आदी अभियानांदरम्यान
वाटप होणारी औषधं घरपोहोच मिळावी, कल्शियम, झिंक तसंच आयर्न किंवा फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचं
घरपोहोच वाटप व्हावं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी मंत्रालयानं
देशात कोणत्याही नवीन शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचं सांगितलं
आहे. याबाबत प्रसारीत होणाऱ्या बातम्या खोट्या असून त्यावर विश्वास ठेऊ नका असं रेड्डी
यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.
****
टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाच्या
गुणवाटपाची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या
सरासरीइतके गूण भूगोलाच्या विषयाला देण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. भूगोलाच्या
गुणपद्धतीचा तिढा सुटल्याने दहावीच्या अन्य विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामालाही
वेग येणार आहे. याच पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या गुणांचेही
वाटप केले जाणार आहे.
****
विरोधकांकडून सहकार्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याचा
प्रयत्न होत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकासआघाडीच्या
आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा
मंत्री जयंत पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडून केलेल्या मदतीची आकडेवारी खोडून काढली.
रेल्वेमंत्रालयाकडूनही रेल्वे सोडण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करून महाराष्ट्र सरकारची
प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परब यांनी केला.
जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना, कोविड उपचार आणि
प्रतिबंधासंदर्भात देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्रात झाल्याचं सांगितलं. शेजारच्या
राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली स्थिती नियंत्रणात असून, रोग प्रसार तसंच मृत्यू
दरावर यंत्रणेनं मोठं नियंत्रण मिळवलं असल्याचं पाटील यांनी नमूद केलं. माध्यमांवरून
येणाऱ्या बातम्या पाहून जनतेनं घाबरून जाऊ नये, असं आवाहनही पाटील यांनी केलं.
राज्यातल्या
युवकांच्या कौशल्याबद्दल फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असल्याचं पाटील यांनी
नमूद केलं. राज्य सरकारने केंद्राकडे २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे, त्याबाबत
केंद्राने काहीही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या नियमित निधीव्यतिरिक्त
काहीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर जिल्ह्यात धनेगाव इथल्या आधार फाउंडेशन आणि एडिएम अॅग्रो
इंडस्ट्रीज, तसंच विजाग प्रायवेट लिमिटेड या कंपन्याकडून चारशे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक
वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था
इथं १०५ किट, तसंच सारोळा इथंल्या १०९, वैशालीनगर बाभळगाव इथं ८०, सिकंदरपुर इथं ६६
तर पोहरेगाव इथल्या ४० कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आलं आहे.
****
टाळेबंदीमुळे
निर्माण झालेल्या संकटकाळात अनेक दानशूर व्यक्ती तसंच सेवाभावी संस्था गरीब गरजूंसाठी
धान्यवाटप आणि अन्नदानासारखे उपक्रम राबवत आहेत. मात्र सर्वसामान्य कामगारही या मदतकार्यात
मागे राहिलेला नाही. औरंगाबाद इथं कंपनी कामगार असलेल्या राहुल लबडे नावाच्या तरुणानं
कंपनीतून पगार बंद झाल्यानंतर, हातगाडीवर भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र गरजूंसाठी
त्यानं मोफत भाजी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या तीन दिवसांत शंभरावर गरजूंनी त्याच्या
या मोफत भाजी योजनेचा लाभ घेतला आहे.
अकोल्यात राहणारा रणजीत तायडे हा सर्वसामान्य कामगार
कुटुंबातला कला शाखेचा विद्यार्थी. त्यानेही कुटुंबाकडे जमा असलेल्या शिलकीतून आपल्या
परिसरातल्या आठ ते दहा कुटुंबांना किराणा आणि अन्य जीवनावश्यक साहित्याची मदत केली.
या तरुणांच्या दातृत्वाचं समाजातून मोठं कौतुक होत आहे.
****
मध्यप्रदेशातून आलेल्या
टोळधाडीनं अमरावती जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांच मोठं नुकसान केलं आहे. वेळीच
उपाययोजना करून शेतकऱ्यांनी दक्ष राहावं, असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे.
गहू किंवा भाताच्या तुसात फ्रीप्रोनिल हे किटक नाशक मिसळून शेतात तीस ते चाळीस किलो
इतके फेकून द्यावे, हे खाऊन टोळ मरून पडतील असं विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मोर्शी
वरुड तालुक्यात नुकसान झालेल्या शेतीचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात
यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही टोळधाड अमरावती जिल्ह्यातून नागपूर मार्गे
भंडारा जिल्ह्याच्या परिसरात गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातुर तालुक्यातल्या गंगापूर या गावात सध्या शेततळ्यामधून पाणी
पूरवठा करण्यात येत आहे. सरपंचांनी शेततळ्याच्या
पाण्याचे नियोजन करुन या ग्रामीण भागातली पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली आहे. कोरोना
विषाणु साथीच्या काळात पाण्याचे टॅंकर आणि त्यामुळे होणारी गर्दी टळली असल्याचं ग्रामस्थांनी
म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment