Monday, 25 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता आजपासून देशांतर्गत विमान सेवेला सुरूवात झाली. गेल्या दोन महिन्यापासून टाळेबंदीमुळं देशातंर्गत विमानसेवा बंद होती. दरम्यान, देशातली विमानतळं विमानसेवा देण्यासाठी पुन्हा सज्ज झाली असून प्रवाशांना विमनतळावर प्रवासाच्या दोन तास आधी हजर राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय अनेक नियमांचं पालन करणही गरजेचं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान मुंबई विमानतळावरूनही आजपासून एकूण ५० विमानांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडिया या विमान वाहतुक कंपनीला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांसह प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र याचवेळी न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश देत, केंद्र सरकारने विमान वाहतुक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीची परवानगी दिल्यानंतर विमान वाहतुक कंपनीकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन होत नसल्याची तक्रार करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती, त्यावर उच्च न्यायालयानं एअर इंडिया तसंच नागरी हवाई वाहतुक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून उत्तर मागवलं होतं. एअर इंडियानं यावर न्यायालयात उत्तर देत, सरकारकडून जारी परिपत्रकात मधलं आसन रिकामं ठेवण्याबाबत काहीही सूचना नसल्याचं, सांगितलं होतं. यासंदर्भात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला या नव्या परिपत्रकाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याकरता दोन जूनपर्यंत अवधी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज सुटीच्या दिवशी घेतलेल्या सुनावणीत, एअर इंडिया आणि इतर विमान वाहतुक कंपन्यांना उच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल, असं सांगत, विमानात दोन आसनांच्या मधलं आसन रिकामं ठेवण्याचे निर्देश दिले.
****
विदेशातून विमान, जहाज आणि रस्ते मार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांकरता आरोग्य मंत्रालयानं काही दिशा निर्देश जारी केले आहेत. या प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात रहाणं बंधनकारक आहे यात सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरनाचा समावेश आहे. यासाठी येणार खर्च प्रवाशांना स्वत: करायचा आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले सात नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळेत या ०७ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात एका रुग्णाचा १० दिवसांनंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव आला आहे. तर अकोले तालुक्यातील लिंगदेव इथं आलेल्या घाटकोपर इथल्या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव आला आहे. तसंच जिल्ह्यातल्या पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातल्या बाधीत व्यक्तींची संख्या आता ८० झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज १६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तेराशे एक झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यात  कोरोनामुळे आणखी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शिरपुर इथले हे दोन रूग्ण आहेत आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात १४ रूग्ण दगावले आहेत,
****
रत्नागिरी जिल्ह्यात काल  दिवसभरात करोनाबाधितांच्या संख्येत २४ जणांची भर पडली असून आता जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या १५६ झाली आहे. हे सारेजण मुंबईहून आलेले असून संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत.
****
ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंह यांचं आज सकाळी पंजाबमध्ये मोहाली इथं निधन झालं, ते ९६ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून ते विविध विकारांनी आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिंह यांच्या कारकिर्दीत भारतीय हॉकी संघाने १९४८, १९५२, आणि १९५६ मध्ये झालेल्या अनुक्रमे लंडन, हेलसिंकी आणि मेलबर्न इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. १९७५ साली हॉकी विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं नेदरलंडवर सहा विरुद्ध एक अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं होतं, या सहा गोलपैकी पाच गोल बलवीरसिंह यांनी केलेले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात वैयक्तिकरित्या सर्वाधिक गोल करण्याच्या त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे. भारत सरकारने १९५७ साली त्यांना पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीरसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. बलबीर सिंह यांचा सर्वोत्तम खेळ सदैव लक्षात राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
आजपासून सुरू होणारी हैदराबाद शिर्डी विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. राज्यसरकारने असमर्थता दर्शवल्याने आज हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान रद्द करण्यात आलं. २९ प्रवाशांनी या विमानात प्रवासाचं आरक्षण केलं होतं, यामध्ये जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद, जिल्ह्यातल्या प्रवाशांचा समावेश होता.
****



No comments: