Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
मे
२०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø भारतीय
रिझर्व बँकेकडून रेपो कर्ज दरात चाळीस शतांश टक्यांनी कपात
Ø प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींवरची बंदी एका वर्षासाठी
स्थगित
Ø औरंगाबाद इथं काल कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू;
जिल्ह्यात काल नवे ३२ रुग्ण
Ø जालना आठ, लातूर पाच तर उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोना विषाणू संसर्गाचे
दोन नवे रुग्ण
Ø भाजपचं काल राज्य सरकार विरोधात ‘माझे अंगण,
माझे रणांगण’ आंदोलन
आणि
Ø नांदेड विभागातल्या सहा रेल्वे स्थानकांवर रेल्वे आरक्षण सुविधा
कालपासून सुरू
****
भारतीय रिझर्व बँकेनं
देशभरातल्या बँकांना दिल्या जाणाऱ्या रेपो कर्ज दरात चाळीस शतांश टक्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे
गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. यामुळे हा रेपो दर चार पूर्णांक चार टक्क्यांवरून चार टक्के
झाला आहे. त्याचबरोबर बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या ठेवीवरचा व्याज
दर- रिवर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ शतांश टक्के
झाला आहे. रेपो दर कमी झाल्यामुळे गृह, मोटार आणि वैयक्तिक कर्ज आदी सामान्य
कर्जांवरील व्याजदर कमी होणं अपेक्षित आहे. सध्याच्या टाळेबंदीच्या
पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये कर्जाचे हप्ते भरण्यात
सूट देण्यात आली आहे. कोरोना विषाणू सारख्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर
देशभर लागू असलेल्या टाळेबंदीमुळे चालू आर्थिक वर्षाचा सकल राष्ट्रीय उत्पन- जीडीपीचा
दर शून्य टक्क्याहून कमी होण्याची शक्यताही दास यांनी यावेळी व्यक्त केली.
****
राज्यात विद्यापीठांच्या
परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवण्याची सूचना विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षाही
रद्द करण्याची मुभा मिळावी, असं पत्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवलं होतं, मात्र या भूमिकेवर राज्यपालांनी नाराजी
व्यक्त केली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान
करणं योग्य होणार नाही, विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण आणि रोजगारावर याचा परिणाम होण्याची
शक्यता असल्याचं राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. परीक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला
पाठवलेलं पत्र आणि मागणी हा अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार असून, याबाबत सामंत
यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देशही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
****
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींवरची बंदी एका वर्षासाठी
स्थगित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली
आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी
पुढच्या वर्षापासून होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
महाराष्ट्रामध्ये तेलंगणामध्ये मध्य प्रदेशामध्ये
गुजरातमध्ये आणि खरंच देशाचा सगळा भागांमध्ये असाच गणेश उत्सवाची मोठी रचना होते आणि खूप संख्येने
मूर्ती बनवल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिस हे योग्य नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणून
त्याला बंदी घालावी असा आदेश सीपीसीबीने काढला होता. परंतु माझ्याकडे अनेक निवेदन
आली. तर या वर्षीच्या
अनेक मूर्ती तयार झाल्यात आणि त्यामुळे कोणालाही नुकसान होऊ नये म्हणून या आदेशाला एक वर्षांसाठी
स्थगिती दिली आहे. आणि स्थगिती करून यावर्षी सगळ्या मुर्ती पुढच्या वर्षीपासून आपण नव्या नियमानुसार आपन मुर्ती निर्माण करू त्याचा
मला पूर्ण विश्वास आहे.
****
देशभरात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे
कोविड १९ च्या प्रसाराला प्रतिबंध झाला असून, एकूण रुग्ण
संख्येच्या ८० टक्के रुग्ण हे फक्त पाच राज्यातले असल्याचं सरकारनं सरकारनं
म्हटलं आहे. टाळेबंदी लावली नसती, तर देशातली कोविड बाधितांची संख्या १४ ते २९ लाखाच्या घरात गेली असती, आणि मृतांचा आकडा ३७ हजार ते ७८ हजाराच्या जवळपास
असता, असं सरकारनं म्हटलं आहे.
****
राज्यात काल दोन हजार
९४० कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले. एका दिवसात एवढे रूग्ण प्रथमच आढळून आले
आहेत. यामुळे राज्यातली एकूण रूग्णांची संख्या ४४ हजार ५८२ एवढी झाली आहे. काल दिवसभरात
६३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात या आजारानं मृत्यू पावलेल्यांची
संख्या एक हजार ५१७ एवढी झाली आहे.
****
औरंगाबाद इथं काल कोरोना विषाणू
बाधित दोन महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये संजय नगर परिसरातली
४१ वर्ष वयाची आणि बहादूरपुरा भागातल्या ७० वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ४५ झाली
आहे. यामध्ये
चार रूग्ण खाजगी दवाखान्यात मृत पावले असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान, जिल्ह्यात काल ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या एक हजार दोनशे अठरा इतकी
झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये जयभीम नगर
- पाच, टाइम्स कॉलनीत चार, न्याय नगर - चार, गरम पाणी, रहेमानिया कॉलनी, भवानी नगर, जुना मोंढा
प्रत्येकी दोन, कुंवारफल्ली, राजा बाजार,
सुराणा नगर, मिल कॉर्नर, रहीम नगर, कटकट गेट, जसवंतपुरा, पुंडलिक नगरमध्ये दहावी गल्लीत, सातारा परिसर,
जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, रोशन गेट, कैलासनगर, रवींद नगर, शहाबाजार, एन -२ सिडको या भागात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे. यामध्ये अठरा पुरूष
आणि चौदा महिला असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल आठ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण सापडले. बाधितांमध्ये जुना जालना परिसरातल्या दवाखान्यातल्या
तीन परिचारिका, एक पुरुष कर्मचारी, मंठा
चौफुली इथल्या खासगी रुग्णालयातली एक महिला कर्मचारी, मालेगाव
बंदोबस्तावरुन आलेला सुरक्षा दलाचा एक सैनिक, मंठा तालुक्यातला
पेवा इथला एक पुरुष आणि जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथल्या एका महिलेचा समावेश
आहे. त्यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या एक्कावन्न झाली
असून. आतापर्यंत अकरा रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली
आहे.
****
लातूर जिल्ह्यात
काल कोरोना विषाणू बाधा झालेले पाच नवीन रुग्ण सापडले. यामध्ये लातूरच्या लेबर कॉलनीतला
एक, अहमदपूर इथले दोन तर कासारशिरसी इथल्या दोन जणांचा समावेश आहे. लातूर इथं रुग्ण आढळलेला परिसर महापालिकेने
प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातही काल दोन जण कोरोना विषाणू
बाधित आढळून आले. कळंब तालुक्यातल्या पाथर्डी आणि परंडा तालुक्यातल्या कुकगाव इथले
हे रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २८ झाली आहे.
बीड इथंही काल एका व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा
झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात साठ वर्षांवरील
दोन कोरोना विषाणू बाधित महिला रुग्णांचा काल मृत्यू झाला. यातील एक महिला मुंबईहून राशीन इथं आली होती तर दुसरी महिला अहमदनगर इथली आहे.
यामुळे जिल्ह्यातली मृतांची संख्या सात झाली असून तर एकूण रुग्ण संख्या
बहात्तर झाली आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातले व्यवहार कालपासून सुरू झाले.
यामध्ये केश कर्तनालयं, कापड दुकानांसह चारचाकी
गाड्या, रिक्षा, जिल्हा अंतर्गत वाहतूक सुरू झाली. सर्व शासकीय कार्यालयं, खाजगी कार्यालय, टपाल सेवा, कुरिअर
सेवा, ग्रामीण तसंच उद्योग, बांधकाम व्यवसाय
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात
राज्य परीवहन महामंडळाची बस वाहतुकही सुरू
झाली आहे
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकतं का याची
सांस्कृतिक कार्यसचिवांनी चाचपणी करावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
सांगितलं आहे. इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या
पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद
प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रेड
झोन्स मधली शहरे वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळं उपलब्ध होतील का तसंच चित्रीकरणाबाबत आराखडा लगेच सादर केल्यास त्यावर
शासन निर्णय घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू
ग्रस्तांवर मोफत उपचार करावेत, शेतकरी-बारा बलुतेदार तसंच असंघटीत कामगारांसाठी राज्य सरकारनं ५० हजार कोटी रुपयांचं
पॅकेज द्यावं, अशी मागणी, विधानसभेतले विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षानं
काल राज्यात ‘माझे अंगण, माझे रणांगण’
मोहिमेअंतर्गत तोंडाला काळे मास्क लाऊन राज्य सरकारच्या विरोधात
आंदोलन केलं, त्या अनुषंगानं फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे
निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना करण्यात
आलेल्या नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही
मदत नाही, कापूस खरेदी फक्त भारतीय कापूस महासंघाकडूनच सुरू आहे, राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत
नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापूर इथं आंदोलन झालं, कोरोना
विषाणू प्रादुर्भावावरच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी
समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
मराठवाड्यातही भाजप
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. औरंगाबाद इथं
खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ
नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
जालना इथं भाजपा जिल्हाध्यक्ष
संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हा भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालयासमोर
आंदोलन करण्यात आलं.
परभणीत आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचा
निषेध केला. जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आपापल्या घरासमोर, चौकात
सामाजिक अंतर राखत, तोंडाला काळे मास्क, काळे कपडे परिधान करून आंदोलनात सहभागी झाले.
उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष
नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली काळे मास्क बांधून, हाताला
काळा पट्ट्या बांधून तसंच काळे कपडे आणि काळे झेंडे हातात घेऊन
महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं.
नांदेड इथं भाजप राज्य कार्यकारिणीचे
सदस्य चैतन्यबापू देशमुख यांनी तर अर्धापूर इथं विधीज्ञ किशोर देशमुख आणि इतरांनी या
आंदोलनाचं नेतृत्व केलं.
लातूर जिल्ह्यातही भाजपचे पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आंदोलनात सहभाग
नोंदवला. लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी काळा मास्क,
काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. भाजपचे शहर
अध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी उपमहापौर देवीदास काळे, शैलेश लाहोटी यांनी दंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
अनेक कार्यकर्त्यानी त्यांच्या घरासमोरच हातात फलक घेऊन आंदोलन केलं.
****
दरम्यान, परभणी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपच्या या आंदोलनाचा निषेध
करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के,
तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यावेळी निषेध आंदोलनात सहभागी झाले.
*****
जालना इथून काल बिहार राज्यातल्या
छपरा इथं विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली. या प्रवासासाठी
रेल्वे प्रशासनानं १४०० कामगारांना घेऊन जाण्याची व्यवस्था केली होती. मात्र जालना औद्योगिक वसाहतीमधल्या काही कंपन्या सुरु झाल्यानं काही बिहारी
नागरिकांनी या कंपन्यांमध्ये थांबणं पसंत केल्यानं प्रवासासाठी
आलेल्या ८६० नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे रवाना झाली.
****
टाळेबंदीच्या
काळात औरंगाबाद इथं अडकून पडलेल्या बिहार राज्यातल्या सुमारे सोळाशे कामगारांना घेऊन,
एक विशेष श्रमिक रेल्वे काल सकाळी बिहारमधल्या अररियाकडे रवाना झाली. उपजिल्हाधिकारी
अप्पासाहेब शिंदे यांनी ही माहिती दिली. आज सकाळी आणखी एक रेल्वे बिहारमधल्या मुझफ्फरपूरकडे रवाना होणार आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
राहाता, श्रीरामपूर, संगमनेर
आणि कोपरगांव तालुक्यात अडकून पडलेल्या
बिहार राज्यातल्या एक हजार एकशे चार कामगारांना
काल सकाळी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेनं बिहारकडे
पाठवण्यात आलं. जिल्हा प्रशासनातर्फे सोडण्यात आलेली ही पाचवी
श्रमिक रेल्वे असून परप्रांतीय कामगारांना बिहारकडे नेणारी पहिलीच रेल्वे आहे.
****
नांदेड विभागातल्या सहा
रेल्वे स्थानकांवर रेल्वे आरक्षण कालपासून सुरू करण्यात आलं आहे. यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा
आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत आरक्षण खिडक्यांचं काम सुरू राहणार आहे.
दरम्यान, एक जून पासून देशभर चालवल्या जाणाऱ्या २०० विशेष गाड्यांमध्ये नांदेड
विभागातल्या नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या विशेष गाडीच्या वेळा नियमित सचखंड एस्क्प्रेस सारख्याच असतील, मात्र ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. सरकारने ठरवून
दिलेल्या निर्देशांनुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे
स्थानका दरम्यान प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.
****
राज्यात रेड झोन वगळता इतर भागात
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जिल्ह्यांतर्गत बससेवा कालपासून सुरु झाली. कोरोना
विषाणू प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व नियमांचं पालन करत, एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के
प्रवाशांसह वाहतुक सुरू करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पाथरी, सेलू यासह ग्रामीण भागात बसच्या फेऱ्या
सुरु झाल्या. नांदेड जिल्ह्यात काल २२ बस धावल्या.
नांदेड शहरात एस टी आगारातून
बस सोडण्यापूर्वी शिवसेनेचे सह जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांच्यावतीनं बसच्या आतून
बाहेरून निर्जंतुकीकरण औषधीची फवारणी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यांतर्गत महत्त्वाच्या
मार्गावर पहिल्या टप्प्यात एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी सर्व सुरक्षा नियमाचे पालन करून प्रवास करावा, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. पहिल्या टप्यात चाळीस बस धावणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातही
पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये कालपासून बससेवा
सुरू झाली. या मार्गावर बसच्या दिवसभरात १७८ फेऱ्या होत आहेत.
****
कापूस खरेदीत होत असलेली दिरंगाई
आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं
काल राज्यभरात मूठभर कापूस दहन आंदोलन करण्यात आलं. काल
सकाळी अकरा वाजता राज्यभरात एकाच वेळी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या
माळा घालून आणि मूठभर कापूस जाळून सरकारचा निषेध केला.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली. अत्यंत मंद गतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीला गती द्यावी, एफएक्यू - रास्त सरासरी गुणवत्तेच्या मध्यम तसंच आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी करावी, भारतीय राष्ट्रीय
कृषी सहकारी पणन महासंघ - नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल
प्रमाणे कांदा खरेदी करावा, या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन
करण्यात आल्याचं घनवट यांनी सांगितलं.
औरंगाबाद
इथं संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं, पैठण तालुक्यातले शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले.
परभणी आणि नांदेड इथंही अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या पान कनेरगावची विड्याची पानं देशभरात प्रसिद्ध आहेत. मात्र टाळेबंदीमुळे नागवेलीची पानं मळ्यातच सडत असून, ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली
आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…..
विड्याची चव वाढवणारे नाजूक पण वर्षानुवर्षे पिकवणारे अनेक पानमळे फुलवणारा
शेतकरी या वर्षी मात्र मेटाकुटीला आलायं. लॉक डाऊन मुळे पानपट्टी बंद, विवाह सोहळे देखील बंद, त्यामुळे हिरवीकंच नाजूक पानांची
मळे बहरली. पण त्याला ग्राहकचं नाही. पण आयर्न विक्रीच्या काळात सर्वच बंद त्यामुळे या शेतकऱ्यांना वेलीवरची पाने तोडून
फेकावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा
हात द्यावा अशी मागणी होत आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश
कदम हिंगोली. ओके
****
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार रमेश कराड
यांनी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवडून आल्यावर,
कराड हे परळी इथं गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी गेले होते, यावेळी भाजपाचे कार्यकर्ते
त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते, या ठिकाणी सामाजिक अंतर न ठेवल्यानं
त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर नांदेड शहर आणि जिल्ह्यात या वर्षी रमजान ईदची नमाज मशिदीऐवजी घरातच अदा करण्याचा निर्णय
मुस्लिम समाजानं घेतला आहे. मशिदीत फक्त पाच किंवा सात लोकांनाच नमाज अदा
करण्यासाठी प्रवेश दिला जाईल, हस्तांदोलन किंवा गळाभेट करता येणार नाहीत, असा
निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं रमजान ईद सणाच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची काल
बैठक झाली. ईदचा
सण शांततेत आणि टाळेबंदी तसंच जमावबंदीचे नियम पाळून साजरा करण्याचं
आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. दौलताबाद इथंही पोलीस ठाण्यामध्ये रमजान
ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात
आली.
****
जालना शहरात कालपासून दुकानं
सुरु झाल्यानंतर बाजारात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी कुठलीही खबरदारी विक्रेते आणि ग्राहकांकडून
बाजारात घेण्यात येत नसल्याचं दिसून आलं, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून गर्दीची
ठिकाणं वगळून सर्व बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिले
आहेत. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बाजारपेठ
सुरु राहणार असून, ग्राहक थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा
देता येईल, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध
कारवाई करण्यात येईल, आठवडी बाजार, शीतपेयांची
दुकानं बंदच राहतील असं या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, नियमांचा भंग
केल्यावरून काल नांदेड इथं सात दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात
आला. महापालिकेच्या पथकानं दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर
यांनी दिली.
****
टाळेबंदीच्या चौथ्या
टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली
आहे. किराणा दुकान, बेकरी, मिठाईची दुकानं, बाजारपेठा, अन्नपदार्थांची घरपोच सेवा,
केश कर्तनालय, आदी दुकानं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
पेट्रोल पंप, बि बियाणं, खतांची दुकानं सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, तर
भाजीपाला आणि दूध विक्री सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी कायम असणार आहे. नियम पाळले गेले
नाही तर दुकानं बंद करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्राहकांच्या वीज बिलाबाबतच्या तसंच
वीज पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुरेश
गणेशकर यांनी महावितरणच्या संबंधित अभियंत्यांना दिले आहेत. गणोरकर यांनी काल औद्योगिक वीज ग्राहकांशी वेबिनारद्वारे
संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. औरंगाबाद आणि जालना
जिल्ह्यातल्या ८९ ग्राहक तसंच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी या
वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. टाळेबंदीमध्ये उद्योजकांसाठी
लोड रिडक्शनसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचंही गणेशकर यांनी यावेळी
सांगितलं.
*****
कामगार नेते दादा सामंत यांचं
काल मुंबईत बोरीवली इथं वार्धक्यानं निधन झालं. ते एक्क्याण्णव वर्षांचे होते. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होत. डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर दादा सामंत यांनी १९९७
ते २०११ पर्यंत कामगार आघाडी आणि संलग्न कामगार संघटनांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
होतं.
****
हिंगोली जिल्ह्यात नगर पालिका
कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. औंढा नागनाथ देवस्थानच्या वतीनं वाटप करण्यात आलेले धान्याचे किट गरजुंपर्यंत
पोहचवले नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळमनुरी पालिकेच्या
दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत,
हे आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
कर्मचाऱ्यांचा दोष नसतांनाही त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं संघटनेने
म्हटलं आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातल्या पाचही नगर पालिकांचं कामकाज ठप्प झालं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराईत उघडकीस आलेल्या धान्य
घोटाळ्यात फिर्याद देणारे नायब तहसीलदार ए.एन.भंडारे यांनाच चौकशीनंतर अटक करण्यात
आली आहे. रेशनचा गहू, तांदूळ आणि साखर असा लाखो रुपयांचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी
गोदामात दडवून ठेवल्याचं प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment