Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 May
2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सितारामण यांनी भर दिला आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच
बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली
आहे. देशासह निर्यात करण्याच्या उत्पादनांच्या निर्मीतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंकरिता
आयातीवर अवलंबून रहावंच लागेल, असंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सरकारच्या
`पॅकेज`मुळे अर्थव्यवस्था सुरळित करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यात मदत होईल, असं त्या
म्हणाल्या. रिझर्व बँकेनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयांचं त्यांनी स्वागत केलं. शेतकऱ्यांना
पारंपरिक समस्यांतून मुक्त करण्यासाठी निश्चित निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं यावेळी आभार मानलं.
****
देशात कोरोना विषाणूची लागण
झालेले एक्कावन्न हजार ७८४ रुग्ण बरे झाले असून हे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी एक्केचाळीस
दशांश ३९ असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस
तासांमधे तीन हजार दोनशे पन्नास रुग्ण या विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
दरम्यान, देशात
या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या एक लाख पंचवीस हजार एकशे एक झाली आहे. यामुळे
तीन हजार सातशे वीस जणांचा मृत्यू झाला आहे.
****
पश्चिम
बंगालमधे अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८५ झाली आहे. हे चक्रीवादळ
होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे आज
कोलकातामधे विविध भागांत आंदोलनं करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
या आज दक्षिण चोवीस परगाना` जिल्ह्याला भेट
देऊन पहाणी करण्याची शक्यता आहे.
****
कोरोना विषाणूमुळे लागू
टाळेबंदीच्या काळात सायबर गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा राज्याचे गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यातील सायबर विभागानं या संदर्भात आतापर्यंत चारशे
दहा गुन्हे नोंदवले असून दोनशे तेरा जणांना यात अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी
आज एका चित्रफीतीच्या माध्यमातून दिली आहे. व्हाटसॲप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम
आणि टिकटॉकच्या माध्यमातून चिथावणीखोर माहिती, अफवा तसंच महिलांबद्दल आक्षेपार्ह तपशील पसरवण्याच्या गुन्ह्यांमधे
मोठी वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. अशा चुकीच्या गोष्टी घडत असून सायबर विभाग
त्यावर लक्ष ठेऊन असल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
आज कोरोना विषाणूचे नवे २३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता
१२४१ झाली आहे. औरंगाबाद शहरातील ठाकरे नगर, पुंडलिक नगर इथं प्रत्येकी दोन, न्याय
नगर, बजरंग चौक एन सात इथं प्रत्येकी तीन नवे रुग्ण आढळले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज
सकाळी कोरोना विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत.
शहरात यापूर्वी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या खासगी रुग्णालातल्या एका कर्मचाऱ्यासह
जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली इथल्या एका व्यक्तीला याची लागण झाल्याचा अहवाल
प्राप्त झाला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या
५४ झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना
विषाणूची लागण झालेले नवे दोन रुग्ण आढळून आले आहेत. परभणी इथं एक आणि जिंतूर तालुक्यातल्या
सावंगी भांबळे इथं दुसरा रुग्ण आढळला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची
संख्या २२ झाली आहे. परभणी जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातही आता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव
पसरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या
कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३५ झाली आहे. काल संध्याकाळी पाच जणांचा तपासणी अहवाल
प्राप्त झाल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. टाळेबंदीच्या
काळात परराज्यात तसेच राज्यातल्या इतर जिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातले कामगार, मजूर, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं परत येत असल्यामुळे जिल्ह्यात
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात कोरोना
विषाणूची लागण झालेले २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या
आता १०२ झाली आहे.
****
कोकण रेल्वेच्या आरक्षणाला कालपासून सुरुवात झाली आहे. टाळेबंदीमुळे कोकण
रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद होती. विभागातल्या माणगाव, खेड,
चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, करमळी, मडगाव, कारवार, उडुपी, कुमठा,
बेंदूर या शहरांच्या स्थानकांवरच्या आरक्षण
खिडक्या आता सुरु करण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment