Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –३१
मे
२०२० सकाळी ७.१० मि.
****
**
देशभरातली टाळेबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्याची घोषणा; ८ जूनपासून धार्मिक आणि प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरंटस
आणि शॉपिंग मॉल्स सुरू होणार
**
राज्यात टाळेबंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा
**
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन विद्यापीठ स्तरांवरच्या परीक्षा घेण्याचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
**
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, किंवा पान मसाल्याचं सेवन करून थुंकल्यास, आर्थिक
दंडासह सार्वजनिक सेवेच्या शिक्षेची तरतूद
**
राज्यात काल दिवसभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ९९ रुग्णांचा मृत्यू तर दोन हजार
नऊशे चाळीस नवे रुग्ण
** औरंगाबाद जिल्ह्यात ३९, लातूर आणि उस्मानाबादमध्ये
प्रत्येकी सात नवे रूग्ण तर परभणीत एक जणांचा मृत्यू
**
आणि
**
पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये अधिभार वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
****
केंद्र
सरकारने देशभरातली टाळेबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्याची काल घोषणा केली. टाळेबंदीचा
चौथा टप्पा आज समाप्त होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं काल नव्यानं मार्गदर्शक सूचना
जारी करून राज्य सरकारनं निर्धारित केलेले प्रतिबंध- कंटेनमेंट क्षेत्र वगळता अन्य
भागातली टाळेबंदी उठवली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र ३० जूनपर्यंत या टाळेबंदीची
कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रीन आणि ओरेंज झोनमध्ये सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत
काही व्यवहार वगळता अन्य सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी राहील. उद्यापासून राज्यातर्गंत
आणि आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, यासाठी कोणाच्याही परवानगीची
गरज असणार नाही. मात्र यासंबंधीचे नियम बनवण्याचे राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
पहिल्या
टप्प्यात ८ जूनपासून धार्मिक आणि प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरंटस आणि इतर आतिथ्य
सेवेशी संबंधित सेवा, शॉपिंग मॉल्स सुरू केले जातील. दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालय,
शैक्षणिक, प्रशिक्षण आणि कोचिंग संस्था राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चा
करून सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकार आपल्या राज्यातले शिक्षणसंस्था
चालक, पालक आणि इतर भागीदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला
जाईल.
आंतरराष्ट्रीय
विमान सेवा, मेट्रो रेल, चित्रपट गृह, जिम्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह,
मद्यालय, प्रेक्षागृह, सभामंडप तसंच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, साहित्यिक,
सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य गर्दी होणारे कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात तिसऱ्या
टप्प्यात परिस्थितीचं मूल्यमापन करून याबाबतची तारीख निश्चित केली जाणार आहे.
आरोग्य
मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री ९ वाजेपासून
सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.
याशिवाय
कार्यालयात, कपंनीमध्ये, दुकानात कामाच्या वेळा निश्चित कराव्या, थर्मल स्क्रीनिंग,
सॅनिटायझर, हॅण्ड वॅाश बंधनकारक, तसंच सामाजिक अंतराचं पालन करावं, असं सरकारनं या
निर्देशात सांगितलं आहे. टाळेबंदीच्या या टप्प्यातही मास्क लावणं, सामाजिक अंतर पाळणं,
हे नियम पाळावे लागतील. अंत्यसंस्कारावेळी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक
सभा, कार्यक्रमांना बंदीच आहे, लग्न समारंभासाठी फक्त ५० जणांना परवानगी असेल, असं
केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
राज्य
सरकार आपल्या आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरही बंधन आणू शकेल किंवा त्यावर
बंदीही घालू शकेल. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, गंभीर आजारी लोक, गरोदर महिला
आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला सरकारनं या मार्गदर्शक
सूचनांमध्ये दिला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक गरजांसाठी ते घराबाहेर
जाऊ शकतील.
****
राज्यात
टाळेबंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल रात्री सुमारे तासभर चर्चा झाली. केंद्र सरकारनं टाळेबंदीत
वाढ केल्यानंतर राज्यात त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करायची, कोणत्या गोष्टी सुरु
करता येतील, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
राज्यात प्रतिबंधित क्षेत्र कोणते ते ठरवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आज प्रशासनातल्या
संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय टाळेबंदी उठवण्यासंदर्भातही या बैठकीत
चर्चा होईल.
****
विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन विद्यापीठ स्तरांवरच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विद्यापीठांच्या परीक्षा तसंच शैक्षणिक वर्षाबाबत
मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची दूरदृश्य संवाद
प्रणाली द्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. परीक्षांबाबतची अनिश्चितता संपवण्याचा
विषय प्राधान्यानं हाताळावा लागणार असल्याचं सांगतानाच, जुलै महिन्यात परीक्षा घेता
येणार नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंतिम वर्षात सर्व सत्रांच्या सरासरी इतके
गूण किंवा श्रेणी प्रदान देऊन, श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत
कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. आगामी शैक्षणिक वर्ष
कधीपासून सुरु करायचं याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परिस्थितीही सतत बदलत आहे. त्यामुळे या संकटाचं संधीत
रुपांतर करता येईल का, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याचा विचार करायला
हवा असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी
परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती दिली.
****
राज्यात
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, पान, किंवा पानमसाल्याचं सेवन
तसंच थुंकल्यास, आर्थिक दंडासह सार्वजनिक सेवेची शिक्षा करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली.
कोरोना
विषाणू सारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं,
जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा
प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा, त्याच
व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा तर
तिसऱ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक
सेवा, अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार सहा महिन्यांपासून
दोन वर्षांपर्यंत शिक्षा तसंच दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेचीही तरतूद असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल एक हजार चौऱ्यांशी रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानं, त्यांना रुग्णालयांमधून
सुटी देण्यात आली. आता राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या
अठ्ठावीस हजार एक्क्याऐंशी झाली आहे.
दरम्यान,
राज्यात काल दिवसभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ९९ रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन
हजार नऊशे चाळीस नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पासष्ट हजार
एकशे अडुसष्ट झाली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधित ३९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण
रुग्णांची संख्या आता एक हजार ४९८ एवढी झाली आहे. काल आढळलेल्या रूग्णांमध्ये जुना
मोंढा पाच, उस्मानपुरा आणि रोशन गेट परिसरात प्रत्येकी चार, जुना बाजार, सुराणा नगर,
नारळी बाग आणि शिवशंकर कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. तर मुझफ्फर नगर, हडको, व्यंकटेश
नगर, हमालवाडी, न्यू वस्ती जुनाबाजार, भवानी नगर, मनजीत नगर, शिवाजी नगर, नारेगाव परिसर,
न्याय नगर, संजय नगर, मुजिब कॉलनी, कटकट गेट, नेहरू नगर, वसंत नगर, जवाहर कॉलनी, रहेमानिया
कॉलनी मधील गल्ली क्रमांक बारा, मिसारवाडी, समता नगर आणि सिडको एन आठ, मध्ये प्रत्येकी
एक रूग्ण आढळला आहे. याशिवाय वैजापूर मध्येही दोन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतून दोन, जिल्हा सामान्य रुग्णालयातून
१० रुग्ण काल बरे होऊन घरी परतले.
दरम्यान,
औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका
तसंच वडगाव कोल्हाटी इथल्या कोविडग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण बेचाळीस
जणांना कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. या सर्वांच्या तपासणी अहवालात हे स्पष्ट
झालं असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांनी दिली.
****
लातूर
जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातल्या देसाई
नगर इथल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातले तीन जण, जिजामाता नगर मधला एक, मोती नगरमध्ये
दोन, तर उदगीत इथल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे. तसंच याआधीच्या बाधित सात रुग्णांचे
पुनर्तपासणी अहवालही दुसऱ्यांदा विषाणुची लागण कायम असल्याचेच आले आहेत.
उदगीर
उपजिल्हा रुग्णालयातून काल दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. राज्यमंत्री संजय बनसोडे
तसंच रुग्णालय व्यवस्थापनानं विषाणू मुक्त झालेल्या या दोघांवर पुष्पवृष्टी करून निरोप
दिला.
दरम्यान,
जिल्ह्यातल्या २७ प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून
अत्यावश्यक सेवांचा तत्काळ पुरवठा केला जात आहे. यासाठी त्या भागातल्या शंभर कुटुंबातला
प्रत्येकी एक सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला
आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
ग्रुपवर
संदेश पाठवल्यानंतर या भागातील अनेकांना अत्यावश्यक सेवा तात्काळ उपलब्ध करून दिल्या
जाणार आहेत तसेच या भागाच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक भागात एक महिला
अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली महिलांच्या काही मागण्या अथवा समस्या त्यांना ग्रुपवर
देण गैरसोयीचं वाटू शकतं त्यामुळे संबंधित महिला अधिकार्यांना थेट संदेश पाठवून आवश्यक
तात्काळ सेवा मिळू शकतात अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल सात नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात कळंब तालुक्यातल्या पाच
तर उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात
एकूण रुग्णसंख्या आता ७१ झाली आहे. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून अठरा जणांना
उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली,
५१ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात काल कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची
संख्या आता एकशे चव्वेचाळीस झाली आहे.
****
जालना
जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातल्या नानसी इथं एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं
स्पष्ट झालं. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एकशे तेवीस झाली आहे. जिल्ह्यातले
बारा रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्यानं त्यांना काल कोवीड रुग्णालयातून सुटी देण्यात
आल्याची माहिती जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
****
परभणी
जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल सकाळी मृत्यू झाला. जिंतूर तालुक्यातल्या
वाघीबोबडे इथला रहिवासी असलेल्या या ६० वर्षीय वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
होते.
दरम्यान,
पूर्णा तालुक्यात माटेगांव इथं दोन, तर सेलू तालुक्यात ब्रह्मवाकडी, गंगाखेड तालुक्यात
माखणी, जिंतूर शहर, तसंच मानवत शहरात प्रत्येकी एक असे सहा रुग्ण कोरोना विषाणू बाधित
आढळून आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बालासाहेब नागरगोजे
यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सध्या ७१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत
दरम्यान,
परभणी जिल्ह्यात पुणे - मुंबईहून विनापरवानगी आलेल्या नागरिकांमुळे ही रुग्ण संख्या
वाढत असल्याची बाब समोर आली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….
ग्रीन झोन
मधून ऑरेंज झोन मध्ये गेलेल्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना विनापरवानगी आलेल्या नागरिकांमुळे
त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले
माझे सगळे
जनतेला विनंती आहे की बाहेर गावांवरून आपल्या शहरांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्यासाठी
आपण क्वारंटाइन फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे मंगल कार्यालयात आणि इतर मंगल कार्यालयात
त्यांना १४ दिवस क्वारंटाइन करून ठेवत आहोत आणि ग्रामीण भागत जात असतील त्यांना आपण
शाळेमध्ये क्वारंटाइन करत आहोत असे जर लोक आपल्या घरात, गावात येत असतील त्यांची माहिती
control room, मला किंवा मनपा आयुक्त यांना तात्काळ द्यावी यांना आपण वेगळ क्वारंटाइन
करून आणि आवश्यकता भासल्यास त्यांचं स्क्रीनिंग करून घेऊ अशी माझी सर्वांना विनंती
आहे
आकाशवाणी
बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
नाशिक
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे नवे पंधरा रुग्ण आढळले. जिल्ह्यात आता रुग्णांची
संख्या एक हजार एकशे सहासष्ट झाली आहे. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या
एकसष्ट रुग्णांपैकी ४८ रुग्ण मालेगांवचे आणि आठ नाशिक शहरातले आहेत. नाशिक जिल्ह्यात
या विषाणूचे सातशे शहाऐंशी रुग्ण बरे झाले असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनानं दिली
आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. हे सर्व मलकापूर इथले रहिवासी आहेत. तर एका रुग्णाला
काल उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे घरी सोडण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत
३३ कोरोना विषाणूबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली.
****
अहमदनगर
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधा झालेले नवे सात रुग्ण आढळले. यात संगमनेर इथले दोन
रुग्ण आहेत. जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता एकशे चोवीस झाली आहे.
****
देशवासियांच्या
आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याकडे मोठ्या गतीनं प्रवास सुरू असतानाच कोरोना विषाणूच्या
संकटानं ग्रासलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी
त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशवासियांना एक पत्र
लिहिलं आहे, त्यात त्यांनी ही बाब नमूद केली. आपल्या सरकारनं मिळवलेल्या यशाचा उल्लेख
करताना पंतप्रधानांनी, कोरोना विषाणूचं संकट परतवून लावण्याचा देशाचा संकल्प याद्वारे
जाहीर केला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा दुसऱ्या टप्प्यातला बारावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
पेट्रोल
आणि डिझेलवर लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये अधिभार वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेतला आहे. टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं हा निर्णय घेण्यात
आला. आता पेट्रोलवरचा राज्य सरकारचा अधिभार १० रुपये १२ पैसे, तर डिझेलवरचा तीन रुपये
झाला आहे.
****
औरंगाबाद
जिल्हा कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी एकमेकांतलं अंतर, मास्क
आणि वारंवार हात धुणं आदी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पालकमंत्री सुभाष
देसाई यांनी केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद इथं यासंदर्भातील आढावा बैठक घेतली. जिल्हा
प्रशासन आणि महापालिकेला त्यांनी यावेळी काही सूचना केल्या. ते म्हणाले...
तपासणी
केंद्र ठिकाणी आहेत त्याचं ठिकाणी चालू आहे त्यांच्याबरोबर fever camps घ्यावे आणि ते ज्या–ज्या प्रभागांमध्ये जास्त आपल्याला
रुग्णांची किंवा संसर्ग होतो किंवा लक्षणे दिसतात त्या लक्ष नसताना test घेतली तरी
ती वाढलेली असे दिसते त्या मुन्सिपल वार्डच्या हद्दीमध्ये camps सुरु करावे रक्तदान कमी पडता कामा नये जरी कोविडच आणि रक्तदानाचं
फार काही नसलं तरी इतर आजारांसाठी रक्तदान फार महत्वाचे आहे इतर आजार आणि कोरोना ही युती होऊ नये हे एकत्र येऊ नये एवढीच
दक्षता घ्यायची म्हणून खाजगी रुग्णालय खाजगी
डॉक्टर त्यांनी त्यांच कामकाज सुरु करावं
यंदाच्या
उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणी तुलनेनं कमी आहे, सध्या जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची
संख्या १३८ असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. टोळधाड आली तर नियंत्रण मिळवण्यासाठी
सर्व प्रयत्न सुरू असून तयारी करण्यात आली असल्याचं पालकमंत्री देसाई यांनी यावेळी
सांगितलं.
दरम्यान,
पालकमंत्री देसाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील कोविड-19
संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी हे
संशोधन केंद्र नक्कीच मोलाचं काम करेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू
डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीकरता विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन
विभागाचे ३५ लाख रुपये आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील नऊ लाख २६ हजार
रुपयांचा धनादेश पालकमंत्री देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी राज्य सरकारने
२०० कोटी रुपयांची तरतूद केलेली असून, योजनेचं काम
सुरू करण्यासाठी हा निधी पुरेसा असल्याचं, आमदार अंबादास दानवे
यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं मराठवाडा पाणी परिषदेच्या
समारोप सत्रात ते बोलत होते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या
परिषदेत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होत, मराठवाड्यातली पाणी टंचाई
दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. परिषदेचे
अध्यक्ष नरहरी शिवपुरे, जलतज्ज्ञ रमेश पांडव, आणि जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी या परिषदेला मार्गदर्शन केलं.
****
छोट्या-मोठ्या
व्यावसायिकांना एका दिवसाआड अटी आणि शर्तीवर व्यवसाय सुरू करण्यास प्रशासनानं परवानगी
द्यावी, अशी मागणी परभणीच्या महापौर अनिता सोनकांबळे आणि उपमहापौर भगवान वाघमारे यांनी
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे. गेल्या सुमारे ६८ दिवसांपासून ही दुकानं
बंद असल्यामुळे दुकान मालकांसह नोकरदार तसंच अन्य कामगार वर्ग अडचणीत असल्याचं, या
निवेदनात म्हटलं आहे.
****
लातूर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार तीन जून पर्यंत
बंद राहणार आहे. व्यापारी संघटनेच्या विनंतीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं सभापती
ललितकुमार शहा यांनी सांगितलं. यापूर्वी आजपर्यंत हे व्यवहार बंद ठेऊन उद्या सोमवापासून
ते सुरू होणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या संत जनाबाई तसंच पालम तालुक्यातल्या फळा इथले संत मोतीराम
महाराज यांच्या पालखीलाही हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी
गंगाखेड तालुका कॉंग्रेस समिती तसंच संत जनाबाई संस्थानच्या वतीनं करण्यात आली आहे.
यंदा पंढरपूरचा पायी आषाढी वारी सोहळा रद्द करून, प्रमुख पालख्या हेलिकॉप्टरने पंढरपूरला
नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. या
संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आलं आहे.
****
मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल उस्मानाबाद तालुक्यातल्या लोहारा ग्रामीण
रुग्णालयास भेट देऊन तिथल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याठिकाणी लागणाऱ्या आवश्यक त्या
सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
लोहारा इथं भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात गेल्या दीड महिन्यांपासून उभारण्यात आलेल्या
विलगीकरण केंद्रालाही आमदार चव्हाण यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
****
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरच्या मेहकरी पुलावर स्टील गर्डर
बसवण्याचं काम सुरू झालं आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अहमदनगरपासून ४० किलोमीटर अंतरावरच्या या पुलाचं
काम पूर्ण झाल्यावर हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्याला जोडला जाईल. येत्या वर्षभरात पुलाचं
काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.
****
महात्मा
जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व ३७ हजार शेतकऱ्यांना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्जवाटप केलं जाणार आहे. माजी मंत्री आणि बँकेचे
मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील
माहिती दिली. खरीप हंगाम २०२० मधे एकशे वीस कोटी रुपयांचं हे कर्जवाटप केलं जाणार असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शिवसेनेच्या
औरंगाबाद शाखेनं "आपला वॉर्ड - कोरोना मुक्त वार्ड" या मोहिमेच्या दुसऱ्या
टप्प्याला कालपासून सुरुवात झाली. आमदार अंबादास दानवे यांनी शहरातल्या नारळीबाग वार्डात
५० ते ५५ वर्षे वरील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मामीटरगनच्या
साह्यानं शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण, पल्स रेट त्याचप्रमाणे शरीराचं तापमानाची तपासणी
करुन या मोहिमेची सुरुवात केली.
****
No comments:
Post a Comment