Saturday, 30 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2020 07.10A,


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  केंद्रातल्या भारतीय जनता पक्ष सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त आजपासून देशभरात डिजिटल रॅली काढण्याचा कार्यक्रम
Ø  राज्यातली टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही- मुख्यमंत्री
Ø  बंधपत्रित -बॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय 
Ø राज्यात दोन हजार ६८२ नवे कोरोना विषाणू बाधिरुग्ण तर काल दिवसभरात आठ हजार ३८१ रुग्णांना उपचारातून बरे झाल्यामुळे सुटी
Ø  औरंगाबाद जिल्ह्यात ५२ नवे रुग्ण तर लातूर १०, परभणीत सात तर जालना, हिंगोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी पाच नवे रुग्ण; उस्मानाबादमध्ये दोन जणांचा मृत्यूची नोंद
आणि
Ø आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणारा पायी दिंडी वारी सोहळा रद्द; पादुका वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेणार
****


 केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नरेन्द्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त आजपासून देशभरात डिजिटल रॅली काढण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा आज संध्याकाळी चार वाजता सामाजिक प्रसार माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील. पक्षाचे सर्व सातही विभाग आपापल्या क्षेत्रात जवळपास पाचशे डिजिटल रॅलींचं आयोजन करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लिहिलेलं पत्र पक्ष कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचवतील. या पत्रात स्वावलंबी भारत आणि सरकारच्या अन्य कार्याची माहिती देण्यात आली आहे. देशातल्या दहा कोटी कुटुंबापर्यंत हे पत्र पोहोचवण्याचं उद्दीष्ट निश्चित करण्यात आलं आहे.
****

 टाळेबंदी चालू ठेवली तर राज्याची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती आहे, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाचं संकट दीर्घकाळ राहण्याची शक्यता लक्षात घेता, टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही असं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूची राज्यातली सद्यस्थिती, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेली तयारी आदींची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांशी अनौपचारिक संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. कोरोना विषाणूची सर्वाधिक रुग्णसंख्या गाठण्याच्या जवळपास राज्य पोहोचलं असून, ३१ तारखेला केंद्र सरकार टाळेबंदीबाबत काय निर्णय घेईल त्यावरही हा निर्णय अवलंबून असल्याच मुख्यमंत्री म्हणाले.
****

 बंधपत्रित -बॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार आता आदिवासी भागातल्या बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजार रुपयांऐवजी ७५ हजार रूपये, आदिवासी भागातल्या बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टरांना ७० हजार रुपयांऐवजी ८५ हजार रूपये आणि इतर भागातल्या एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजार रुपयांऐवजी ७० हजार रुपये तसंच विशेषज्ञ डॉक्टरांना ६५ हजार रुपयांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासोबतच कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचाही निर्णयही घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
****

 राज्यात कोविड संसर्ग चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा आवश्यक नसल्याच्या सरकारच्या मताबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश के के तातेड यांच्या पीठासमोर दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं ही प्रतिक्रिया नोंदवली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या या याचिकेत, रत्नागिरीतल्या रुग्णांना तपासणीसाठी दोनशे किलोमीटर दूर असलेल्या सांगलीत जावं लागत असल्याचं सांगितलं. न्यायालयानं यासंदर्भात राज्यसरकारला शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
****

 राज्यात काल दोन हजार ६८२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६२ हजार २२८ झाली आहे. काल दिवसभरात उपचारादरम्यान १६ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत काल एक हजार ४३७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या ३६ हजार ७१० झाली आहे. दिवसभरात मुंबईत ३८ जणांचा मृत्यू झाला.

 दरम्यान, या आजाराशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने काल उच्चांक गाठला. काल दिवसभरात आठ हजार ३८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामध्ये सात हजार ३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातले आहेत. पहिल्यांदाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण २६ हजार ९९७ रुग्ण बरे उपचारानंतर बरे झाले आहेत.

 सध्या राज्यात एकूण ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवीन ५२ रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ४५९ झाली आहे. एका ६५ वर्षीय रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पुरुषाला गेल्या २१ तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या मृत्यूमुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ६९ झाली आहे.

 दरम्यान काल ३८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ९३७ रुग्ण उपचारानंतर घरी परतले असून, सध्या ४५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल आढळलेल्या रुग्णांमध्ये गजानन नगर एन 11 हडको इथं पाच, उस्मानपुरा ४, इटखेडा तसंच सिडको एन 2 मधल्या विश्रांती कॉलनीत प्रत्येकी तीन कैलास नगर, सातारा गावातलर खंडोबा मंदीर परिसर, जुना बायजीपुरा तसंच बायजीपुरा भागात प्रत्येकी दोन, तर नेहरू नगर, कटकट गेट, कैलास नगर, माळी गल्ली, एन सहा सिडको, भूषण नगर, पहाडे कॉर्नर, श्रीनिकेतन कॉलनी, खडकेश्वर, जुना बाजार, नारळी बाग दुसरी गल्ली, गणेश कॉलनी, शिवशंकर कॉलनी पहिली गल्ली, बायजीपुरा दुसरी गल्ली, विवेकानंद नगर, एन 4 सिडको, शिवाजी नगर, एन 6 सिडको संभाजी कॉलनी, भवानी नगर, जुना मोंढा, किराडपुरा, रोशनगेट, राशीदपुरा, मोतीवाला नगर, जुना बाझार, अझिम कॉलनी, एन 6 चिश्तिया कॉलनी, मंजुरपुरा आणि राम नगर भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात दौलताबाद, वाळूज, आणि कन्नड इथंही काल प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
****

 लातूर शहरात काल दहा बाधित रुग्ण आढळले. यामध्ये मोतीनगर भागातल्या एकाच घरातल्या ९ जणांचा समावेश आहे. अन्य एक जण हा देसाई नगर भागातला रहिवाशी असून तो मुंबईतून आलेला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही १२९ झाली आहे. यापैकी ६१ रुग्ण आजारातून मुक्त होऊन घरी गेले आहेत तर ६६ जणांवर उपचार सुरू आहेत.
****

 रभणी जिल्ह्यात काल दिवसभरात सात रुग्ण बाधित असल्याचं आढळून आलं. काल सकाळी मिळालेल्या अहवालात जिंतूर तालुक्यातल्या वाघी बोबडे इथला एक व्यक्ती बाधित असल्याचं आढळलं होतं तर संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन सहा जण बाधित असल्याचं आढळलं. पूर्णा, सेलू, गंगाखेड तसंच मानवत तालुक्यातले हे रुग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या ७४ झाली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यात आता एकूण १७१ रुग्ण झाले आहेत. यापैकी ९६ जण विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातले चार रुग्ण वसमत तालुक्यातले तर एक जण सेनगाव तालुक्यातला आहे. सेनगाव तालुक्यात आढळलेला रुग्ण मुंबईहून आलेला आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. मुखेड शहरातल्या कोळी गल्ली इथल्या ६१ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतरचा अहवाल बाधित असा आला आहे. नांदेड शहरातल्या मित्तलनगर आणि लोहार गल्ली इथं प्रत्येकी एक, तर हिंगोली जिल्ह्यातल्या कसबे धावंडा इथले दोन रुग्ण नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १४३ झाली आहे. काल नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले. ३६ रुग्ण नांदेडच्या रुग्णालयात, तर दोन रुग्ण मुंबईत उपचार घेत आहेत. दोन रुग्ण यापूर्वी फरार झाले आहेत.

 दरम्यान, मुखेड इथल्या कोरोना विषाणू बाधित मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नांदेड शहरातल्या गोवर्धन घाट परिसरातल्या काही नागरीकांनी काल विरोध केला.  त्यानंतर पोलिस बंदोबस्तात या महिलेच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****

 बीड शहरातही काल एक जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं. बालेपीर भागात राहणारी ही महिला मुंबईहून आलेली आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूनं मृत्यू पावलेल्या दोन जणांची नोंद झाली आहे. उमरगा तालुक्यातल्या बेडगा इथल्या एका कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णाचा काल मृत्यू झाला. या आजाराचा जिल्ह्यातला हा पहिला बळी आहे. त्याला रक्तदाब तसंच धुमेहाचाही आजार होता. गेल्या २५ मे रोजी तो मुंबईहून आला होता.  उस्मानाबाद तालुक्यातल्या कोंड इथल्या एकाचा परवा रात्री मृत्यू झाला होता, त्याचा बाधित असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. जिल्ह्यातल्या आणखी दोन रुग्णाचा अहवाल बाधित असल्याचं लातूरच्या प्रयोगशाळेकडून काल सांगण्यात आलं आहे. यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या ६४ झाली असून आतापर्यंत १५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

 दरम्यान, उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने आज आणि उद्या संपूर्ण जिल्हाभरात "जनता कर्फ्यू"चे आदेश दिले आहेत. या दोन्ही दिवसांत नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केलं आहे.

 एकूण रुग्ण ६२ आढळून आलेले आहेत. आतापर्यंत आणि बऱ्याच जणांना डिस्चार्ज करण्यात आलेले आहे. म्हणजे विविध रुग्णालयामध्ये एकूण ५० रुग्ण उपचाराखाली आहेत. आणि हे सर्व रुग्ण स्टेबल आहेत आणि कुठलाही रुग्ण सिरीअस नाही. काही पेशन्ट सिरीअस होते त्यांचेही डिस्चार्ज आता उद्या किंवा परवा करण्यात येईल. हे सर्व मोठ्या संख्येने रुग्णाच्या संख्या असल्या कारणानं सर्व जनतेला माझी विनंती आहे. की, प्रशासनास सहकार्य करावे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवा. प्रशासनाला सहकार्य करा.

 जनता कर्फ्यूच्या दरम्यान रुग्णालयं, औषधी दुकानं तसंच दूध विक्रीचे दुकानं, सुरू राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध होईल. बाकीच्या सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
****

 जालना जिल्ह्यात काल रात्री आणखी पाच जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. यामध्ये जालन्यातल्या साईनाथनगर आणि भोकरदन तालुक्यातील धावडा इथल्या प्रत्येकी एक जणाचा आणि घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
 सकाळी आढळलेल्या दोन रूग्णांमध्ये मठपिंपळगाव इथल्या एका मुलाचा, आणि कोवीड केअर सेंटरमध्ये असलेल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता १२२ झाली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांना कोरोना मुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातली जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि बाजारपेठा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरु राहणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितलं. यासंदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावरून येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यात तीन दिवसाच्या संचारबंदीनतर काल शिथिलता देण्यात आली. मात्र बाजार पेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सगळीकडे सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन केलं नसल्याचं आढळून आलं.
****

 अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात १३ नवीन व्यक्तींचे अहवाल बाधित असल्याचे प्राप्त झाले. बहुतांशी बाधित रूग्ण वेगवेगळ्या ठिकाणाहून जिल्ह्यात आलेले आहेत.
 दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कोरोना विषाणू बाधित महिलेचा काल सकाळी मृत्यू झाला. या महिलेनं परवा जुळ्या बाळांना जन्म दिला होता. ही महिला मुंबईहून आली होती आणि तपासणीत ती कोरोना विषाणू बाधित आढळली होती. दरम्यान, या महिलेची दोन्ही बाळं सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे.
*****

 आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणारा पायी दिंडी वारी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल पुण्यात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने थेट पंढरपूर इथं नेल्या जाणार आहेत. या दोन पालख्यांसह पैठण इथून संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराज, सासवड हून संत सोपानकाका महाराज, तर मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाई यांच्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. या पालख्यांमध्ये संतांच्या पादुकांसोबत फक्त दहा वारकऱ्यांना पंढरपुरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशी यंदा एक जुलै रोजी साजरी होत आहे.
****

 लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाजार समिती आवारात शिल्लक असल्यामुळे तो बाहेर घेऊन जाण्यासाठी आज शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार आहेत. हे व्यवहार सोमवारपासून पुन्हा सुरू होतील अशी माहिती सभापती ललितकुमार शहा यांनी दिली आहे.
****

 औरंगाबाद शहरात राहणाऱ्या तृतीयपंथीयांना आमदार अंबादास दानवे यांच्याकडून काल अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक प्रभागात व्यवसाय बंद असलेल्या रिक्षाचालकांना औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी जीवनावश्यक साहित्याचं वितरण केलं.
****

 खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन आणि भत्ते दिले जावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याचं निवेदन भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीनं काल औरंगाबाद इथं शिक्षण उपसंचालकांना देण्यात आलं. शासकीय नियमाप्रमाणे शिक्षक - शिक्षकेतरांना पूर्ण वेतनश्रेणी आणि भत्ते मिळतात की नाही हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी, या समितीचे कामकाज पाहण्यासाठी उपशिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमावे यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
****

 छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं काल छत्तीसगडमध्ये रायपूर इथं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानं गेल्या ९ मे पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रशासकीय सेवेतून काँग्रेस पक्षामार्फत राजकारणात आलेले अजित जोगी नोव्हेंबर २००० मध्ये छत्तीसगढ राज्याची स्थापना झाल्यावर पहिले मुख्यमंत्री झाले होते. २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत, जनता काँग्रेस छत्तीसगढ या पक्षाची स्थापना केली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जोगी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****

 निवृत्त न्यायमूर्ती बी एन देशमुख यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांचं काल पहाटे निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. इंग्लंडहून वकिलीचं शिक्षण पूर्ण करून परतलेल्या देशमुख यांची १९७२ साली शेतकरी कामगार पक्षाकडून विधान परिषदेवर निवड झाली होती. १९८६ ते १९९७ अशी अकरा वर्ष ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले आहेत.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रमिकांच्या न्याय्य हक्कासाठी वकिली पेशाच्या माध्यमातून लढणारं एक कणखर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****

 औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे संस्थापक मेजर गंगाधर घुगे यांचं काल सकाळी औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या आठवडाभरापासून ते न्यूमोनियाने आजारी होते, औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संरक्षण दलातून निवृत्त झाल्यावर १९८८ मध्ये मेजर घुगे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत झाले. त्यांनी उभारलेल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे. औरंगाबाद शहरात या शाळेच्या चार शाखांमधून अध्यापनाचं काम केलं जात आहे. मेजर घुगे यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना, विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहे.
****

 हिंगोली तालुक्यात घोटा इथल्या तलाठ्याने जमिनीचा फेर घेऊन सातबारा बनवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती, या प्रकरणी तक्रारीनंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या तक्रारीची पडताळणी केली जात असताना, सदर तलाठ्याला संशय आल्यानं, त्याने लाचेची रक्कम घेण्यास नकार दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****

 लातूर जिल्ह्यातल्या कृषी विषयक समस्यांवर पालकमंत्र्यानी बैठक बोलवावी आणि चर्चा करावी अशी मागणी भाजपा आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे. कृषी विभागाकडे असलेली माहिती पालकमंत्र्यांना दिली जाते, मात्र वास्तव आणि कागदावरची माहिती यात खूप मोठी तफावत असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी चर्चा करावी, असं ते म्हणाले.
****

 टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळापासून परभणीच्या जिंतूर इथल्या आर्यवैश्य समाजानं पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दररोज जेवणाची व्यवस्था केली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरापासून दूर आणि जनतेच्या रक्षणात २४ तास कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाजारपेठेत चहा मिळणे ही अवघड झाले. ही बाब लक्षात घेऊन आर्यवैश्य समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ मार्च पासून दररोज सर्वांसाठी एक प्लेट जेवणाची व्यवस्था केली. या सेवा कार्यांमुळे अधिकारी, कर्मचारी समाधानी दिसून येत होते. या अन्नसेवाचा समारोप शुक्रवारी उपविभागीय  पोलिस अधिकारी स्वयम् दत्त यांच्या उपस्थित मिष्टान्न भोजनाने नागेश्वर मंदिरात करण्यात आला. यावेळी  आर्यवैश्य समाजाबद्दल सर्वांनी गौरवउद्गार काढले.  
आकाशवाणी बातम्यासाठी परभणी वरून विनोद कापसीकर
****

 कापूस संकलन केंद्रावर खरेदीस विलंब होत असल्याच्या निषेधार्थ परभणी - गंगाखेड रस्त्यावर ब्राम्हणगांव फाट्याजवळ काल शेतकऱ्यांनी स्तारोको आंदोलन केलं. यासंदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचारी कोणताही खुलासा करत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यास संपूर्ण यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या १७०० अंगणवाडी सेविकांना होमिओपॅथिक डॉक्टर पवन चांडक यांनी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक औषधीचं मोफत वाटप केलं आहे. या अंगणवाडी सेविका सध्या जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम करीत आहेत.
****

 टाळेबंदीच्या काळात घरकाम करणाऱ्या महिलांचंही काम बंद झाल्यानं त्यांना पाच हजार रुपयांची शासकीय मदत देण्याची मागणी परभणीच्या बहुजन वंचित महिला आघाडीच्या डॉ. विजया चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
****

 नांदेडहून काल १४२० कामगारांना घेऊन एक विशेष श्रमिक रेल्वे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादला रवाना झाली. यासर्व प्रवाशांचे तिकीट जिल्हा प्रशासनानं काढली आहेत. गाडीतून नांदेडहून ४०२, लातूरहूल ४९, बीड १२५, जालना १८, औरंगाबाद २८८, यवतमाळ १९८, अमरावती २०० तर बडनेराहून कांही कामगार प्रवास करत आहेत.
****

 परभणी महानगरपालिकेच्या वतीनं सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर न राखणाऱ्या ९१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नऊ हजार १०० रूपये दंड आकारण्यात आला.
****

 मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये दिले आहेत.
****

 माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम तीन जून रोजी गोपीनाथ गडावरच होईल, मात्र या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या कार्यक्रमाचं सामाजिक माध्यमावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार योगेश यांचं काल निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. १९७० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आनंद, रजनीगंधा आदी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी रसिकांच्या आजही स्मरणात आहेत.
*****
***

No comments: