Wednesday, 27 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27 MAY 2020 TIME – 13.00 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात तीन हजार ९३५ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ६४ हजार ४२६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले ६ हजार ३८७ नवीन रुग्ण आढळले. देशातली रुग्णसंख्या एक लाख ५१ हजार ७६७ झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे १७० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण मृतांची संख्या चार हजार ३३७ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोविड संसर्गासंबंधी एक लाख १६ हजार ४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली, आतापर्यंत ३२ लाख ४२ हजारावर नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरने सांगितलं आहे. देशात सध्या ४३५ सरकारी आणि १८९ खासगी अशा एकूण ६२४ पेक्षा अधिक प्रयोगशाळांमधून दररोज एक लाख दहा हजार कोरोना विषाणू संसर्ग नमुन्यांची चाचणी होत असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी तीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या एक हजार तीनशे साठ इतकी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या तीन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे, आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून आलेल्या एकोणीस व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या पंचाहत्तर झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातला निमखेड इथला एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे. हा कर्मचारी मुंबईहून परत येताना लातूर इथल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आला होता. या सहकाऱ्याचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या पोलिस कर्मचारी स्वत: शेतातच विलगीकरणात राहिला होता. दरम्यान, आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच त्याला जिल्ह्यातल्या कोवीड सुश्रुषा केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्याच्या संपर्कातल्या सहा जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
****
सांगली जिल्ह्यात आज आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण खानापूर, शिराळा, कडेगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यातील असून जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ब्याण्णव झाली आहे.
****
धुळे जिल्ह्यात आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात शिरपूर तालुक्यातले दोन, तर धुळे शहरातल्या एका रुग्णाचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयावर पुरेशा रेल्वे गाड्या पुरवण्यास सक्षम नसल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. ठाकरेंच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना महाराष्ट्र सरकारनं प्रवाशांची यादी आणि हव्या असलेल्या गाड्यांची यादी द्यावी, असं गोयल यांनी ट्वीटरवरून सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या मागणीनुसार रेल्वेने काल एकशे पंचेचाळीस गाड्यांची सोय केली होती, परंतु प्रवासी नसल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त तेरा गाड्या सोडण्यात आल्या. दरम्यान, या गोंधळातच मुंबईत रात्री उशिरा स्थलांतरित मजुरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली. हजारो कामगार कुटुंबांसह जमा झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. सीएसएमटी स्थानकाची क्षमता २३ रेल्वे गाड्यांची असताना या स्थानकावरून ४९ गाड्यांचं वेळापत्रक लावण्यात आलं होतं. तर इंजिन उपलब्ध नसल्याने प्रवासी भरलेल्या काही गाड्या तीन तासापेक्षा अधिक वेळ स्थानकावर थांबून राहिल्या होत्या, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्वस्त धान्य दुकानातून तसंच विलगीकरण केंद्रातून वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. स्वस्त खराब प्रतीचं धान्य वितरित होत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर पासवान यांनी हे निर्देश दिले. केंद्र सरकारकडून राज्यांना पाठवल्या जाणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेशी काहीही तडजोड केली जात नसल्याचं, पासवान यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात एक महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यात उमरा फाट्यानजीक दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात मृत महिलेचा पती जखमी झाला आहे.
****

No comments: