Saturday, 30 May 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.05.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२० सायंकाळी ६.००

****

·      विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.

·      औरंगाबाद जिल्हा कोरोना विषाणूमुक्त करा - पालकमंत्री देसाई यांचं आवाहन.

·      औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक हजार चारशे सत्त्याऐंशी झाली आहे. 

आणि

·      नांदेड जिल्ह्यात एकशे तीन रुग्ण कोरोना विषाणू मुक्त.

****

एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विद्यापीठांच्या परीक्षा तसंच शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपवली पाहिजे असं सांगून त्यादृष्टीनं विविध पर्याय पडताळून पाहण्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केल्या. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसंच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचं याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत. मात्र, आता परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपवण्याचा विषय प्राधान्यानं हाताळावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परस्थितीही सतत बदलत आहे. त्यामुळे या संकटाचं संधीत रुपांतर करता येईल का, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याचा विचार करायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती या बैठकीत दिली.

****

औरंगाबाद जिल्हा कोरोना विषाणू मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी एकमेकांतलं अंतर, मास्क आणि वारंवार हात धुणं आदी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. त्यांनी आज औरंगाबाद इथं या संदर्भातील आढावा बैठक घेतली. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला त्यांनी यावेळी काही सूचना केल्या. ते म्हणाले -

ताप तपासणी केंद्र जी आहेत २१ ठिकाणी सुरू त्यांच्या बरोबरीनं फिव्हर कँम्प घ्यावेत आणि ते ज्या ज्या प्रभागांमध्ये जास्त आपल्याला रुग्णांची किंवा संसर्ग होतो किंवा काही लक्षणे दिसतात किंवा लक्षणे नसतांना टेस्ट घेतली तरी ती वाढलेली दिसते अशा म्युन्सिपल वार्डच्या हद्दींमध्ये हे कॅंम्प सुरु करावेत. रक्तदान हे कमी पडता कामा नये जरी कोविडचं आणि रक्तदानाचं फारसं हे नसलं तरी इतर आजारांसाठी रक्तदान फार महत्वाचं आहे. इतर आजार आणि कोरोना हे एकत्र येवू नये. त्यासाठी इतर आजारांची तेव्हढीच दक्षता घ्यायची आहे. म्हणून खासगी रुग्णालये, खासगी डॉक्टर यांनी त्यांचं कामकाज सुरु करावं.

यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरच्या संख्येत घट झाली असून जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची संख्या १३८ असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. टोळधाड आली तर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून तयारी करण्यात आली असल्याचं पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितलं.

****

पालकमंत्री देसाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील कोविड-19 संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी हे संशोधन केंद्र नक्कीच मोलाचं काम करेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीकरता विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ३५ लाख रुपये आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील नऊ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक हजार चारशे सत्त्याऐंशी झाली आहे. आज सकाळच्या सत्रात कोरोना विषाणूचे अठ्ठावीस नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील नऊशे सदोतीस रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या चारशे एक्क्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळानं कालपर्यंत एक्केचाळीस हजार ८७४ बसच्या फेऱ्यांच्या माध्यमातून पाच लाख आठ हजार ८०० हून अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहचवलं आहे. परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसनं पाठवण्यासाठी शासनानं १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत ९४ कोटी ६६ लाख रुपये यावर खर्च झाले आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरीत मजूर आणि कामगार त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहेत तसंच इतर राज्यांत अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही राज्यात आणलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयानं दिली आहे.

****

वंदे भारत उपक्रमांतर्गत २६ विमानांनी विदेशातील तीन हजार चारशे एकोणसाठ नागरिक राज्यात परतले असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयातर्फे देण्यात आली आहे. येत्या सात जून पर्यंत आणखी सहा विमानं येणं अपेक्षित आहे. ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया आदी देशांतून त्यांना राज्यात आणलं गेलं आहे.

****

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना तसंच पोलिसांना कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूची लागण झाल्यास योग्य उपचार करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी या विषाणूची लागण झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेल्या जवानांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधताना ही माहिती दिली. मुंबई, पुणे, मालेगांव, औरंगाबाद आणि नागपूरसारख्या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागांमधे राज्य राखीव पोलीस दलाच्या तब्बल त्रेसष्ट कंपन्या तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. या दलाच्या पाचशे पंचेचाळीस जवानांना याची लागण झाली होती. त्यातील तिनशे अठ्ठ्याऐंशी जवान वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले असल्याचं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित चार रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरातल्या मिल्लत नगर भागातील एका ३२ वर्षीय रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या आता १४४ झाली आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी पंचवीस जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून एकूण रुग्णांची संख्या आता दोनशे सत्तावीस झाली आहे. कोरोना विषाणूमुळे एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.

****

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नानसी इथं एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता एकशे तेवीस झाली आहे. जिल्ह्यातील बारा रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. त्यांना आज कोवीड रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूचे तीन नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील १३१ जणांचे अहवाल तपासणीसाठी देण्यात आले होते. त्यापैकी मलकापूर इथल्या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ३३ कोरोना विषाणूबाधीत रुग्णांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळल्यानं या रुग्णांची संख्या आता तेहतीस झाली आहे. हा रुग्ण गुजराथमधून आला असून त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. जिल्ह्यातील पाच रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून आता २८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे सात रुग्ण आज आढळले आहेत. यात संगमनेर इथले दोन रुग्ण आहेत. जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता एकशे चोवीस झाली आहे.

****

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे आठ रुग्ण आज आढळले आहेत. वाशीम जिल्ह्यात याविषाणूमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

****

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या लातूर जिल्ह्यातील सर्व ३७ हजार शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जवाटप करणार आहे. माजी मंत्री आणि बँकेचे मार्गदर्शक दिलीप देशमुख यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील माहिती दिली. खरीप हंगाम २०२० मधे एकशे वीस कोटी रुपयांचं हे कर्जवाटप केलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

अमरावती इथं पारपत्र अधिनियमांचं उल्लंघन करणाऱ्या अठरा विदेशी नागरिकांचा जामीन अर्ज न्यायालयानं आज मंजूर केला. गेल्या नऊ मार्चला हे नागरिक शहरातल्या खोल्हापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळी थांबले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

****

No comments: