Friday, 29 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE –29 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत ४६ ने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या एक हजार ४५३ झाली आहे. यापैकी ९०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४८४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये एन ११ हडको परिसरातल्या गजानन नगरात ५, इटखेडा, उस्मानपुरा, तसंच सिडको एन टू परिसरातल्या विश्रांती कॉलनीत प्रत्येकी ३, कैलास नगर, सातारा परिसरातलं खंडोबा मंदिर तसंच जुना बायजीपुरा इथं प्रत्येकी २, तर नेहरू नगर, कटकट गेट, माळी गल्ली, एन सहा सिडको, भूषण नगर, पहाडे कॉर्नर, श्रीनिकेतन कॉलनी, खडकेश्वर, उस्मानपुरा, जुना बाजार, नारळी बाग, रशीदपुरा, गणेश कॉलनी, शिवशंकर कॉलनीतली पहिली गल्ली, बायजीपुऱ्यातली दुसरी गल्ली, सिडको एन ४ विवेकानंद नगर, शिवाजी नगर, एन सहा संभाजी कॉलनी, भवानी नगर-जुना मोंढा किराडपुरा, रोशनगेट, मोतीवाला नगर, या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद, वाळूज सिडको, तसंच कन्नड या भागातही प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि एका परिचारिकेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे आरोग्य केंद्र सील करण्यात आलं. या केंद्राचा परिसर निर्जंतूक करण्यात येत आहे.
*****
अहमदनगर इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना विषाणू बाधित महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला. ही महिला मुंबईहून आली होती आणि तपासणीत ती कोरोना विषाणू बाधित आढळली होती. दरम्यान, या महिलेची दोन्ही बाळं सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे.
****
राज्यात सध्या ३८ हजार नऊशे ३९ रुग्णांवर कोरोना विषाणू संसर्गाचे उपचार सुरू आहेत. राज्यात काल कोरोना विषाणू बाधेचे नवे दोन हजार ५९८ रूग्ण समोर आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात देशात सात हजार चारशे सहासष्ट लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळं देशात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या एक लाख पासष्ट हजार ७९९ झाली आहे. गेल्या २४ तासांत १७५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या चार हजार ७०६ झाली आहे.दरम्यान, रुग्ण कोरोना संसर्गातून बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतकं झालं असून आतापर्यंत ७१ हजार १०६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोविड संसर्गासंबंधी एक लाख २१ हजार ७०२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली, आतापर्यंत ३४ लाख ८३ हजार ८३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरने सांगितलं आहे. देशात कोरोना विषाणू संसर्ग नमुन्यांची चाचणी करण्यासाठी सध्या ४४६ सरकारी आणि १९२ खासगी अशा एकूण ६४१ प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
****
विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी विशेष श्रमिक रेल्वेमधून प्रवास करू नये, असं आवाहन रेल्वे विभागानं केलं आहे. गर्भवती, दहा वर्षांपेक्षा लहान मुलं तसंच ६५ वर्षांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनीही सध्या रेल्वे प्रवास टाळावा, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे. श्रमिक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी काही जण आधीपासूनच आजारी असल्याचं दिसून आलं आहे, यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे संस्थापक मेजर गंगाधर घुगे यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या आठवडाभरापासून ते न्यूमोनियाने आजारी होते, औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. संरक्षण दलातून निवृत्त झाल्यावर १९८८ मध्ये मेजर घुगे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत झाले. त्यांनी उभारलेल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे. औरंगाबाद शहरात या शाळेच्या चार शाखांमधून अध्यापनाचं काम केलं जात आहे. मेजर घुगे यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना, विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहे.
****
हिंगोली तालुक्यात घोटा इथल्या तलाठ्याने जमिनीचा फेर घेऊन सातबारा बनवून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली होती, या प्रकरणी दाखल तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या तक्रारीची पडताळणी केली जात असताना, सदर तलाठ्याला संशय आल्यानं, त्याने लाचेची रक्कम घेण्यास नकार दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****

No comments: