Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
संकटाच्या काळात राजकारण
न करता मदत करणं हा महाराष्ट्राचा संस्कार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
Ø
देशांतर्गत
विमानसेवेला उद्यापासून देशभरात सुरवात होणार. आरोग्य मंत्रालयानं प्रवाशांसाठी जारी
केल्या मार्गदर्शक सूचना.
Ø वंदे भारत या मोहीमेद्वारे, १७ विमानांमधून, २ हजार
४२३ नागरिक
मुंबईत परतले.
आणि
Ø
जालना
जिल्ह्यातल्या अंबड शहरातले सर्व व्यवहार तीन दिवस राहणार बंद. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे
प्रशासनाचा निर्णय.
****
संकटाच्या काळात
राजकारण न करता मदत करणं हा महाराष्ट्राचा संस्कार आहे.
तो आपण पाळत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
समाजमाध्यमांद्वारे आज त्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रमजान ईदच्या निमित्तानं
मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही
दिल्या.
राज्यात
उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकही कामावर परतू लागले
आहेत. याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले,
लॉकडाऊन हा आपण हळू हळू उठवतो
आहे.उद्योग धंद्यामध्ये ७० हजारांना परवानगी दिली आहे ५० हजार उघडले गेले आहेत.पाच
साडे पाच लाख लोकं कामावर आले आहेत. रोजगार हमीवर जवळपास सहा ते साडेसहा लाख लोक कामावर
आले आहेत.काही ऑफिसेस उघडतो आहे. काही भागामध्ये दुकानं उघडतो आहोत.लॉकडाऊन हा शब्द
बाजूला ठेवा हळूहळू आपण काय उघडत जाणार त्याची यादी मी आपल्याला देत जाईल पण ती दिल्यानंतर
आम्ही बघणार गर्दी झाली, तर दुर्देवानं परत
बंद करावे लागेल. एक अंतर ठेवा,
लाईन लावा, आणि जे काही आपलं आयुष्य सुरळित सुरु होत आहे, ते सुरळीत असंच
चालू ठेवा.
टाळेबंदी एकदम उठवणंही योग्य नसून, काळजीपूर्वक सुरु करण्यात आलेल्या गोष्टी गर्दी केल्यामुळे आणि बेशिस्तीनं
वागल्यामुळे पुन्हा बंद होणार नाहीत,
याची काळजी प्रत्येक नागरिकानं
घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिधापत्रिका नसलेल्या लोकांना
अन्नधान्य देण्याची राज्य शासनाची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे
आभार मानले. जूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरु होत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार नाही याची हमी देतानाच, अंतिम
वर्षाच्या परीक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये,
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
देशांतर्गत विमानसेवेला उद्यापासून देशभरात सुरवात
होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना
जारी केल्या आहेत. प्रवाशांनी आपापल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावं,
सर्व राज्यांनी विमानतळं, रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर थर्मल स्क्रीनिंग करण्याची
सोय करावी, तसंच लक्षणं नसलेल्या प्रवाशांकडून घरातच १४ दिवस अलगीकरणात राहण्याची हमी
घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, तिकिटांच्या सोबत प्रवाशांना सूचनापत्रकही
दिलं जाईल.
लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांना जवळच्या सुविधा केंद्रात
विलगीकरणात ठेवलं जाणार असून, तीव्र लक्षणं आढळलेल्या प्रवाशांना कोविड रुग्णालयांमध्ये
उपचारासाठी दाखल केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याखेरीज आवश्यक
वाटल्यास राज्य सरकारांनी आपले नियम बनवून त्यानुसार कार्यवाही करावी, असंही मंत्रालयानं
म्हटलं आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांनी मात्र देशांतर्गत हवाई वाहतूक
सुरू करण्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव असमर्थता दर्शवल्याचं वृत्त आहे.
****
परदेशात अडकलेल्या
भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेद्वारे, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक परत
आले आहेत. यापैकी ९०० जण मुंबई शहरातले, १ हजार १३९ जण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधले,
तर ३७८ जण इतर राज्यांमधले आहेत.
दरम्यान मुंबईत आलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या ४३ हॉटेलमध्ये
विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक, तर राज्य
सरकारनंही १५
कर्मचाऱ्यांचं पथक स्थापन केलं आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना
त्यांचे जिल्हे आणि इतर राज्यांमधे पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात असल्याचं आमच्या
प्रतिनिधीनं कळवलं आहे.
*****
जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरातले सार्वजनिक
व्यवहार पुढील तीन दिवसांसाठी पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन
आणि अंबड व्यापारी महासंघानं घेतला आहे. शहरातल्या नाईकवाडी भागात आज कोरोना विषाणू बाधित तीन रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या एका बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यापासून
महानगर पालिकेच्या वतीनं खबरदारीच्या विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोरोना
रुग्ण आढळून आलेल्या लेबर कॉलनी भागाला कोरोना बाधित क्षेत्र, म्हणजेच कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं
आहे. या भागातल्या नागरिकांना पुढचे १३ दिवस सामान्य ये-जा करता येणार नाही. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा
तुटवडा भासू नये, याकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी महानगरपालिकेला केल्या आहेत.
महापालिकेनं जीवनावश्यक वस्तू पुरवठा पथक स्थापन
केलं असून, नागरिकांनी त्यांना संपर्क साधून मागणी नोंदवण्याचं
आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आणखीन ४ जणांना कोरोना
विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून, हे ४ जण मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद
या ठिकाणाहून जिल्ह्यात आले होते.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातल्या निमोण इथल्या एका
कोरोना बाधित रुग्णाचा
काल रात्री नाशिक इथं मृत्यू झाला. कोरोनामुळे अहमदनगर जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची
संख्या आता ७, तर एकूण कोरोना
बाधित रुग्णांची संख्या
आता ७४ झाली आहे.
****
धुळ्यात हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार
घेत असलेल्या एका ६७ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी कोरोना विषाणुच्या
बाधेमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात
१२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धुळ्यात आतापर्यंत १०८ कोरोनाबाधित
रुग्ण आढळले आहेत. त्यातले ५७ जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
****
बुलडाणा जिल्हयातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या टुणकी या गावामध्ये, अनेकजण इतर गावांमधून परतले आहेत. मुंबईतल्या
धारावीतून आलेल्या एका कुटुंबातल्या १७ वर्षाच्या
मुलाचा अहवाल कोरोना बाधित असा आला आहे. त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींचे अहवाल प्रलंबित
आहेत. त्यामुळे गावात ३०० मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून, सगळी दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत.
****
सातारा जिल्ह्यात विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयांत विलगीकरणात असलेल्या ३१ जणांचे वैद्यकीय अहवाल आज कोरोनाबाधित
असे आले आहेत. मुंबई इथून आलेल्या आणि पाचगणी इथं मृत्यू झालेल्या एका ७० वर्षीय महिलेच्या आज प्राप्त
झालेल्या अहवालावरुन तिलाही कोरोना विषाणूची लागण झाली होती, हे आज स्पष्ट झालं.
****
भंडारा जिल्हयात साकोली, लाखांदूर आणि पवनी या तालुक्यात
प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. हे तीनही रुग्ण मुंबईतून भंडाऱ्यात आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात
आलं आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या
उमरी तालुक्यातल्या नागठाणा बुद्रुक इथल्या मठातले निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराज यांची हत्या करुन फरार झालेल्या साईनाथ लिंगाडे
या तरुणाला नांदेड पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. आज
पहाटे २ वाजेच्या सुमारास त्यानं मठात चोरीच्या उद्देशानं महाराजांसह आणखी एकाची हत्या
केल्याचं उघडकीस आलं होतं.
****
परभणीच्या शासकीय रुग्णालयात कोविड-१९च्या नमुने तपासणीसाठी नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं
परवानगी दिली आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, परभणी मधल्या जिंतूर बसस्थानक ते शिवाजी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम काल संध्याकाळी सुरू झालं. लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संघटनांनीही हा रस्ता दुरुस्त
करण्याची मागणी केली होती.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला काल रात्री राष्ट्रीय महामार्गालगत
गळती लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर हा
प्रकार झाल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच दुरूस्तीचं काम केलं.
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या देगाव,
गुरसाळे, आढीव, चिलाईवाडी, नेमतवाडी हद्दीतल्या एनटीपीसी प्रकल्पाचे १७ वीज वाहक टॉवर
अज्ञातांनी कापल्याची बाब आज सकाळी समोर आली. यामुळे राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचं मोठं नुकसान झालं असल्याची
माहिती वरिष्ठ प्रबंधक दीपक
साळुंखे यांनी दिली. ही घटना मध्यरात्री घडली असावी असा अंदाज आहे.
*****
***
No comments:
Post a Comment