Monday, 25 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात; राज्य सरकारचीही मुंबईतून २५ विमानं सुरु करण्यास परवानगी
** जनतेनं गर्दी करून शिस्तीचं पालन केलं गेलं नाही तर पुन्हा टाळेबंदी लावावी लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
** राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत काल तीन हजारानं वाढ; ५८ रुग्णांचा मृत्यू
** औरंगाबादमध्येही दोन जणांचा मृत्यू तर ३७ नवे रूग्ण
** मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये रूग्णांच्या संख्येत वाढ
** महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतिम यादीतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारकडची थकबाकी दाखवून त्यांना नव्यानं पिक कर्ज वाटप करण्याचे राज्य सरकारचे आदेश
**
आणि
** टाळेबंदीचे सर्व नियम पाळत आज ईद उल फित्रच्या सणाचा उत्साह
****
देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांनी आपापल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावं, सर्व राज्यांनी विमानतळं, रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर तापमान तपासण्याची सोय करावी, तसंच लक्षणं नसलेल्या प्रवाशांकडून घरातच १४ दिवस विलगीकरणात राहण्याची हमी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, तिकिटांच्या सोबत प्रवाशांना सूचनापत्रकही दिलं जाणार आहे. लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांना जवळच्या सुविधा केंद्रात विलगीकरणात ठेवलं जाणार असून, तीव्र लक्षणं आढळलेल्या प्रवाशांना कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याखेरीज आवश्यक वाटल्यास राज्य सरकारांनी आपले नियम बनवून त्यानुसार कार्यवाही करावी, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं मुंबईतून २५ विमानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. नंतर हळूहळू ही संख्या वाढवण्यात येईल, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. सुरवातीला राज्य सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी असमर्थता दर्शवली होती, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर २५ विमानं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार या प्रवासाबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करेल, असं मलिक यांनी सांगितलं.
****
येत्या एक जून पासून देशभरात शंभर रेल्वे गाड्या सुरु होणार असून, रेल्वे विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही. या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावं लागेल आणि इतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट, पांघरूण, उशी, बेडरोल हे साहित्य मिळणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे.
****
श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. श्रमिक कायद्यामध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत विविध राज्यांमधून व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला आहे. श्रमिकांच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार बांधील आहे, असंही त्यांनी काल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
****
टाळेबंदी एकदम उठवणं शक्य नाही, मात्र हळूहळू सर्व व्यवहार सुरू करीत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मात्र या काळात शिस्तीचं पालन केलं गेलं नाही तर पुन्हा टाळेबंदी लावावी लागेल, असं त्यांनी यावेळी स्‍पष्ट केलं. ते काल समाज माध्यमांद्वारे राज्यातल्या जनतेशी संवाद साधत होते. टाळेबंदीत काळजीपूर्वक सुरु करण्यात आलेल्या गोष्टी गर्दी केल्यामुळे आणि बेशिस्तीनं वागल्यामुळे पुन्हा बंद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक नागरिकानं घ्यावी, असं ते म्हणाले.

लॉकडाउन आपण हळूहळू नक्की उघड्याला लागलेले आहे  उद्योगधंद्यामध्ये ७० हजारांना परवानगी दिली ५० हजार उघडले गेले पाच साडेपाच लाख लोक कामावर  आलेत  रोजगार हमी योजनेत ६ – ७ लाख मजूर कामावर आहेत काही ऑफिसेस उघडतोय काही भागामध्ये दुकान उघडतात लॉकडाउन हा शब्द बाजूला ठेवा हळूहळू आपण काय उघडत जाणर त्याची यादी ही आपल्याला  देत जाईल पण ते दिल्यानंतर आम्ही बघा गर्दी झाली तर दुर्देवाने परत बंद करावा लागेल एक अंतर ठेवा लाईन लावा आणि आपला आयुष्य सुरळीत सुरू होत आहे ते असचं सुरळीत चालू ठेवा
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली असून, नागरिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले.

कोरोनाच्या पॉझिटिव केसेस मध्ये अचानक वाढ झाली याची कल्पना आपल्याला सुरुवातीपासून देतात हा विषाणू काय आहे तो गुणाकार करत जातो आणि या गुणाकाराला मर्यादा नाहीये त्याचा तोच ठरवतो लॉकडाउन का करायचा आपण एकमेकांपासून अंतर का ठेवायचं ते याच्यासाठी याचा प्रादुर्भाव होतो आहे तो संसर्गजन्य असल्यामुळे आपण संपूर्ण शहरभर होल्डिंग,राज्यभर होल्डिंग लावलेली आहेत शिंकतांना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा, मास्क कंपलसरी हात का धुवा त्या सूचना पुढचे काही दिवस आपल्याला पाळावे लागणार
कोरोना विषाणूच्या संकटकाळात प्रत्येक घटकाची सोय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, हा प्रादुर्भाव रोखणं ही सरकारची प्राथमिकता आहे, त्यामुळे या संकटकाळाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
शिधापत्रिका नसलेल्या लोकांना अन्नधान्य देण्याची राज्य शासनाची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले. शाळा आणि शेतीचा हंगाम जून मध्ये सुरु होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार नाही याची हमी देतानाच, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये, असं ते म्हणाले.
राज्यातला रक्तसाठा कमी झाला असून कोविड- नॉनकोविड रुग्णांसाठी पुढे येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे राज्यात होळीपासूनचे सर्व सण साध्या पद्धतीनंच साजरे झाले आहेत. मुस्लिम बांधवांनीही आपलं सहकार्य कायम ठेवत ईदचा सण साधेपणानं साजरा करावा असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
***
राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं ५० हजाराचा टप्पा पार केला आहे. काल एका दिवसात तीन हजार ४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्ण संख्या ५० हजार २३१ इतकी झाली आहे. काल या आजारानं राज्यात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईतल्या ३९ रूग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात काल सहा जणांचा तर सोलापूरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे एक हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ६०० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
राज्याच्या एका वरिष्ठ मंत्र्यालाही या विषाणूची बाधा झाल्याची लक्षण आढळून आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते विलगीकरणात राहत होते. सध्या आपल्या मतदारसंघांत असलेल्या या मंत्र्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतेही चिंतेचे कारण नसल्याचं त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद शहरात काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये सिडको एन आठ मधल्या ६३ वर्षीय पुरुष, टाऊन हॉल परिसरातली ५१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५० बाधितांचा मृत्यू झाला आहे. 
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी ३७ कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या एक हजार २८५ इतकी झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये कैलास नगर, सिडको एन २ मधल्या राम नगरमध्ये प्रत्येकी चार, जटवाडा परिसरातल्या सईदा कॉलनीत तीन, न्याय नगर, धनमंडी आणि वडगाव कोल्हाटी इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. टाऊन हॉल, नारळीबाग, गौतम नगर, संभाजी कॉलनी, महेश नगर, जुना बाजार, एमजीएम परिसर, जुना मोंढ्यातलं भवानी नगर, शंकुतला नगर, आशियाद कॉलनी, बीड बायपास, आरेफ कॉलनी, कटकट गेट, सिडको एन आठ, समता नगर इथं प्रत्येकी एक आणि गंगापूर, तसंच सिल्लोड शहरातल्या अब्दाशहा नगरमध्ये एक रुग्ण सापडला आहे. तर अन्य भागातले तीन रुग्ण आहेत.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६१९ रुग्ण बरे झाले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल ११ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये लातूर शहरातले चार, उदगीरमधले पाच आणि अहमदपूरमधल्या दोघा जणांचा समावेश आहे. दरम्यान, बाधित रूग्ण आढळलेल्या लातूर शहरातला लेबर कॉलनी आणि हडको कॉलनी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागातल्या नागरिकांना पुढचे १३ दिवस कॉलनीतून बाहेर ये-जा करता येणार नाही. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासू नये, याकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी महानगरपालिकेला दिल्या आहेत. महापालिकेनं जीवनावश्यक वस्तू पुरवठा पथक स्थापन केलं असून, नागरिकांनी त्यांना संपर्क साधून मागणी नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी सात जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. अंबड तालुक्यातल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चौघांचा, जालना शहरातल्या एका खासगी रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्यासह पुष्पकनगरातील एका व्यक्तीचा आणि जालना तालुक्यातल्या निरखेडा इथल्या एका व्यक्तीचा यात समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी ही माहिती दिली. त्यामुळे जालना जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ६१ झाली आहे.
दरम्यान, अंबड इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं अंबड शहरातले सार्वजनिक व्यवहार पुढील तीन दिवसांसाठी पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि अंबड व्यापारी महासंघानं घेतला आहे.
****
हिंगोली शहरात परजिल्ह्यातून  आलेले आठ जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं तपासणीत आढळून आलं. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रूग्णांची संख्या १५९ झाली आहे. यापैकी ९० रूग्ण विषाणू मुक्त झाले आहेत, सध्या ७७ रूग्ण उपचार घेत आहेत. काल आढळून आलेल्या रूग्णांपैकी चार जण मुंबईहून, तीन जण रायगडहून तर एक जण पुण्याहून आलेला आहे. या सर्वांना कळमनुरी इथं विलगीकरणात ठेवण्यात आलं होत. 
दरम्यान, परवा जिल्ह्यात ५० रूग्ण आढळल्यानंतर हिंगोली शहरातले सिध्दार्थ नगर, बागवानपूरा, गुहा चौक हे भाग, तसंच हिंगोली तालुक्यात बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर आणि आनंदनगर, सेनगाव तालुक्यात माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या परिसरात नागरिकांच्या हालचालींवर बंधनं घालण्यात आली असून, सर्व आवश्यक सेवाही या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल आणखी १४ रूग्णांची वाढ झाली. यामध्ये ११ जण हे गंगाखेड तालुक्यातल्या एका महिलेच्या संपर्कात आलेले रूग्ण आहेत, याशिवाय एक जण परभणी शहरातला पोलिस कर्मचारी आहे तर एक जण हा सेलू तालुक्यातल्या बह्मवाकडी आणि माळसोन्ना गावचा रहिवाशी आहे, असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं. यामुळे आता जिल्ह्यातली एकूण रूग्ण संख्या ३६ झाली आहे.  यामध्ये एक जण विषाणू मुक्त झाला आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
***
बीड जिल्ह्यात काल पुन्हा सहा रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. यात तीन रूग्ण हे बीड तालुक्यातल्या साखरे बोरगावचे आहेत तर दोघेजण वडवणीचे रहिवाशी आहेत, एकजण पाटोद्याचा आहे. रुग्णांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.
***
उस्मानाबाद जिल्ह्यातही ६ जण बाधित असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे.  यातत सहाजण उमरग्याचे आहेत तर दोघेजण उस्मानाबादचे तर एक जण परांड्याचा आहे.
***
नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आले.  शहरातल्या शिवाजीनगर आणि विवेकनगर इथले हे रूग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या १२७ झाली आहे. ५९ रूग्ण विषाणूंमुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे तर सध्या ६२ रूग्ण उपचार घेत आहेत.
***
अहमदनगर जिल्ह्यात काल आणखी चार जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून, हे चौघं मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद या ठिकाणाहून जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली आहे.
****
धुळ्यात हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या एका ६७ वर्षीय कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांची संख्या १०८ झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या टुणकी या गावामध्ये, अनेकजण इतर गावांमधून परतले आहेत. मुंबईतल्या धारावीतून आलेल्या एका कुटुंबातल्या १७ वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना विषाणू बाधित असा आला आहे. त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे गावात ३०० मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून, सगळी दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या, मात्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारकडची थकबाकी दर्शवावी आणि या सर्व शेतकऱ्यांना नव्यानं पिक कर्ज वाटप करावं असा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला आहे.
बँकांच्या नियमानुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्यानं पिक कर्ज देता येत नाही, म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सरकारनं लागू केलेल्या कर्ज माफी योजनेच्या यादीतल्या शेतकऱ्यांना टाळेबंदीमुळे या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकला नाही, त्यामुळे त्यांचे कर्ज खाते थकबाकीत राहीले होते. परिणामी ते यावर्षी कर्ज घेण्यास अपात्र ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आवश्यक सूचना सर्व बॅँकांना देण्यात आल्या आहेत.
****
   [$5347EEE9-5417-43A6-B9FA-7C49263E76CF$NEW MIDBREAKE NIKITA - NEW MIDBREAKE - ]
****
ईद उल फित्र - रमजान ईद आज साजरी होत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रमजान ईदनिमित्त राज्यातल्या  नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत परोपकाराचं महत्व अधोरेखित झालं असून, नागरिकांनी घरी राहून तसंच शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून ईद साजरी करावी असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ईद साध्या पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन जमियत-ए-उलमा-ए-हिंद चे मराठवाडा जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल जलील ताबिश मिल्ली यांनी केलं आहे. मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदसाठी खरेदी न करता गरीबांना मदत करुन ईद साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
लातूर परभणी आणि हिंगोली इथून मजुरांना घेऊन एक विशेष श्रमिक रेल्वे आज सकाळी ११ वाजता नांदेड रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. ही रेल्वे पाटणा, गया आणि पुढे ईशान्य भारतातील आरारी रेल्वेस्थानकापर्यंत जाणार आहे.
***
राज्याबाहेर अडकलेले मराठवाड्यातले १०७ प्रवाशी काल विशेष श्रमिक रेल्वेद्वारे परत आले आहेत. तेलंगणातून हे मजूर आले असून, ते काल परभणी रेल्वे स्थानकावर उतरले. यामध्ये परभणीतल्या १६, किनवट १४, कंधार २७, लातूर १९, सोलापूर २३ तर औरंगाबादमधल्या २४ कामगारांचा समावेश आहे. 
****
हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर इथले जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे यांच्यातर्फे परिसरातल्या २५० गरजू मुस्लीम कुटुंबियांना रमजान ईद निमित्त सुक्या मेव्याचं वाटप करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आल्याने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथे कोरोना बाधित आढळून त्यामुळे प्रशासनाने गंगाखेड शहरासह तालुक्यातील कुटुंबीयांचे आरोग्यविषयी सर्वेक्षण सुरू केले जिल्हा प्रशास शिक्षक आशाताई यांच्यामार्फत करण्यात येणार्‍या सर्वेक्षणात कुटुंबातील सदस्य कुणी आजारी आहे बाहेर गावावरून आलेला आहे काय याची माहिती घेतली जात आहे तसेच जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती येऊ नये यासाठी मोहीम राबविण्यात येत असल्याचे तहशीलदार कंकाळ यांनी स्पष्ट केले त्यांनी स्पष्ट केले प्रशासनाच्या या मोहीमेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त बातम्‍यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या मित्र मंडळानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख ४७ हजार १०० रुपयांची मदत केली असून, या मदतीचा धनादेश काल जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला. ****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला काल रात्री राष्ट्रीय महामार्गालगत गळती लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार झाल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काल सकाळीच दुरूस्तीचं काम केलं.
****
औरंगाबाद सायबर पोलीस ठाण्यात काल पहिल्या सायबर गुन्ह्याची नोंद झाली.  या गुन्ह्यातल्या आरोपीने कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारित केल्या होत्या. राज्यात सायबर संदर्भात ४१३ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली असल्याचं महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आलं.
****
नांदेड इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नांदेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रामनारायण काबरा यांच काल निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. काबरा हे  २०१७ पर्यंत नगरसेवक होते. दिर्घकाळ ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते. एक उत्तम लेखाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक तसंच रेल्वे विस्तार रूंदीकरणासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या बोळेगाव इथं विलगीकरणात राहण्यावरुन झालेल्या वादातून दोन जणांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. गावातला रहिवासी असलेला तात्याराव बरमदे हा उत्तर प्रदेशातून गावात ट्रक घेऊन आल्यामुळे त्याला तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश माने आणि इतरांनी शेतात विलगीकरणात राहण्यास सांगितलं. मात्र त्याच्या नातेवाईकांनी याला विरोध करत वाद घातला आणि त्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं. आरोपींविरुद्ध कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात, उमरी तालुक्याच्या नागठाणा बुद्रुक इथल्या मठाचे मठाधिपती, तीस वर्षीय बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज आणि त्यांचे शिष्य बावन्न वर्षीय भगवान शिंदे या दोघांची हत्या करुन फरार झालेल्या साईनाथ लिंगाडे याला तेलंगणामधील तन्नूर इथं काल अटक करण्यात आली. परवा रात्री मठाच्या परिसरात चोरीच्या उद्देशानं, त्यानं काल पहाटे आधी शिष्याची आणि नंतर महाराजांची हत्या केली. घटनेच्या दहाच तासात पोलीसांनी आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली.
दरम्यान, याप्रकरणी काशीचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
****
बीड इथं काल पेठ भागात एका पत्नी आणि दोन मुलांची हत्या करणारा पती संतोष कोकणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  काल, पहाटे पत्नी आणि मुलं झोपेत असतांना आरोपीनं दगड आणि बॅटनं त्यांच्या डोक्यात वार करुन त्यांना ठार मारलं, तर एका मुलाला पाण्यात बुडवून ठार केलं होतं.
****
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं काल ज्या प्रभागात कोरोना विषाणू बाधित रुग्ण नाही त्या प्रभागात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. महापालिकेनं कोरोना विषाणू संसर्ग मुक्ती रेड झोन ते ग्रीन झोन प्रवासाला चालना देण्यासाठी १४ दिवसांचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल आनंद उत्सव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी देश भक्ती पर घोषणा देऊन विटखेडा प्रभागामध्ये एकही रूग्ण नाही म्हणून आनंद उत्सव साजरा केला.
*****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके खरेदी केल्यानंतर संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह पावती घ्यावी, असं आवाहन धर्माबाद तालुका कृषि अधिकारी माधुरी उदावंत आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापुरे यांनी केलं आहे.
****
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यातला जमादार नंदकुमार मस्के याला दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. हिंगोली तालुक्यातल्या माळसेलू इथलं अतिक्रमण काढून देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या हानवतखेडा इथं अकरा वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पूजा राठोड असं या मुलीचं नाव असून, विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरुन ती विहिरीत पडल्यानं ही दुर्घटना घडली. 
****


No comments: