Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
जम्मू
काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा मोठ्या
हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश आलं आहे. एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर नेली
जात असलेली स्फोटकं सुरक्षा दलांनी ताब्यात घेऊन नष्ट केली. काश्मीर पोलिसांनी ट्वीटरवरून
याबाबत माहिती दिली. सैन्य दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पुलवामा पोलिसांनी ही कारवाई
यशस्वीपणे पार पाडल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातलं
महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक
यांनी म्हटलं आहे. भाजपकडून सातत्याने सरकार अस्थिर असल्याबद्दलच्या चर्चा पसरवल्या
जातात, मात्र सरकारनं सहा महिने पूर्ण केले असून, आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण
करेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे. कोविडच्या संकटाशी राज्य सरकार सामना
करत आहे, या संकटावर मात करून सरकार सुरळीतपणे काम करेल, असं मलिक यांनी पीटीआयला दिलेल्या
मुलाखतीत म्हटलं आहे.
****
देशात
कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ७५ शतांश टक्के एवढं झालं
आहे. गेल्या २४ तासात देशात तीन हजार २६६ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ६७ हजार ६९२ रुग्ण
बरे होऊन घरी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना
विषाणूची लागण झालेले ६ हजार ५६६ नवीन रुग्ण आढळले. देशातली रुग्णसंख्या एक लाख ५८
हजार ३३३ झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे १९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून,
आतापर्यंत एकूण मृतांची संख्या चार हजार ५३१ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
दरम्यान,
देशात गेल्या २४ तासांत कोविड संसर्गासंबंधी एक लाख १९ हजार ९७६ नमुन्यांची तपासणी
करण्यात आली, आतापर्यंत ३३ लाख ६२ हजारावर नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय
आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरने सांगितलं आहे. देशात कोरोना विषाणू संसर्ग
नमुन्यांची चाचणी करण्यासाठी सध्या ४३९ सरकारी आणि १९३ खासगी अशा एकूण ६३२ पेक्षा अधिक
प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज ३५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या
रुग्णांची संख्या १ हजार ३९५ झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. यामध्ये १४
महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. शहरात काल ५६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ८६७ जण कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून आतापर्यंत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात आज एक कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना
विषाणूबाधित रुग्णांची एकूण संख्या १३८ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाले असून
आता पर्यंत एकूण सात कोरोनाविषाणू बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या बारा प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना काल रात्री जुगार खेळतांना ताब्यात घेण्यात
आलं. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विषेश पथकाने ही कारवाई केली. गंगाखेड रस्त्यानजिक
एका बंद दाल मिलच्या आवारात हे सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं. या कारवाईत रोख
रक्कमेसह एकूण बारा लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
अमरावती
जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील डेहनी शिवारात ५८ वर्षीय गुऱ्याख्याचा उष्माघाताने मृत्यू
झाला. साहेबराव मोहोड असं मृताचं नाव आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ४५ अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
****
नगरपालिका
किंवा नगरपंचायतीच्या व्यापारी संकुलातल्या व्यापारी गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत
शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी
नियमांच्या अधीन राहून राज्यशासनाकडे ठराव पाठवावे, अशी सूचना आमदार राणा जगजीतसिंह
पाटील यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यात टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प असल्याने, दुकानांचे
या काळातले भाडे रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे, त्याअनुषंगानं पाटील
यांनी ही सूचना केली आहे.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात
येत आहे. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सावरकर यांना ट्वीटरवरून आदरांजली अर्पण केली.
****
No comments:
Post a Comment