Wednesday, 27 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७  मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** कोरोना विषाणू संसर्गात वयोवृद्ध नागरिकांची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना
** राज्यातली टाळेबंदी उठवण्याबाबत वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून योजना तयार करण्याचं काम सुरू
** राज्यात काल कोरोना विषाणू बाधित ९७ रुग्णांचा मृत्यू, दोन हजार ९१ नवे रूग्ण
** औरंगाबादमध्येही तीन जणांचा मृत्यू तर २५ नवे रूग्ण.
** परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीडसह मराठवाड्यातल्या अन्य सातही जिल्ह्यातल्या रूग्णांच्या संख्येत वाढ
** राज्यात सरकारच्या यशापयशावरून राजकीय पक्षांचे शाब्दिक युद्ध
आणि
** पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभरात मृत्यू झालेल्यांपैकी ५० टक्के मृत्यू हे वयोवृद्धांचे झाले आहेत, यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना करत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातला कोरोना विषाणू संसर्गाचा दर दोन पूर्णांक ८७ शतांश टक्के एवढा असून, मृत्यू दर शून्य पूर्णांक तीन दशांश टक्के एवढा असल्याचं ते म्हणाले. तर देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढं झालं आहे. देशात आतापर्यंत ६० हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात सरकारी आणि खासगी अशा एकूण ६०० पेक्षा अधिक प्रयोगशाळांमधून दररोज एक लाख दहा हजार कोरोना विषाणू संसर्ग नमुन्यांची चाचणी होत असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.
****
राज्यातली टाळेबंदी उठवण्यासंदर्भात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथक एक योजना तयार करत असल्याची माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राज्यातली टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल केली जाणार असल्याचं सांगत त्यांनी आवश्यकतेच्या आधारावर विविध घटकांना टाळेबंदीमधून सवलती जाहीर केल्या जातील, असं सांगितलं. टाळेबंदी उठल्यानंतर मात्र कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भितीही मुख्य सचिवांनी वर्तवली आहे. 
****
राज्यात काल आणखी दोन हजार ९१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांचा आकडा ५४ हजार ७५८ झाला आहे. काल या आजारानं ९७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एक हजार ७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल एक हजार १६८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
**** 
औरंगाबाद शहरात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये इंदिरा नगरमधली ५५ वर्षीय महिला, जय भीम नगरमधले ७२ वर्षीय पुरूष, आणि जाधववाडीतल्या ५७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा ५८ झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २५ कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक हजार ३३० इतकी झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन आठ आणि जुना बाजारमध्ये प्रत्येकी चार, बायजीपुरा दोन, जुना मोंढा, रोहिदासपुरा, कांचनवाडी, भारतमाता नगर हडको, जुना हनुमान नगर, हनुमान चौक, न्याय नगर, कैलाश नगर, रामनगर, रोशन गेट, एन ११ सुभाषचंद्र नगर, पुंडलीक नगर, भवानी नगर, रेहमानिया कॉलनी, रहिम नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
औरंगाबाद शहरात काल ३० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ८११ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. 
****
परभणी जिल्ह्यात काल ३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या सदुसष्ठ झाली आहे. काल परभणी शहरात १२, पूर्णा इथं दहा, गंगाखेड चार, जिंतूर आणि सेलू प्रत्येकी दोन, तर पालम तालुक्यात एक रुग्ण सापडला. 
****
लातूर इथं काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये निलंग्याचे सहा, लातूर शहर आणि उदगीरमधले प्रत्येकी दोन, तर हुडको आणि मसला इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या आता १०३ झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. नऊ जण बरे झाले असून, ३२ रुग्णांवर उस्मानाबाद इथं तर, लातूर आणि सोलापूर इथ प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरु असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातही काल नवे आठ कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले. यामध्ये परळी तालुक्यातल्या हाळंब आणि शिरुर तालुक्यातल्या बारगजवाडी इथले प्रत्येकी दोन, तर कारेगाव आणि वाहली इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातही एकूण रुग्णसंख्या ५५ झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औंढा इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये असलेले दोन जण, ते पहनी आणि वसमत तालुक्यातल्या हट्टा इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडला. हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १६४ झाली आहे.  
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळल्यानं जिल्ह्यात एकूण संख्या १३७ झाली आहे. काल आढळलेले सर्व चारही रूग्ण उमरी तालुक्यातले आहेत. दरम्यान, नांदेड इथल्या १६ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सर्वांना सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी २ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ७६ झाली आहे. बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली आणि जालना तालुक्यातल्या वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी १५ जण बाधित असल्याचं आढळून आल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार एक इतकी झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार ग्रामीण रुग्णालयात एका ६० वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला. या महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय आहे. सदर महिला आपल्या कुटुंबियांसोबत २० मे रोजी मुंबईहून शारा या मूळगावी आली होती.
****
देशातली टाळेबंदी हटवण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आपलं धोरण स्पष्ट करावं, असं काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल सामाजिक माध्यमांवरून पत्रकारांशी बोलत होते. टाळेबंदी हटवण्यासंदर्भात पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला माहिती द्यावी, असं ते म्हणाले. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी आहे, मात्र निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसकडे नाहीत, असं गांधी यांनी सांगितलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या कामगारांबाबत केलेलं विधान योग्य नसल्याचं सांगत, प्रत्येक भारतीयाला देशभरात कुठेही काम करून, आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क असल्याचं, गांधी यांनी यावेळी नमूद केलं. महाराष्ट्रात आघाडी सरकार असून महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही, असं सांगत केंद्र सरकारनं या राज्याला मदत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
****
राज्यातली जनता एकीकडे कोरोना विषाणुच्या संसर्गाचा सामना करत असताना दुसरीकडे राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपासह शाब्दिक युद्ध करत असल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. सोमवारी श्रमिक रेल्वेवरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला, तर भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे केलेल्या मागणीचे काल दिवसभर पडसाद उमटत राहिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोरोना विषाणुच्या संकटाच्या काळात विरोधी पक्ष राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही विरोधी पक्षावर आरोप करत महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधली कोरोना विषाणुच्या संसर्गाची स्थिती वाईट असून राष्ट्रपती राजवट लागू करायच असेल तर गुजरातपासून सुरूवात करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यात सत्तेची लालसा असल्यामुळे संकट काळात सरकारला मदत करण्याऐवजी ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मात्र राज्यातलं सरकार मजबूत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात महाआघाडीच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं एका दूरचित्रवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केलं.
भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यात सत्ता स्थापन करण्याची घाई नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विधानाचा हवाला देत काँग्रेस राज्यातल्या अपयशाची जबाबदारी टाळत असून याचे खापर ते शिवसेनेच्या माथ्यावर फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचं  सांगितलं. राज्यात सत्तेसाठी आम्ही काहीही करत नसून हे सरकार त्यांच्या आघाडीतल्या कुरबुरीमुळेच जाईल, असं ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाला आता राजकारणात इंटरेस्ट नाही मला असं वाटतं की आता केंद्राचा सगळा Focus हा पूर्णपणे कोरोनाच्या लढाईमध्ये आहेत त्यामुळे आत्ता जे काही Statement येत आहेत की चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये आम्ही सामील नाही आम्हीला राजकारणात आता इंटरेस्ट नाही कोरोनाची लढाई इफेक्टटीव झाली पाहिजे याकरता मात्र आम्ही दबाव तयार करणार
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची खासदार राणे यांची मागणी ही त्यांची वैयक्तिक मागणी असून पक्षाची ती भूमिका नसल्याचंही फडणवीस यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केलं. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती नसल्याचं सांगत राज्य सरकार कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला.
दरम्यान, केंद्र सरकारनं राज्य सरकारला गेल्या तीन महिन्यात २८ हजार कोटी रूपयांची मदत केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. याबाबतची सविस्तर आकडेवारी त्यांनी यावेळी दिली.
****
शाळा सुरु झाल्यानंतर  विद्यार्थी, शिक्षक तसंच अन्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसंच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत, असं ते म्हणाले. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून शाळा वेगवेगळ्या सत्रात भरवणं, दर दिवशी एक वर्ग भरवणं अशा पर्यायांचाही विचार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठकही काल मुख्यमंत्र्यांनी घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्तींच्या दृष्टीनं आधीच नियोजन करावं तसंच सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावं असे निर्देश दिले. रेल्वे मंत्रालयानं देखील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचं नियोजन करावं तसंच आवश्यक संरक्षण साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे तसंच गेल्या वर्षी कोल्हापूर- सांगली भागात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातल्या पाण्याबाबत संबंधित विभागाशी समन्वय ठेवावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग होत असून, सर्व विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेऊन आणि सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, असे निर्देश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. उस्मानाबाद इथं काल कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खंरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. उपचाराबाबत कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं ते म्हणाले.
दरम्यान, ढोकी इथं काल खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ गडाख यांच्या हस्ते झाला.
****
आगामी मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी आणि पूर्वनियेाजन करुन सज्ज राहण्याचे निर्देश औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल विभागीय मान्सून पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यात गोदावरी काठच्या एक हजार ५७२ गावांमध्ये विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, नोडल अधिकारी नियुक्त करावेत, नदीकाठच्या गावांमध्ये सरपंचाची बैठक घेऊन नियंत्रण व्यवस्थापन सज्ज ठेवावं, आदी सूचना आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
****
औरंगाबाद इथून काल उत्तर प्रदेशकडे एक विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली.
दरम्यान, या रेल्वेसाठी नांदेड इथून आलेले ४० मजूर दहा मिनिटं उशीरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानं त्यांना परत जावं लागलं. ते परत नांदेडला गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   
****
औरंगाबाद शहरातली जीवनावश्यक वस्तुंची दुकानं आजपासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं. १५ ते २० मे दरम्यान शहरात जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती, या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवर काल सुनावणी झाली, त्यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिली. ३१ मे पर्यंत हा आदेश लागून राहणार असून, नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाहेरील जिल्ह्यातून अथवा परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती लपवल्यास अथवा विलगीकरणात न जाण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी हा इशारा दिला.
****
नांदेड शहराला आजपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेनं ही माहिती दिली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातला पाणीसाठा कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं ‘जिल्हा परिषद आपल्या गावी’हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी या उपक्रमाअंतर्गत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढू नये यादृष्टीने  प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी केली. याविषयी माहिती देतांना ते म्हणाले..
Z.P आपल्या दारी असे आम्ही अभियान राबवलेला आहे  जिथे – जिथे भेटी दिल्या जर तिथे कोरोना केअर सेंटर असेल शाळा असेल आहे त्याचं प्रिपरेशन आहे का जर गाव पातळीवरती कोरोना वाढला ग्रामपंचायतीची आणि लोकांची तयारी कशी शफिशियंट आहे इक्विपमेंट आहेत का औषधी आहेत का मनुष्यबळ आहे का या सर्वांचा आढाचा गावाची तयारी किती आहे आणि याच्यामध्ये एक पुढचा टप्पा म्हणून ५५ वर्षाच्या जास्त लोक आहेत त्या सर्व लोकांना Pulse Optimeter म्हणून मशीन आहे त्यांच्या द्वारे सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी पोलिस ठाण्यातल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा आदेश असतानाही सामुहिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या सामुहिक नमाज पठण प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांविरूध्द पाथरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका शहरातल्या नागरिकांना कोविडच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधांचं मोफत वाटप करणार आहे. यासाठी शहरातल्या होमिओपॅथीक डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना प्राधान्यानं हे औषध दिलं जाणार असल्याचं आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्याल्या लिंबा इथं गोदावरी नदीच्या पात्रात काही वाळू माफियांनी बेकायदेशीरपणे जमा केलेला सुमारे १२५ ब्रॉस वाळूचा साठा पोलिसांनी काल छापा टाकून जप्त केला. अपर पोलिस अधिक्षकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
****
लातूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून देवीदास टेकाळे यांनी काल पदभार स्वीकारला. टेकाळे हे यापूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद प्रशासन विभागाचे प्रमुख होते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पालिकेतले कर्मचारी, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
****
परभणी तालुक्यातल्या झरी इथं माणिक वैद्य या २५ वर्षीय युवकाचा उष्माघाताने काल मृत्यू झाला. हा युवक काल शेतावर काम करायला गेला असता त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं तो घरी परतला, अचानक चक्कर आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. 
****
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथल्या विलास बागेतल्या विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळावर त्यांच्या कुटुंबियांनी आदरांजली वाहिली.
युवक कॉंग्रेसच्या वतीनं कॉंग्रेस भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आलं.
लातूरच्या धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सामाजिक अंतर पाळत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या गरीब गरजू रूग्णांना आणि नातेवाईकांना अन्नदान करण्यात आलं.
****
मुंबईच्या आयआयटी पवईत शिक्षण घेत असलेला उस्मानाबादचा विद्यार्थी अनिकेत काळे यानं अत्यल्प किमतीत यु व्ही  स्टरीलाइजर तयार केलं आहे. विद्यार्थ्यांना आपल्यातल्या तंत्र कौशल्यांचा वापर करून भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचं आवाहन त्यानं केलं आहे. तो म्हणाला…

यु व्ही  स्टरीलाइजर भाज्या, फळ या घरगुती गोष्टी आपण हॉस्पिटलसाठी मास्क आणि पीपीई किट इतर सगळ्यांच्या वस्तूंच्या लागणाऱ्या गोष्टी स्टरीलाइज करू शकतो यामुळे कोरोना virus पण पसरण्याच शक्यता कमी होते या सर्व गोष्टी आपल्याला स्वस्तात बाजारात जे दहा पंधरा हजार भाव आहे त्यापेक्षा कमी भाव आपल्या लोकांना चार–पाच हजारात लोकांना देण्यात यावा हा माझा विचार होता हे शक्य का झाले लोकांना भागात स्वताहून विचार करून बनवलं यामुळे आपल्याला लोकांना स्वस्तात देता यावेत  
****
औरंगाबाद शहरातल्या गारखेडा परीसरातल्या श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये आमदार अंबादास दानवे यांनी ३१ मे पर्यंत शेतकरी ते थेट ग्राहक धान्य बाजार सुरु केला आहे. नगरसेवक त्रिंबक तुपे यांच्या हस्ते काल या धान्य बाजाराचं उद्घाटन झालं. या धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या वतीनं भाजीपाला, फळ, धान्य हे एकाच छताखाली थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा बाजार सुरू राहणार आहे. या बाजारात शेतकरी माफक दरात ग्राहकांना शेतमाल विकत आहेत.
****
नवीन आणि जुना जालन्याला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरचा सव्वाशे वर्ष जुना लोखंडी पूल तोडण्याच्या कामाला कालपासून सुरुवात झाली. येत्या आठ महिन्यात या ठिकाणी ८० मीटर लांब आणि १५ मीटर रुंद चार पदरी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लंडन कंस्ट्रक्शन कंपनीने या पुलाचं बांधकाम केलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातले दिग्गज नेते संभाजी पाटील उमरेकर यांच काल निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. उमरेकर हे नांदेड जिल्ह्यातल्या कलंबर सहकारी साखर कारखान्याचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, शारदा भवन शिक्षण संस्थचे कार्यकारिणी सदस्य, दहा वर्षे नांदेड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता उमरा इथ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या चांभारवाडी इथं पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसह तिच्या वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पोहताना मुलीच्या हातातून दोरी निसटल्यानं बुडणाऱ्या मुलीला वाचण्यासाठी वडील पाण्यात उतरले. मात्र, घाबरलेल्या मुलीनं वडिलांना घट्ट मिठी मारल्यानं दोघेही पाण्यात बुडाले. शिवसिंग बहुरे आणि आरती बहुरे, अशी मृतांची नावे आहेत.
****


No comments: