Sunday, 24 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२४ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी येत्या दहा दिवसात आणखी दोन हजार ६०० विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याचा रेल्वे विभागाचा निर्णय
** राज्यात काल आणखी दोन हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, तर ६० जणांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरातही तीन रूग्णांचा मृत्यू तर नवे ३० रुग्ण
** हिंगोलीत १९, नांदेडमध्ये सहा, बीडमध्ये तीन तर उस्मानाबाद, जालना आणि परभणीत प्रत्येकी दोन रूग्णांची वाढ
** राज्यातल्या आर्थिक हालचाली तसंच रस्ते वाहतुकीला प्रारंभ व्हावा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा
आणि
** ईद उल फित्र - रमजान ईदचा सण उद्या सोमवारी साजरा होणार
**
****
टाळेबंदीत अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी रेल्वे विभागानं येत्या दहा दिवसात आणखी दोन हजार ६०० विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष वी के यादव यांनी सांगितलं. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या ३६ लाख लोकांना त्यांच्या घरी सोडण्यास मदत होईल, असं ते म्हणाले.  एक मे पासून आतापर्यंत ४५ लाखाहून अधिक नागरिकांना सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवलं असल्याचं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष वी के यादव यांनी सांगितलं.
दरम्यान, २५ मार्चपासून सुरू झालेल्या टाळेबंदीनंतर आतापर्यंत रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून ७५ लाख कामगार आपल्या घरी परतले आहेत. गतवेळच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशभरात चार कोटी स्थलांतरित कामगार आहेत, असं गृहमंत्रालयानं म्हटलं असून या कामगारांच्या अडचणी सोडवण्यसाठी मंत्रालयानं अखंड सुरू असणारा एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
**** 
केंद्र सरकारच्या देशातर्गंत विमान वाहतूक सेवेला राज्य सरकारनं विरोध केला असून रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. लाळेचे नमुने न घेता प्रवाशांचे नुसतं तापमान तपासणी करून काही उपयोग नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बाधित प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे चुकीचं असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग- प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
**** 
देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख पंचवीस हजारावर पोहोचली आहे. या आजारामुळे देशात आतापर्यंत तीन हजार ७२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ५१ हजार ७८४ रुग्ण बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एक्केचाळीस पूर्णांक ३९ शतांश टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्यात सध्या ३२ हजार २०१ सक्रीय रुग्ण आहेत.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार १९० झाली आहे. तर या आजारानं राज्यात काल ६० रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार ५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात ८२१ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
पुण्यात काल आणखी २६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं पुणे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या पाच हजार ४३६ झाली आहे. काल सात रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा २६४ झाला आहे.
****
देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख पंचवीस हजारावर पोहोचली आहे. या आजारामुळे देशात आतापर्यंत तीन हजार ७२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ५१ हजार ७८४ रुग्ण बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एक्केचाळीस पूर्णांक ३९ शतांश टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्यात सध्या ३२ हजार २०१ सक्रीय रुग्ण आहेत.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार १९० झाली आहे. तर या आजारानं राज्यात काल ६० रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार ५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात ८२१ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
पुण्यात काल आणखी २६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं पुणे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या पाच हजार ४३६ झाली आहे. काल सात रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा २६४ झाला आहे.
****
औरंगाबाद शहरातही काल तीन कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू झाला, मृतांपैकी एक ७५ वर्षीय पुरुष किराडपुरा परिसरातला तर दुसरा ७२ वर्षीय पुरुष सिटी चौक परिसरातला रहिवासी होता. तिसरा रूग्ण हा बायजीपुऱ्यातल्या ६१ वर्षाचा पुरूष असून काल पहाटे त्याचा मृत्यू झाला. या तीन मृत्यूंमुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या ४८ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३० रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात या रुग्णांची संख्या आता एक हजार २४८ झाली आहे. शहरातल्या सादाफ नगर, रेहमानिया कॉलनी महेमूदपुरा, औरंगपुरा, एन-८, एन-४, एन-५, हडको एन-१२, गणेश नगर, बायजीपुरा, एमजीएम परिसर, पहाडसिंगपुरा, भवानीनगर आणि गंगापूर तालुक्यातल्या वडगाव कोल्हाटी इथं प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. औरंगाबाद शहरात ठाकरे नगर, पुंडलिक नगर इथं प्रत्येकी दोन, न्याय नगर, बजरंग चौक एन सात इथं प्रत्येकी तीन नवे रुग्ण आढळले आहेत. एन ८ सुयोग हौसिंग सोसायटी, मिसारवाडी, आणि एकनाथ नगर परिसरातही रुग्ण आढळून आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक १९ रुग्ण सापडले. यामध्ये सेनगाव इथं विलगीकरणात ठेवलेल्या १३ जणांचा, वसमत इथले पाच, तर औंढा नागनाथ इथला एक जण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १२० झाली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल कोरोना विषाणूची बाधा झालेले नवे सहा रूग्ण आढळून आले. नांदेड शहरातल्या करबला, कुंभार टेकडी आणि मुखेड इथं प्रत्येकी दोन रुग्ण सापडले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १२५ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मुदखेड तालुक्यात बारड इथल्या कोविड सुश्रुषा केंद्रातून काल दुसरा कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरा झाल्यानं, त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली. यापैकी बीड शहरातला एक, तर वडवणी आणि धारुर तालुक्यातल्या कुंडी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. 
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी दोन जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. कळंब तालुक्यातल्या शिराढोण आणि उमरगा तालुक्यातल्या कोथळी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २९ झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात काल कोरोना विषाणू लागण झालेले दोन नवे रुग्ण आढळले. शहरात यापूर्वी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या खासगी रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्यासह जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली इथल्या एका व्यक्तीला याची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ५४ झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले नवे दोन रुग्ण आढळून आले आहेत. परभणी इथं एक आणि जिंतूर तालुक्यातल्या सावंगी भांबळे इथं दुसरा रुग्ण आढळला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या २२ झाली आहे.
****
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता १०२ झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही काल कोरोना विषाणूचे ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात निमोण इथल्या दोन महिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात  कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ७४ झाली आहे.
****
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे चाळीस रुग्ण काल आढळले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातल्या मलकापूर पांग्रा इथली आठ वर्षाची मुलगी कोरोना विषाणू मुक्त होऊन काल घरी परतली. ही मुलगी मुंबईहून आली होती, तिच्यावर बुलडाणा इथल्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. या मुलीसह काल अन्य २४ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात सध्या आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य बिमा योजनेत राज्यातल्या सर्व नागरिकांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच याबद्दल माहिती दिली होती. ३१ जुलै पर्यंत ही योजना लागू असून. कोविड आणि बिगर कोविड असा सर्वच रुग्णांना या योजनेचा लाभ होईल, असं या निर्णयात नमूद केलं आहे. 
****
राज्यातली कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्राचं पथक आलं असून, दहा सदस्यांचं हे पथक काल परभणी जिल्ह्यात दाखल झालं. या पथकात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरच्या दहा डॉक्टरांचा समावेश आहे. या पथकानं काल जिल्ह्यात सेलू तालुक्यात पिंपरी खवले, जिंतूर तालुक्यात भोगाव देवी, परभणी तालुक्यात ताडलिमला, मानवत तालुक्यात किन्होळा बुद्रूक, सोनपेठ तालुक्यात नैकोटा, पालम तालुक्यात फरकंडा, सोनपेठ इथलं ग्रामीण रुग्णालया तसंच परभणी जिल्हा रुग्णालयात सर्वेक्षण केलं.
****
राज्यात टाळेबंदीच्या काळात सायबर विभागानं आतापर्यंत चारशे दहा गुन्हे नोंदवले असून दोनशे तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली, व्हाटसॲप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि टिकटॉकच्या माध्यमातून चिथावणीखोर माहिती, अफवा तसंच महिलांबद्दल आक्षेपार्ह तपशील पसरवण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. अशा चुकीच्या गोष्टींवर सायबर विभागाचं लक्ष असून, गुन्हेगारांवर कारवाईचा इशारा गृहमंत्री देशमुख यांनी दिला, ते म्हणाले....

महाराष्ट्र सायबर क्राईम आपल्यावर लक्ष देऊन आहे जो कोणी अशा पद्धतीच्या पोस्ट आणि व्हिडिओ टाकेल त्यांच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल आज पर्यंत ४१० गुन्हे दाखल केलेले आहेत आणि २१३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या आर्थिक हालचाली पुन्हा टप्याटप्प्यानं सुरू व्हाव्यात, तसंच राज्यांतर्गत रस्ते वाहतुकीला प्रारंभ व्हावा या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल मुंबईत एका बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रानं सांगितलं. कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या दोन नेत्यांमधे या विषयावर आठ दिवसांत झालेली ही तिसरी बैठक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्य सचिव अजोय मेहता या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एका संदेशाद्वारे दिली आहे.
****
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली. ही  सदिच्छा भेट होती, असं राज्यपालांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकार योजत असलेल्या उपायांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी गेल्या बुधवारी एक बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीला अऩुपस्थित राहिले होते, त्या पार्श्र्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं तसंच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणताही नसल्याचं, संजय राऊत यांनी सांगितलं.
****
ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण उद्या सोमवारी साजरा होणार आहे. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काल सायंकाळी ही माहिती दिली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवानी आपल्या परिवारासोबतच घरी राहून रमजान ईद साजरी करावी, नमाज करता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. घरी राहूनच ईद साजरी करणं, तसंच सामाजिक अंतर राखणं यासारख्या सूचना मशिदिमधून सर्व बांधवांना देण्यात येतील, असं मुस्लिम धर्मगुरुंनी यावेळी सांगितलं. 
****
लातूर इथं विलगीकरणात असलेल्या नागरिकांना ईद निमित्त जीवनावश्यक वस्तू योग्य दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. वस्तुंची मागणी करण्यासाठी महानगर पालिकेनं विशेष दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. दरम्यान, उदगीर तालुक्यातली चिमाची वाडी, तसंच रेणापूर तालुक्यात पानगाव इथला आंबेडकर नगर, आचार्य गल्ली हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी इथल्या नाथ प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं १२ हजार मुस्लिम कुटुंबांना ईदनिमित्त शिरखुर्मा आणि अन्य गोड पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक साहित्याचं वाटप काल करण्यात आलं. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या साहित्याचं वितरण करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून काल बिहारच्या मुजफ्फरपूरसाठी एक विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली. यातून एक हजार ४६४ मजूर आपल्या गावी जात आहेत. लातूर जिल्ह्यातल्या १७६ मजुरांपैकी १३६ मजुरांच्या हातांवर गृह विलगीकरणाचे शिक्के असल्याचं यावेळी निदर्शनास आलं होतं. त्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लक्ष घातल्यानं वेळीच निवळली. वैद्यकीय तपासणीवेळी हे शिक्के चुकून मारले गेल्याची माहिती समोर आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत उत्तर प्रदेशसाठी चार, मध्यप्रदेशसाठी तीन, बिहारसाठी दोन तर झारखंडसाठी एक अशा एकूण दहा विशेष श्रमिक रेल्वे रवाना केल्या आहेत. मराठवाडा विभागात अडकलेल्या सुमारे सोळा हजार परप्रांतीय मजुरांच्या जाण्याची सोय या माध्यमातून झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर बानापूरे यांनी या बाबत दिली आहे.
****
जालना शहरात परराज्यातून तसंच अन्य जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांची नोंद घेण्यासाठी नगरपालिकेने कार्यदलाची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या संदर्भात सूचना केली होती. त्यानुसार मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी हे कार्यदल स्थापन केले असून यासाठी सर्व ३० प्रभागातल्या नगरसेवकांची मदत घेतली जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संशयित व्यक्तीची माहिती जाणून घेण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेनं माझे आरोग्य माझ्या हाती हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं आहे. हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन स्वत:च्या आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास ती व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आहे की नाही याची पडताळणी पाच मिनिटात होऊ शकते. श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक नागेश डोंगरे यांच्या मदतीने हे ॲप तयार करण्यात आलं आहे. अशा प्रकारचं ॲप तयार करणारी औरंगाबाद ही पहिलीच महानगरपालिका आहे.
****
नांदेड इथल्या कारागृहातून काल ६० कैद्यांना जामिनावर सोडण्यात आलं. कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी ही माहिती दिली. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून जामिनावर सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
****
बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन लातूर औद्योगिक वसाहतीमध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपकरण निर्मितीचे उद्योग उभारावेत, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. देसाई यांनी या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद दिला असल्याचं देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं.
****
खाजगी रुग्णालयांमधले डॉक्टर, परिचारिकांना देखील शासनानं विमा संरक्षण द्यावं  अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचं निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केलं आहे. खाजगी रूग्णालयांमधे कोरोना विषाणुसाठी खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्याच्या पार्श्र्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी काल सुधारीत आदेश जारी केले. शीतपेयांची दुकानं, चहा टपरी, पान टपरी, कपडे, पादत्राणे, दागिने यांची दुकानं, औद्योगिक आस्थापना, बांधकाम, केशकर्तनालय, कृषी साहित्यांची दुकानं, मद्य विक्री, दुय्यम निबंधक, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयं सुरु होणार असून, कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. ही सर्व दुकानं सुरक्षित अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
****
जालना शहरासह तालुक्याच्या ठिकाणची सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे व्यवहार सुरू झाले आहेत. टाळेबंदी असतानाही मागील दोन आठवड्यात एक हजार २५६ दस्त नोंदणी व्यवहार पूर्ण झाले असून, त्यातून मुद्रांक शुल्कापोटी तीन कोटी ५८ लाख ६० हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना कोठाळा इथं शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या नागरिकांनी परिसर स्वच्छतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांच्या उपक्रमांची या भागात प्रशंसा होत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर …

दिवस भर वेळ झाला म्हणून नागरिकांनी शाळा व परिसर स्वच्छ करणे तसेच शाळेच्या परिसरातील वृक्षांच्या भोवती आळे करणे पाणी देणे आदि कामे करू लागले त्यामुळे सर्व झाले हिरवेगार दिसत आहेत क्वारंटाइन मधील नागरिकांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे आकाशवाणी बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या राजूरा बुद्रुक इथल्या साईराम स्वयम् सहाय्यता गटाने शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप करण्यासाठी कृषी निविष्ठा खरेदी केल्या. या गाडीस आमदार डॉ तुषार राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवला. गटाचे प्रमुख उध्दवराव झरे पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतं आणि बियाण्याचं वाटप केलं.
****
नांदेड एस टी आगारातल्या सफाई कर्मचाऱ्यांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने अन्नधान्याच्या किट, सॅनिटायझर्स, मास्कचं वाटप काल करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या लोहारा इथले सेवानिवृत्त शिक्षक मनोहर हेरकर यांनी आपलं एक महिन्याचं निवृत्ती वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी दिला आहे. लातूर इथल्या केशवराज शैक्षणिक संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ६१ वाहन चालकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर ग्रामपंचायतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक साहित्य आणि उपकरणं खरेदी करून दिली आहेत. अठरा गावांना याचा लाभ होणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

अशा प्रकारचे साहित्य  घेणारी महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत गंगापूर आहे असे अमोल सरपंच बाबू खंदाडे म्हणाले गंगापूर गावासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील खंडापूर, चिंचोली, वासनगाव, चांडेश्वर, अंकोली आदी १८ गावांनाही आता  याचा फायदा होणार आहे अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर
****
परभणी शहरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत सुरू केलेल्या कोविड सुश्रुषा केंद्राची काल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाहणी केली. याठिकाणी अनेक असुविधा असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेतला.
****
परभणी इथं गुन्हे अन्वेषण विभागानं ८४० किलो बनावट खवा जप्त केला. नानलपेठ भागात राहणाऱ्या गिरीष माटरा या इसमानं साई प्रॉडक्ट्स या कंपनीच्या नावाने बनावट खवा तयार करुन परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी माटरा याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात नाले सफाईचं काम सुरु झालं आहे. ३१ मे पूर्वी नाले सफाईचं काम पूर्ण होईल, असं महापालिका आयुक्त विलास भोसीकर यांनी सांगितलं. पूर परिस्थितीत लोकांसाठी तात्पुरते निवारा केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी नगरपालिकेनं त्यांच्या ताब्यातल्या दुकानांचं सहा महिन्याचं भाडं माफ करुन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी, भारतीय जनता पक्षानं केली आहे. टाळेबंदीमुळे दुकानं बंद असल्यानं व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान झालं असल्याचं पक्षानं याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, टाळेबंदीमुळे लग्न समारंभ, आणि इतर कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मंडप व्यवसाय करणारे आणि कामगारावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा व्यावसायिकांना शासनानं मदत करावी अशी मागणी परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या मंडप व्यावसायिकांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी काल तहसीलदारांना सादर केलं.
****
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत औरंगाबाद इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं २६ ते ३० मे पर्यंत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खरीप पीक लागवड तंत्रज्ञान यासह विविध विषयांवर यावेळी कृषितज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कार्यक्रम समन्वयक डॉ.किशोर झाडे यांनी दिली आहे. या वेबिनार मधे सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड इथले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातूनच निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरून एका चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. आपल्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी संजना जाधव यांचं नाव जाहीर केलं. 


No comments: