Tuesday, 19 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.05.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 May 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मे २०२० सायंकाळी ६.००
****

Ø टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातल्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून जारी;
Ø राज्याची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन भागात विभागणी 
Ø नवी मुंबई शहराचा देशातल्या कचरामुक्त पंचतारांकित शहरांच्या यादीत समावेश
आणि
Ø औरंगाबाद शहरात गुरुवारपासून टाळेबंदी शिथील
****

 टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातल्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने आज जारी केल्या. राज्याची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका क्षेत्रांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. या सर्व क्षेत्रात केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रं आखली जाणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्याचे अधिकार महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर पडताना मास्क लावणं गरजेचं असेल. तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असून तो आता दंडनीय अपराध आहे.

 विमान, मेट्रो, शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह, मॉल, व्यायामशाळा तसंच प्रार्थनास्थळं बंदच राहणार आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्रीडाविषयक, मनोरंजनात्मक, किंवा इतर कुठल्याही कारणासाठी लोकांना एकत्र जमवता येणार नाही.

 प्रतिबंधित क्षेत्र वगळता घरपोच खाद्य पुरवठा करण्यासाठी उपाहारगृहांना राज्यभर परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवेतले उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे. याशिवाय मजुरांची वाहतूक गरजेची नसेल तर सर्व बांधकामंही सुरू होऊ शकतील. मात्र टॅक्सी, रिक्षा, कॅब आणि अॅप आधारित वाहतुक सेवा रेड झोनमध्ये बंदच राहतील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
****

 सरकारी कार्यालयांमधली बायोमॅट्रिक जैवमितीय हजेरी पद्धत टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातही रद्द करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयानं कार्यालयात अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यानुसार उपसचिव आणि त्यापेक्षा वरच्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांना कामाचे सर्व दिवस कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. तर उपसचिव दर्जापेक्षा खालच्या पदाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दररोज ५० टक्के उपस्थिती आवश्यक असेल. आतापर्यंत हे प्रमाण ३३ टक्के होतं.
****

 देशभरातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केला आहे. देशभरात सध्या एक लाख एक हजार १३९ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन हजार १६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ३९ हजार १७४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचलं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 स्थलांतरित कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यासाठी गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे. एक मे पासून आतापर्यंत रेल्वेनं एक हजार ५६५ रेल्वे गाड्या चालवून सुमारे २० लाख स्थलांतरित कामगारांना आपल्या मूळ गावी पोहोचवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सर्व राज्य सरकारांनी विशेष श्रमिक रेल्वेसंदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, आणि स्थलांतरित कामगारांना पाठवण्याची तसंच आपल्या राज्यात पोहोचलेल्या कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत.

 ठाणे जिल्ह्यातून आतापर्यंत जवळपास ५६ हजार स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलं आहे. यापैकी २१ हजार ४७५ कामगारांना १७ रेल्वेगाड्यांमधून तर ३४ हजार ४८५ कामगारांना एक हजार ५५३ बसमधून त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आलं आहे.

 दरम्यान मुंबईत वांद्रे स्थानकावर आजही विशेष श्रमिक रेल्वे सुटण्यापूर्वी कामगारांनी मोठी गर्दी केली होती, पोलिसांच्या मदतीने हा जमाव पांगवण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 रायगड जिल्ह्यात ११ मे ते १८ मे या काळात जवळपास ३७ हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्हयात पायी किंवा खासगी वाहनांनी येणाऱ्यांची पेण जवळ खारपाडा इथल्या चेकपोस्टवर नोंद ठेवली जात आहे. जिल्ह्यात आलेल्यांपैकी २७ हजार ८७० जणांना कोणतीही बाधा नसली तरी त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
****

 जळगाव जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या ३१६ बसेसमधून ६ हजार ९५२ जणांना आपल्या मूळ गावी पोहचवण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली आहे. रवाना करण्यापूर्वी या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
****

 मध्यम उद्योगांच्या गुंतवणूक आणि वार्षिक उलाढालीच्या मर्यादेत वाढ केली जाणार आहे. या उद्योगांची गुंतवणूक मर्यादा २० कोटी रुपयांवरून ५० कोटी रुपये तर, वार्षिक उलाढालीची मर्यादा १०० कोटी रुपयांवरून २०० कोटी रुपये केली जाणार असल्याचं, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं आहे. सरकारने नुकतेच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे निकष वाढवले होते. त्यानंतर आता मध्यम उद्योगांच्या निकषात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच सूचना जारी केली जाईल, असं गडकरी यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 नवी मुंबई शहराचा देशातल्या कचरामुक्त पंचतारांकित शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ही आज ही यादी जाहीर केली, यामध्ये मध्यप्रदेशातलं इंदूर, छत्तीसगढ राज्यातलं अंबिकापूर, गुजरातमधलं राजकोट आणि सुरत, कर्नाटकातलं म्हैसूर आणि महाराष्ट्रातल्या नवी मुंबई या सहा शहरांना कचरामुक्त पंचतारांकित शहरं म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
****

 औरंगाबाद शहरात परवा गुरुवारपासून टाळेबंदी शिथील करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, अन्नधान्य, किराणा आणि भाजीमंडई सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं परिपत्रक मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक पांडेय यांनी आज जारी केलं आहे. याठिकाणी गर्दी होणार नाही तसंच शारीरिक अंतर राखणे, नियमित मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असल्याचं त्यांनी या परिपत्रकात नमूद केलं आहे.

 दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ५३ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७५ झाली आहे. यापैकी ३३५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून ३५ जणांचा मृत्यू झाला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 नांदेड शहरातील करबला भागात एका ६० वर्षीय इसमाचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु असून सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. या रुग्णामुळे नांदेड जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ९८ झाली आहे.
****

 गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३८ दिवसांनंतर कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता दोन झाली आहे.
****

 अमरावती जिल्ह्यात आज आणखी एकाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या ११२ झाली आहे. सध्या ३६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
****

 धुळे जिल्ह्यात आणखी नऊ रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यामुळे धुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७९ झाली आहे. साक्री तालुक्यातल्या बल्हाणे इथल्या ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्यानं, प्रशासनाने संपूर्ण गाव प्रतिबंधित केलं असून गावात १४ दिवसांची टाळेबंदी घोषीत केली आहे.
****

 कोरोना विषाणूबाधित महिलेसोबत मुंबई येथून वाशिम येथे आलेल्या ६ व्यक्तींपैकी पाच जणांना कोरोना विषाणू लागण झाली असून एकाचा अहवाल प्रतिक्षेत आहे. या सर्वांना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं
****

 रुग्णालयांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजून कोरोना विषाणूला रुग्णालयाबाहेरून लढा देण्याची गरज असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. कोवीड 19 या साथीवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जे प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून तुलनेने राज्यातील मृत्यू दर आणि साथीच्या प्रसाराचा वेग कमी राहिला असल्याचं ते म्हणाले.
****

  परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सर्व प्रतीचा कापूस त्वरीत खरेदी करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आलं. मागणी पूर्ण न झाल्यास, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
****

 टाळेबंदीमुळं राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेल्या विद्यार्थी, मजूर, नागरिक, पर्यटकांसाठी राज्य शासनानं मोफत बस सेवा सुरू करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे त्यांनी या मागणीचं निवेदन सादर केलं आहे.
****

 नांदेड शहरात श्रीनगर परिसरात एक पादत्राणांचं दुकान परवानगी नसतांना उघडल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुकान चालकास पाच हजार रुपये दंड ठोठावत दुकान बंद केलं. अन्य एका दुकानदारानं निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यामुळं त्या दुकानदाराकडूनही मनपा पथकानं दंड वसूल केला.
****

 टाळेबंदीच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यात सर्व नऊ तालुक्यांमधे सात हजार ४४ कामगारांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळालं असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली आहे.
*****
***

No comments: