Monday, 18 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक१८ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** चौथ्या टप्प्यातली टाळेबंदी ३१ मे पर्यंत लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय; आंतरराज्य प्रवासी वाहतूक संबंधित राज्यांच्या परवानगीने सुरु करण्यास अनुमती; प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही सूट नाही, रात्रीची संचारबंदीही कायम
** स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत रोजगार, आरोग्य, शिक्षण, कंपनी कायदा आणखी मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर; राज्यांनाही पाठबळ
** राज्यात आणखी दोन हजार ३४७ कोरोना विषाणू बाधित रूग्ण; दिवसभरात ६३ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात पाच जणांचा मृत्यू तर ६१ नवे रूग्ण
** ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ नवनिर्वाचित विधान परीषद सदस्यांचा आज शपथविधी
आणि
** गडचिरोली जिल्ह्यात नक्षवाद्यांसोबतच्या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि शिपाई शहीद
**
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. देशभरात ही टाळेबंदी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आंतरराज्य प्रवासी वाहतूक संबंधित राज्यांच्या परवानगीने सुरु करता ये, असं सरकारनं म्हटलं आहे. नागरिकांच्या प्रवासाबाबत प्रमाणित कार्यपद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, असं या आदेशात म्हटलं आहे.
कोणत्या क्षेत्रांची ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मध्ये विभागणी करायची याचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यावा, प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर नागरिकांना संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत घराबाहेर पडता येणार नाही. सगळ्या कार्यालयामंधल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आंतरराज्य आणि आंतरजिल्ह्यात डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आणि रुग्णांच्या वाहतुकीला परवानगी द्यावी, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. राज्यांमध्ये वस्तू आणि इतर मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त रिकाम्या ट्रकच्या वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे.         
टाळेबंदीच्या या काळात विमान आणि रेल्वे सेवा, शाळा, माहविद्यालयं, इतर शैक्षणिक संस्था, शिकवण्या बंदच राहणार आहेत. ऑनलाईन शिक्षण या काळात सुरु राहणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, सिनेमागृह, हॉटेल्स, मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, उद्यानं, खेळांची मैदानं पूर्णपणे बंद राहतील, मात्र आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, विलगीकरणात असलेले नागरिक, सरकारी अधिकारी, पर्यटक यांच्यासाठी चालवण्यात येणाऱ्या हॉटेलच्या सेवा आणि रेस्टॉरंटची होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार आहेत.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक अशा कोणत्याही कार्यक्रमांना, या काळात परवानगी दिलेली नाही.
****
राज्यातही साथ रोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार टाळेबंदीची मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल जारी केले. टाळेबंदीत शिथिलता देण्यासंदर्भात योग्य त्या वेळी माहिती दिली जाईल, असं सरकारनं सांगितलं आहे.
****
कोविड १९ प्रतिबंधासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानंही काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सार्वजनिक ठिकाणं आणि कार्यालयांमध्ये हे निर्देश लागू असतील. यामध्ये मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं सर्वांना बंधनकारक करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासह शिक्षेची तरतूद करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
****
स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या उर्वरित योजनांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पाचवा दिवशी माहिती दिली. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - मनरेगा, आरोग्य, शिक्षण, व्यवसायानुकूल वातावरण निर्मिती, कंपनी कायदा, राज्य सरकारांना पाठबळ, सार्वजनिक उद्योगांबाबत नवीन धोरण, अशा सात क्षेत्रांचा समावेश आहे.  

आपापल्या घरी परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांना रोजगार पुरवण्यासाठी मनरेगा योजनेत ४० हजार कोटी रुपयांची जादा तरतूद केल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. अर्थसंकल्पात केलेल्या ६१ हजार कोटी रुपयांच्या तरतुदी व्यतिरिक्त ही अतिरिक्त वाढ आहे.
आरोग्य सेवा सुविधांवरच्या तरतुदीतही वाढ केली असून तळागाळापर्यंत ही सेवा पोचवण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यात येणार आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा पातळीवर संसर्गजन्य आजारांसाठी विशेष विभाग आणि प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असून, ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी पीएम ई - विद्या कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. त्याकरता पहिली ते बारावीच्या वर्गांकरता प्रत्येकी एक दूरचित्रवाहिनी सरकार सुरु करेल. देशातली शंभर विद्यापीठं ३० मे पासून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करु शकतील. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समुपदेशनासाठी मनोदर्पण सेवा सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारांना कर्ज उचलण्याची मर्यादा स्थूल उत्पादनाच्या पाच टक्क्यापर्यंत वाढवून दिली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. यामुळे २०२० - २१ या वर्षात राज्यांना चार लाख २८ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील, असं त्या म्हणाल्या. यंदा कर महसुलात घट होऊनही राज्यांना गेल्या एप्रिल मधे ४६ हजार ३८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, तसंच राज्य आपत्ती निवारण निधीचा ११ हजार ९२ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यांना कर्ज घेण्यासंदर्भातली मुदत ३२ दिवसांवरून ५२ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोविड १९ प्रतिबंधक अभियानासाठी चार हजार ११३ कोटी रुपये आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिले असल्याची माहितीती त्यांनी यावेळी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं उपलब्ध करुन दिलेल्या वाढीव ओव्हरड्राफ्ट सुविधांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
कंपनी कायद्यामध्ये काही बदल करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्यानुसार सीएसआर, बोर्डाच्या अहवालात कमतरता, दस्तावेजीकरण यासंदर्भातल्या छोट्या चुका, गुन्ह्याच्या यादीतून बाहेर करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या सुरूच राहणार असल्या, तरी सर्वच क्षेत्रात खासगी कंपन्या आणि गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धोरणात्मक क्षेत्र आणि इतर क्षेत्र यांच्या वर्गीकरणासाठी सरकार विशेष धोरण आखणार असून, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी नवं धोरण आखत त्यांची पुनर्रचनाही केली जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, मोफत अन्नधान्य, गॅस पुरवठा, किसान आणि जनधन खात्यात रोख रक्कम, स्थलांतरित कामगारांसाठीच्या श्रमिक विशेष गाड्या इत्यादि योजनांचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी, विविध योजनांवरच्या तरतुदींचा तपशील सादर केला.
****
राज्यात काल दोन हजार ३४७ कोरोना विषाणू बाधित रूग्णांची वाढ झाली. यामुळे राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या ३३ हजार ५३ एवढी झाली आहे. याशिवाय काल दिवसभरात ६३ रूग्णांचा मृत्यू झाला असून या आजारामुळे राज्यात मृत पावलेल्यांची एकूण संख्या एक हजार १९८ एवढी झाली आहे. दुसरीकडे या आजारातून सात हजार ६८८ रूग्ण मुक्त झाले आहेत. सध्या राज्यभरात २४ हजार १६१ रूग्ण उपचार घेत आहेत.
****
औरंगाबाद शहरात पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रोशन गेट इथला ४२ वर्षीय पुरुष, शंभू नगर इथली ३५ वर्षीय महिला आणि बुढीलेन इथल्या ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांचाही काल मृत्यू झाला. याशिवाय संजयनगर भागातल्या एका ५३ वर्षाच्या महिलेचा आणि जलाल कॉलनीतल्या एका ३२ वर्षाच्या तरूणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला होता. कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. 
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ६१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ९६२ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये हुसेन कॉलनीतले नऊ, बहादुरपुरा इथले आठ, सातारा परिसरातल्या गणपती बाग इथले सहा, पुंडलिकनगर पाच, कबाडीपुरा, शरीफ कॉलनी, बाबर कॉलनी, राम नगर इथं प्रत्येकी तीन, कन्नड तालुक्यातल्या देवळाणा इथले दोन रुग्ण आहेत.  जालान नगर, उलकानगरी, रोहिदास हाऊसिंग सोसायटी, संजय नगर, सातारा परिसर, सेव्हन हिल परिसरातलं विद्यानगर, सिडको एन सहा, बारी कॉलनी गल्ली क्रमांक दोन, सिंधी कॉलनी, न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी, सिल्क मिल कॉलनी, घाटी हॉस्पिटल परीसर, रेंटीपुरा, बायजीपुरा गल्ली क्रमांक २३, जाधववाडी, मकसूद कॉलनी या भागात प्रत्येकी एका  रूग्णाचा समावेश आहे. याशिवाय कन्नड तालुक्यातल्या देवळाणा इथं एका २५ वर्षाच्या महिलेला आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलीलाही या विषाणूची बाधा झाल्याचं तपासणी अहवालात आढळून आलं आहे. गंगापूर तालुक्यातलं फुलशिवरा हे या महिलेचं माहेर असून या गावात आढळलेल्या रूग्णांमध्ये तिची आई आणि बहिणीचा समावेश आहे. याचकाळात ही महिलादेखील माहेरी आली होती. त्यानंतर ती आपल्या सासरी देवळाणा इथं परतली होती. आई आणि बहिण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेलाही या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३१२ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयातले नऊ अधिकारी - कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर यापैकी एका कर्मचाऱ्याला उपचारानंतर सुटी देण्यात आली असून घरीच विलगीकरण करण्यात आलं आहे. सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी ही माहिती दिली आहे.  नियंत्रण कक्ष इथं कार्यरत एक पोलिस निरिक्षक, पोलीस ठाणे जिन्सी इथं कार्यरत दोन पोलिस कर्मचारी, पोलिस मुख्यालय इथं कार्यरत असलेले एक पुरूष आणि दोन महिला कर्मचारी, पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज, वेदांतनगर आणि वाहतूक शाखा इथं कार्यरत असणारे प्रत्येकी एक कर्मचारी यांचा यामध्ये समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी १३ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं. हे सर्व रूग्ण कोविड केयर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षातले असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितलं. यात नऊ रूग्ण यात्रेकरू आहेत, तर नांदेड शहरातल्या अबचलनगर इथले दोन, करबला इथला एक आणि मुदखेड तालुक्यातल्या बारड कोविड केअर सेंटर मधला एक रूग्ण आहे. हा रूग्ण मुंबई इथून आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची एकूण संख्या आता सत्त्याण्णव इतकी झाली आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन रूग्ण फरार आहेत.
****
बीड जिल्ह्यात शनिवारी दोन रूग्ण आढळल्यानंतर काल आणखी सात बाधित रूग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात आता एकूण नऊ रूग्ण झाले आहेत. आष्टी तालुक्यातल्या पाटण सांगवी गावात हे सात रूग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे हे सातही जण अहमदनगर जिल्ह्यातले असून ते पाटण सांगवीला पाहुणे म्हणून आलेले आहेत. यातल्या एका वृद्ध व्यक्तीला खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयापाठवण्यात आले, मात्र या रुग्णालयाने दाखल न करून घेतल्याने त्यांना बीडच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या ठिकाणी त्यांची तपासणी केल्यानंतर ते बाधित असल्याचे आढळून आले.
****
जालना जिल्ह्यात पुन्हा आठ नवीन कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णामध्ये सहा जण हे मुंबईहुन आलेले आहेत. अन्य दोन जण शहरातल्या एका खासगी रुग्णालयातले कर्मचारी आहेत. या सहाजणांमध्ये पाच जण हे घनसावंगी तालुक्यातल्या पीरगेबवाडीचे तर एक जण रांजणी इथला रहिवाशी आहे. यामुळे आता जिल्ह्यात एकूण ३३ रूग्ण झाले आहेत.
****
लातूर जिल्ह्यातही काल सहा बाधित रूग्ण आढळून आले. आतापर्यंत लातूर शहरात एकही रूग्ण आढळला नव्हता. मात्र काल दोन रूग्ण लातूर शहरात सापडले असून हे दोघेही नुकतेच मुंबईहून आलेले आहेत. याशिवाय जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण असलेल्या उदगीर शहरात आणखी तीन रूग्ण आढळले तर जळकोटमध्ये एक रूग्ण आढळला आहे. लाउदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६५ वर्षाच्या कोरोना विषाणू ग्रस्त महिलेचा काल मृत्यू झाला. लातूरमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेलेला हा दुसरा बळी आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात कळंब तालुक्यात हावरगाव इथल्या दोन महिला तर भूम तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या सात झाली आहे. या रूग्णांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं आहे.
****
परभणी शहरात काल एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. शहरातल्या मिलिंद नगर भागात राहणारी ही महिला मुंबई इथून आपल्या नातेवाईकासह काही दिवसांपूर्वी टेम्पोनं प्रवास करुन परभणीत आली होती. या महिलेच्या संपर्कातल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वतीनं मिलिंदनगर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून, सुपरमार्केट पारिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. परभणीतली कोरोनाबाधितांची संख्या आता चार झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं आठ जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं काल स्पष्ट झालं. वसमत इथं मुंबईतून आलेल्या सतरा जणांना शासकीय विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी या आठ जणांना विषाणूची लागण झाली. हिंगोली जिल्ह्यातल्या ९१ बाधितांपैकी ८४ जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत. आता १५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं सांगितलं.
****
आणखी एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. बुलडाणा जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या आता ३० झाली आहे. जिल्ह्यात २३ जण कोरोना विषाणू मुक्त झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
****
आताच हाती आलेल्या बातमीनुसार नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गुढकथा, कादंबरीत, ललित लेख, वैचारिक साहित्य, अशा साहित्यप्रकारात दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे रात्री साडेबारा वाजता निधन झाले त्यांनी महाराष्ट्रात बाल रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून सुमारे तीस वर्ष पदरमोड करून बालनाट्य निर्मिती केली झोपडपट्टीतील मुलांना त्यांना नाटक शिकवलं वेडी माणसं १९५५ साली म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून रत्नाकर मतकरी यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती  २०१४ साली रत्नाकर मतकरी यांच्या नावावर ३१ कथासंग्रह होते २००१ सारी पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ नवनिर्वाचित आमदारांचा आज मुंबईत शपथविधी होणार आहे. राज्य विधीमंडळाचं २२ जूनपासून  प्रस्तावित असलेल्या पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे.  
****
राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या तुकड्या काल दाखल झाल्या. मुंबई, पुणे, मालेगाव, अमरावती आणि इतर ठिकाणी त्या तैनात करण्यात आल्या असून, यामुळे राज्यात पोलिस दलावरचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे.  राज्यानं २० सशस्त्र पोलिस दलाच्या तुकड्या पाठवाव्यात अशी मागणी केंद्र सरकारला केली होती.
****
औरंगाबाद शहरातली कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या पाहता, या रुग्णांना तातडीनं उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयांतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य करावं, असं आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या वैद्यकीय सल्लागारांचं कृती दल आणि इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत काल ते बोलत होते. खाजगी डॉक्टरांनी दिवसनिहाय शहरातल्या कोविड उपचार केंद्रांना भेट देऊन रुग्णांची पाहणी करावी आणि योग्य त्या उपचाराबाबत मार्गदर्शन करावं, असं केंद्रेकर यावेळी म्हणाले.
दरम्यान आजपासून वीस मे पर्यंत तीन दिवस औरंगाबाद शहरातल्या सर्व बँकांच्या शाखा पूर्णत: बंद राहणार आहेत. अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत  कारेगावकर यांनी काल ही माहिती दिली. कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. बँकांचे शाखास्तरावरील व्यवहार बंद असले तरीही खातेधारकांना एटीएमसह सर्व ऑनलाईन सुविधा सुरुच राहणार असल्याचं कारेगावकर म्हणाले.
****
परभणीच्या आर.आर.पाटील प्रतिष्ठानचे योगेश देशमुख भोगावकर यांनी दहा गरजु कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचं वाटप केलं.
मानवत तालुक्यातल्या कोल्हा ग्रामपंचायतीमध्ये गरजू कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप मानवत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या हस्ते काल करण्यात आलं. 
पाथरीतल्या संकल्प मानव विकास संस्थेनं सफाई कामगारांना स्वच्छता आणि संरक्षण किटचं वाटप काल आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते केलं.
जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं काल शितल भराडे आणि विश्वास ढवळे या नवदाम्पत्यानं लग्नासाठी होणारा खर्च टाळून ती मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. दांपत्यानं दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्याकडे सुपूर्द केला.
पूर्णा इथल्या श्री गुरुबुद्धिस्वामी वरिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख ७२ हजार ३१४ रुपयांची मदत केली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं काल अंगवाडी सेविका, आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली, तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू नियमांची माहिती दिली.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या वडी इथं पांदण रस्त्याचा अनेक वर्षाचा प्रश्नमाझं गाव माझं योगदानया उपक्रमातंर्गत नागरीकांनी सोडवून रस्त्याचं काम पूर्ण केलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर....

न्याय प्रविष्ट प्रकरण असतांनाही अनेक वर्षांपासूनचा पांदण रस्त्याचा प्रश्न माझे गाव माझे योगदान या उपक्रमाअंतर्गत सोडून या रस्त्याचे काम पूर्ण केले. यासंदर्भात चंदाताई कुटे म्हणाल्या..
अनेक वर्षांपासून मुळूबाई ते आष्टी या हा रस्ता वादग्रस्त बनला होता. त्यावर चर्चा केली आणि सर्वांच्या सहमतीनं शेतरस्त्याचा प्रश्न निकाली काढला. तात्काळ लोकवर्गणी जमा केली आणि शेत रस्ता दोन दिवसात पूर्ण केला. इतर गावातील नागरिकांनी देखिल गावस्तरावर एकत्र येवून आपआपल्या शेतरस्त्याचे प्रश्न निकाली काढावेत. वाद-विवाद नको आता आपण सारे एक होवू
विविध जाती धर्मांचे नागरिक एकत्र येवून गाव एकसंघ ठेवतांना गावाचा कसा काया पालट करू शकतात याचे वडी गाव म्हणजे ज्वलंत उदाहरण होय.
आकाशवाणी बातम्यांसाठी मी विनोद कापसीकर
****
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत काल पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हमाने आणि शिपाई किशोर आत्राम शहीद झाले. भामरागड तालुक्यातल्या कोठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांनी लावलेल्या सापळ्यामध्ये फसल्यानंतर ही चकमक झाली. यात तीन जवानही जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहर परिसरात शेतातून सुमारे एक लाख ११ हजार रुपये किमतीची बनावट दारु पोलिसांनी काल जप्त केली. एकाच शेतात वेगवेगळ्या ९ ठिकाणी बनावट दारू लपवून ठेवण्यात आली होती. भोकर पोलिसांनी या संदर्भात १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
****
राज्याच्या काही भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही आज पहाटे काही भागात जोरदार वाऱ्यासह रिमझीम पाऊस झाला. नांदेड, उस्मानाबाद, वर्धा, चंद्रपूर, महाबळेश्वर, खंडाळा इथही पावसाची नोंद झाली.
दरम्यान, अंदमानसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होन तो पुढे सरकण्यास अनुकुल वातावरण तयार  झाल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. तसंच, बंगालच्या उपसागरात उम्फन हे चक्रीवादळही घोंगावत असून ते पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळाच्या परिणामामुळे राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
टाळेबंदीच्या काळात येत असलेल्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी उस्मानाबाद कृषी विभाग हंगाम पूर्व कृषिशाळा घेत आहे. या शेती शाळेत शेतकऱ्यांना कृषि अधिकारी आणि तज्ञ मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यातली पहिली महिला शेतकरी शेती शाळा वानेवाडी इथं घेण्यात आली. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करत म्हणजे प्रत्येक सदस्याच्या तोंडाला मास्क, सुरक्षित अंतर ठेवून ही शेती शाळा घेण्यात आली.या शेती शाळेला गावातल्या १०० महिला उपस्थित होत्या. खरीप हंगामासाठी वापरावं लागणारे घरगुती बियाणे, त्याची उगवण क्षमता तपासणे, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी निंबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार करणे, खतं बी-बीयाणे यांची एकत्रित मागणी नोंदवून गावात एकत्रित खतं बी-बियाणे आणणे, शत्रू आणि मित्र किडींच व्यवस्थापन या विषयावर या शेती शाळेत तालुका कृषि अधिकाऱ्यांसह कृषिच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. याशेती शाळेचा भरपूर उपयोग होईल असा विश्वास वाणेवाडी गावातील महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद.
****
गावी परतलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी खोळंबलेल्या योजना सुरु कराव्या, अशी मागणी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे. परभणी विधानसभा मतदार संघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- मनरेगा अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची कामं त्वरित सुरू करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता उपनिबंधक कार्यालय, प्रादेशीक तसंच उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांची कार्यालयं आजपासून सशर्त सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. उपनिबंधक कार्यालयात पाच कर्मचारी राहतील, प्रादेशिक तसंच उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांच्या कार्यालयात दहा टक्के कर्मचारी राहतील, असं आदेशात म्हटलं आहे.
****


No comments: