Tuesday, 19 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
औरंगाबाद इथं आज आणखी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीत मृत्यू झाला. हिमायत बाग परिसरातला रहिवासी असलेला हा रुग्ण ६५ वर्षांचा होता. औरंगाबाद शहरातला हा कोरोना विषाणू संसर्गाचा ३५ वा बळी आहे. दरम्यान, आज सकाळी जिल्ह्यात ५१ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७३ झाली आहे. यापैकी ३३५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी शहरातील साखला प्लॉट भागात आज पहाटे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळं साखला प्‍लॉट आणि लगतच्या परीसर आज सकाळी ७ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आज एक कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळून आला आहे. एकूण २४ संशयितांचे तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २३ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांपैकी ३० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. पाच रुग्ण मृत्यू पावले आहेत तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत.
****
सातारा जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या ८ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या १४६ इतकी झाली आहे.
****
कोरोना विषाणू बाधितांवर उपचारासाठीचे खासगी रुग्णालयांचे दर पाहता, सरकारनं त्यावर नियंत्रण आणण्याची गरज, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना एक निवेदन सादर केलं, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. खरीप हंगाम तोंडावर आला आहे, यासाठी सरकारची काहीही तयारी नाही, शेतमाल खरेदीची व्यवस्था नाही, असं सांगतानाच, केंद्र सरकारप्रमाणे राज्यसरकारनेही बारा बलुतेदारांसाठी विशेषत: शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. सर्वपक्षीय बैठकीनंतरही सरकारकडून काहीही निर्णय घेतला गेला नाही, बैठक ही फक्त औपचारिकता असू नये, असं सांगतानाच स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा बसची व्यवस्था सरकारने केली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
****
टाळेबंदीमध्ये सोलापूर इथं अडकलेल्या ३० कामगारांना बिहार राज्यात घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा काल रात्री नांदेड जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी कामगार ठार तर २८ जण जखमी झाले आहेत. लोहा तालुक्यात खेडकरवाडी या गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सर्व जखमींना नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथून एक विशेष श्रमिक रेल्वे झारखंड राज्यातल्या डाल्टेनगंजसाठी आज सकाळी साडे अकरा वाजता रवाना झाली. या रेल्वेतून औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास एक हजार सहाशे मजूर प्रवास करत असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं.
****
स्थलांतरित कामगारांसाठी अधिक रेल्वेगाड्या सोडण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. स्थलांतरितांच्या या जत्थ्यांमधल्या महिला, मुलं तसंच वृद्धांची विशेष काळजी घेण्याची सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. या गाड्या सोडण्यासंदर्भात रेल्वे विभागाशी समन्यव साधावा, रेल्वे तसंच बस सोडण्याच्या वेळा स्पष्ट असाव्यात, असंही या पत्रात म्हटलं आहे. कामगारांच्या भोजन आणि आरोग्य सेवेसह त्यांच्या समुपदेशनाचीही काळजी घ्यावी, अशी सूचनाही या पत्रातून करण्यात आली आहे.
****
टाळेबंदीच्या जवळपास ५५ दिवसानंतर आज सकाळी प्रथमच नांदेड शहरात सामान्यपणे मद्य विक्री सुरू झाली आहे. दुकानदार आणि खरेदीदार दोघेही शासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतांना दिसत आहेत. मद्य खरेदीसाठी येणारे ग्राहक सामाजिक आंतर नियमाचं पालन करत करत असून ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंगव्दारे ताप तपासणी केली जात आहे. तसंच हातांना सॅनिटायझर लावले जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात फोटो स्टुडिओसह इतर संलग्न व्यवसायांना परवानगी द्यावी अशी मागणी नांदेड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश होकर्णे यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जनतेला शासकीय कार्यालयं तसंच बँकाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट फोटो आवश्यक आहे, लग्न आणि इतर समारंभांना नियमांच्या अधीन राहून प्रशासन परवानगी देत आहे, त्यात फोटोग्राफर आणि व्हीडिओग्राफर या दोघांना परवानगी असण्याबतचा उल्लेख करण्यात यावा, अशी विनंतीही प्रशासनाला या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
****



No comments: