Monday, 1 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला, यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात या आजारामुळे मृतांची संख्या तीन झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने आणखी तीन कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकशे एकोणपन्नास झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी सव्वीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या एक हजार पाचशे एकोणसत्तर इतकी झाली आहे. यापैकी एक हजार एकोणतीस रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून बहात्तर जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता चारशे अडूसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये भवानी नगर, आणि आझम कॉलनी परिसरात प्रत्येकी चार, अहिंसा नगर, जुना बाजार, चिस्तीया कॉलनी, तसंच एन आठ सिडको या भागात प्रत्येकी दोन, तर उस्मानपुरा, शिवशंकर कॉलनी, एन सहा सिडको, युनूस कॉलनी, मुकुंदवाडी, मिसरवाडी, नारेगाव, रेहमनिया कॉलनी, या भागात प्रत्येकी एक, तर जिल्ह्यात वैजापूर इथं दोन रुग्ण आढळले आहेत.
****
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद -आयसीएमआर चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे. हे शास्त्रज्ञ काही दिवसांपूर्वीच मुंबईहून दिल्ली इथं आले होते. काल सकाळी त्यांची कोरोना विषाणू तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. हे शास्त्रज्ञ, मुंबई आयसीएमआरच्या पुनरुत्पादक आरोग्य राष्ट्रीय संशोधन संस्थे कार्यरत आहेत.
****
देशभरात कोविडग्रस्तांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले असून, पाच हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ९३ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं, अभाविपने म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. सध्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देणं आणि परिस्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी एक संधी देण्याची घोषणा करणं, हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसानदायक असल्याचं, अभाविपनं म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, यात तीन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांचा एक गट आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्याच्या बेतात असताना, सुरक्षा दलानं त्यांना हटकलं, त्यावेळी ही चकमक उडाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
*****
आज जागतिक दूध दिन साजरा करण्यात येत आहे. दूध हे जागतिक अन्न असल्याचं, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. जगात दुधाचं सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुधाच्या उत्पादनाचं महत्त्वाचं स्थान असून अमूल सारख्या यशस्वी ब्रँडमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासह पौष्टिक मूल्यातही वाढ झाल्याचं सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच, उपराष्ट्रपतींनी सर्व शेतकरी आणि विशेषत: महिला दूध उत्पादकांना शुभेच्छा दिल्या.
****
वंदे भारत अभियानांतर्गत आखाती देशांत अडकलेले दोन हजाराहून अधिक भारतीय आज विशेष विमानांनी भारतात परतणार आहेत. आखाती देशांत अडकलेल्या अडीच हजार भारतीयांना काल विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आलं. यात कामगार, पर्यटक, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे.
****
नांदेड - अमृतसर ही विशेष सचखंड एक्सप्रेस आज सकाळी साडे दहा वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून साडे चारशे प्रवासी घेऊन अमृतसरकडे रवाना झाली. टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या या पहिल्या रेल्वे गाडीत दक्षिण मध्य रेल्वे विभागातून ९०० प्रवाशांनी तिकिट आरक्षित केलीले असल्याची माहिती जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान गुरुद्वारा लंगर साहेब इथे अडकुन पडलेले ६५ यात्रेकरू तीन महिन्यानंतर या रेल्वेतून घरी परत जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली.
****


No comments: