Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्यशासनाकडून १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज
जाहीर
**
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
**
केंद्र सरकारचं धोरण राज्याला आर्थिक अडचणीत आणणारं - परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक
यांचा आरोप
आणि
**
औरंगाबाद इथं एका कोविड बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू
****
अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्यशासनानं १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यामध्ये फळपिकांसाठी
२५ हजार रुपये प्रतिहेक्टर तर जिरायती तसंच बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये
जाहीर करण्यात आली आहे, कमाल दोन हेक्टर शेतीसाठी ही मदत दिली जाणार आहे. दहा हजार
कोटी रुपयांच्या या पॅकेजमध्ये नुकसानग्रस्त भागातल्या रस्ते- पूल दुरुस्तीसाठी २ हजार
६३५ कोटी, नगर विकास ३०० कोटी, महावितरण ऊर्जा २३९ कोटी, जलसंपदा १०२ कोटी, ग्रामीण
रस्ते आणि पाणीपुरवठा एक हजार कोटी तर कृषी-शेती-घरांसाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची
तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान
भरपाईसाठी केंद्राकडे मागितलेले एक हजार ६५ कोटी रुपये तसंच पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे मागितलेले ८०० कोटी रुपये, अद्यापही मिळालेले
नाहीत, केंद्र सरकारकडून सध्या ३८ हजार कोटी येणं बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली.
****
माजी
मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत पक्ष
कार्यालयात पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी खडसे यांचं पक्षात स्वागत केलं. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक
कार्यकर्त्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात
आला. खडसे यांनी यावेळी व्यक्त केलेल्या मनोगतात, भारतीय जनता पक्षात ४० वर्ष काम केल्यानंतरही
झालेल्या अन्यायाबद्दल खंत व्यक्त केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केलेल्या
भाषणात खडसे यांच्या पक्षप्रवेशानं खानदेशात पक्षकार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त
केला. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना, कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली
नाही, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
पर्यावरण
पूरक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात
प्रकल्प सुरू करावा, यासाठी शासन सकारात्मक असून महाविकास आघाडी सरकारने यासाठी प्रयत्न
सुरू केले आहेत. या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन
तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे चर्चा केली. राज्य शासनाने
२०१९ मध्ये नवीन औद्योगिक धोरण केले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला
प्रोत्साहन देण्याचं निश्चित केलं आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना
उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात
आपला प्रकल्प सुरू करावा, असं राज्य शासनाच्यावतीनं उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी
यावेळी सांगितलं आहे.
****
मुंबईत
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेस्ट गाड्यांना पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहने चालवण्यास
परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेस्ट गाड्यांमधे प्रवाशांनी
मास्क घालणं, बस गाड्यांचं निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर आदीं शासनानं दिलेल्या
सूचना आणि नियमांचं पालन करून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात
आली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे
निंबाळकर यांनी जारी केलेल्या पत्रात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन - बेस्ट
उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असल्याचं सांगितलं
आहे.
****
आणि
आता ऐकू कोविड जनजागृतीअंतर्गत महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सचिव विधीज्ञ अभय
टाकसाळ यांनी केलेलं आवाहन
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा धोका अजून टळला नसून यावर मास्क हेच सध्या प्रभावी औषध असल्याचं औरंगाबादचे
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटलं आहे. जमीयत उल उलमाए हिंदच्या वतीनं आज औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविलयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या
हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. सुमारे ३०० जणांना यावेळी कोविड योद्धा म्हणून
मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी परवा रविवारी मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या
कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल, त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या
संबोधनाचा अनुवाद प्रसारित केला जाईल. या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुन:प्रसारण केलं
जाईल. मन की बात कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा सतरावा भाग असेल.
****
केंद्र
सरकारने राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री
नवाब मलीक यांनी केला आहे. ते आज परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सेलू आणि मानवत
तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या पाहणीनंतर मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात
पत्रकार परिषद घेत, परभणी जिल्ह्यात एक लाख
५८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याप्रमाणे १०८ कोटी १५ लाख रुपये एवढी नुकसान
भरपाई अपेक्षित असल्याचं मलिक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या पॅकेजच्या
निकषानुसारच मदत केली जाईल. कोणीही मदतीविना राहणार नाही, असा दिलासा मलिक यांनी दिला.
****
बुलडाणा
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालं आहे. पिकांचे
सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
देऊळगावा राजा इथं विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी आणि
महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
औरंगाबाद
शहरातल्या समर्थ नगर मधल्या ७५ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान
मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या एकूण मृतांची
संख्या एक हजार ४८ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार १०४ झाली
असून एक हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी
तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार
प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती उस्मानाबादचे जिल्हा पोलीस
अधीक्षक राजतिलक रोशन यांनी आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. पीडितेची प्रकृती
सुधारत असून तिला आर्थिक सहाय्य मिळावं याकरता विधी सेवा प्राधिकरणकडे प्रस्ताव दाखल
करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या गुन्ह्यासंदर्भात आरोपपत्र लवकरात लवकर दाखल
करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची माहिती
पोलीस अधीक्षकांनी दिली.
****
राज्यातील
शासकीय अभ्यासिका सुरु कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासिकेसमोर आंदोलन केलं.
****
No comments:
Post a Comment