Thursday, 22 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना येत्या दोन दिवसात मदत देण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार.

·      केंद्र सरकारचा अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर.

·      परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय.

·      राज्यात आणखी आठ हजार १४२ कोविड बाधितांची नोंद, १८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात १७ रुग्णांचा मृत्यू. तर नव्या ५८३ रुग्णांची नोंद.

आणि

·      दहावी तसंच बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर.

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत देण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत्या दोन दिवसांत घेण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असल्याचं ते म्हणाले. आपण इकडे पाहणी दौरे करत असताना, नुकसान भरपाईबाबत मंत्रालयात विचार विनिमय सुरू आहे, विमा कंपन्यांशी देखील बोलणं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराची थकबाकी येणं बाकी आहे, ही रक्कम वेळेवर मिळाली असती, तर नुकसानग्रस्तांना लगेच मदत जाहीर करता आली असती, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सकाळी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा, कामठा आणि कात्री परिसरातल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी केली. कात्री इथं गावाच्या शेजारुन वाहणाऱ्या नदीला पाणी आल्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. काटगाव इथं घराचं नुकसान झालेल्या एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तसंच पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तुळजापूर इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यावेळी उपस्थित होते.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. गेले तीन दिवस आपण नऊ जिल्ह्यात पाहणी केली, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून, मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले. आतापर्यंत ८० ते ९० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र आपल्या दौऱ्यात अनेक ठिकाणी पंचनामे झालेच नाही, असं सांगण्यात आलं, त्यामुळे पंचनाम्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वस्तु:स्थिती गेली नाही, असं ते म्हणाले. अतिवृष्टीचं हे संकट पाहता बँकांकडून कर्ज वसुलीसाठी होणारे तगादे सरकारने थांबवावे, ऑफलाईन पद्धतीनेही विम्याचे अर्ज स्वीकारावे, तात्काळ विम्याचे पैसे द्यावे, आदी मागण्या फडणवीस यांनी यावेळी केल्या.

दरम्यान, फडणवीस यांनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं, परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात आणि जालना जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेती तसंच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना, सरकार मात्र मदत न करता टोलवा-टोलवी करत असल्याची टीका, त्यांनी यावेळी केली.

****

गेल्या वर्षी कोल्हापूर इथं झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई राज्य सरकारनं दिली होती, त्याच धर्तीवर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त औसा तालुक्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या नुकसानाचे ६५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, शिल्लक ३५ टक्के पंचनामे येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण केले जाणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

****

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला. आपला पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही, आपण पक्षनेतृत्वावर कधीही टीका केली नाही, असं सांगताना खडसे यांनी आपण फक्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं. आपल्यासोबत एकही आमदार किंवा एकही खासदार नाही. आपल्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, उद्या शुक्रवारी दुपारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मुंबईत दिली. खडसे यांचं आपण पक्षात स्वागत करतो, त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, त्यांनाही काही दिवसांत पक्षात प्रवेश दिला जाईल, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

****

दरम्यान, खडसे यांनी दिलेला राजीनामा दुर्देवी असल्याचं भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. खडसेंना आपल्याबद्दल काही तक्रारी असल्यास त्यांनी पक्षाच्या वरीष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे होती, असं ते म्हणाले. या विषयावर आपण योग्य वेळी बोलू, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

****

खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना बोलत होते. खडसे ज्या पक्षात जातील, तिथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, असं ते म्हणाले. खडसे यांचा राजीनामा आपल्याकडे आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

****

मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन दिलं आहे.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

****

केंद्र सरकारने अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. हा बोनस सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी एकाच हप्त्यात दिला जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. तीस लाख कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनससाठी सरकारी तिजोरीवर तीन हजार ७३७ कोटी रुपये भार पडणार आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेपासून कोणत्याही कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी चालू ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी नऊ ते १७ ऑक्टोबर या काळात ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा देऊ शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांची २६, २७ आणि २८ ऑक्टोबरला, तर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पेपर न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी २९, ३० आणि ३१ ऑक्टोबरला ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा घेण्यात येणार आहे.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी आठ हजार १४२ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख १७ हजार ६५८ झाली आहे. राज्यभरात काल १८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४२ हजार ६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २३ हजार ३७१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५२ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ५८३ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी ८३ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८७ नव्या रुग्णांची भर पडली. नांदेड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात १०३, उस्मानाबाद जिल्ह्यात ६२, तर जालना जिल्ह्यात ५६ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात १५७, तर परभणी जिल्ह्यात नव्या २२ रुग्णांची भर पडली. हिंगोली जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

मुंबईत काल आणखी एक हजार ६०९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४८ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एक हजार २० नवे रुग्ण, आणि ३५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ५०२ रुग्ण आढळले, तर ११ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात ४२९, अहमदनगर ३०४, यवतमाळ १२१, गडचिरोली १०५, अमरावती ८६, भंडारा ७३, सिंधुदुर्ग ३१ तर वाशिम जिल्ह्यात नव्या १९ रुग्णांची नोंद झाली. 

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २० नोव्हेंबरपासून या परीक्षांना सुरुवात होणार असून, दहावीच्या परीक्षा पाच डिसेंबर पर्यंत तर बारावीच्या सर्वसाधारण विषयांच्या सात डिसेंबरपर्यंत आणि व्यावसायिक विषयांच्या परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

लातूर ग्रामीण मतदार संघातल्या रेणा, तावरजा, व्हटी, रायगव्हाण या मध्यम  प्रकल्पासह  अनेक लघु  प्रकल्पांमध्ये  अत्यल्प किंवा मृत साठा असून, मांजरा  प्रकल्पाच्या  खाली मांजरा  नदीमधून  वाहून  जाणाऱ्या  पाण्याचा  उपसा  करून हे प्रकल्प भरण्यासाठी अभ्यास करावा, अशी सूचना आमदार  धिरज  देशमुख यांनी  लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिली आहे. तावरजा मध्यम प्रकल्पाची उंची वाढवण्याबाबतच्या कामाच्या अंदाजपत्रकास लवकरात लवकर मंजुरी घ्यावी, मांजरा प्रकल्पाची सिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी कालव्याच्या खालील बाजूस बंद पाईपद्वारे सिंचन प्रस्तावित करावेत, अशा सूचनाही आमदार देशमुख यांनी दिली.

****

कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी जनतेनं प्रतिबंधाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केलं आहे

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलूचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी महसूल कर्मचारी तलाठी संघटनेनं कालपासून लेखणी बंद आंदोलन सुरु केलं आहे. हे आंदोलन बेमुदत असून जोपर्यंत तहसीलदार शेवाळे यांची बदली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. 

****

औरंगाबाद शहर परिसरात काल सायंकाळी मेघजर्गनेसह, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरातल्या अनेक सखल भागात तसंच रस्त्यांवर पाणी साचल्यानं, वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेक भागात घरांमध्येही पाणी शिरलं.  

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं दोन गावात काल विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला.

****

राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रीय मराठा पार्टीनं केली आहे. पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिलं आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसंच इतर मालमत्तांच्या नुकसानीलाही भरपाई देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीपराव तौर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. तौर यांनी भाजपाचे संघटनमंत्री म्हणून अनेक वर्षे काम करून त्याकाळात जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले, राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी काही काळ राज्य परिवहन महामंडळाच्या संचालकपदीही काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. 

****

No comments: