Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 November 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
शाळा सुरु करण्यासंदर्भातला निर्णय स्थानिक प्रशासनानं घेण्याच्या
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सूचना.
·
औरंगाबाद शहरात आज महापालिका प्रशासन निर्णय घेणार; कोविड चाचणीत
औरंगाबादमध्ये आठ, जालन्यात चार तर उस्मानाबादमध्ये ४८ शिक्षक बाधित.
·
टाळेबंदीच्या काळातलं १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यासंदर्भात
विचार सुरू - ऊर्जामंत्री नितीन राऊत.
·
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये,
म्हणून उद्यापासून २६ नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा प्रशासनाचा निर्णय.
·
राज्यात आणखी पाच हजार ६४० तर मराठवाड्यात ४१७ नव्या रुग्णांची
नोंद.
आणि
·
महाआवास अभियानातंर्गत ग्रामीण भागात आठ लाख ८२ हजार घरकुल बांधण्याचा
राज्य सरकारचा निर्धार.
****
शाळा
सुरु करण्यासंदर्भातला निर्णय स्थानिक प्रशासनानं घ्यावा, असं शालेय शिक्षण मंत्री
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. येत्या
२३ तारखेपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, मात्र
या शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी
केलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात शाळा सुरू करत असताना स्थानिक
जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे
आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशी सूचना गायकवाड यांनी केली. गायकवाड
यांनी या संदर्भात शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष
वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण चालूच राहणार आहे.
दरम्यान,
मुंबई महापालिका क्षेत्रातल्या सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत
बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी
काल याबाबतचे आदेश जारी केले.
औरंगाबाद
शहरात शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आज होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं, महापालिकेचे
प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनानं शाळा खोल्या
निर्जंतुकीकरण आणि शिक्षकांच्या कोविड तपासणीसह शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली
आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, शाळा
सुरू करायच्या की नाही, याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत होणार असल्याचं, पांडेय यांनी
सांगितलं.
दरम्यान,
औरंगाबाद शहरात परवा गुरुवारी चाचणी झालेल्या एक हजार ४४ शिक्षकांपैकी आठ शिक्षकांना
कोविडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी
ही माहिती दिली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात कालपर्यंत ३ हजार ७८६ शिक्षकांची तपासणी करण्यात आली, यापैकी ४८ शिक्षक बाधित
आढळले आहेत. जालन्यात आतापर्यंत १९० शिक्षकांची तपासणी करण्यात आली, यापैकी चार शिक्षक
बाधित आढळले आहेत.
****
कर्तव्य
बजावताना कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि
ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी
५० लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय
काल जारी करण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना
देण्यात आल्या असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. गृहभेटी करणं,
ऑक्सीमीटर-थर्मामीटर आदींच्या सहाय्यानं लोकांची तपासणी करणं, अशी विविध कामं करताना
कर्तव्यावर असताना दुर्दैवानं काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण
होऊन त्यांचा मृत्यू झाला.
****
टाळेबंदीच्या
काळातल्या १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं ऊर्जामंत्री
नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात
एका अभ्यास गटाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी वीज धोरणास सरकारनं
मंजुरी दिली असून, सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा
आठ तास वीज पुरवठा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या
सरकारनं वीज देयकाची थकबाकी वाढवली, त्याची चौकशी करणार असल्याचं राऊत म्हणाले. वीज
देयकावरुन विरोधकांचं राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
दरम्यान,
भाजप सरकारच्या कार्यकाळातल्या वीज देयक थकबाकीची चौकशी करण्याचे राज्य सरकारनं दिलेले
आदेश हास्यास्पद असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही थकबाकी राष्ट्रवादी
आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातली असून, आपल्या सरकारमधले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी सर्वात कमी दरात विजेची खरेदी केली होती, असं फडणवीस म्हणाले.
****
केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली
आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित
सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ.सतीश पाचपुते
यांनी केलं आहे.
****
विधान
परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्य सरकारने शिफारस केलेल्या काही नावांवर
आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या
क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा यासाठी, सामाजिक सेवा, विज्ञान,
कला, साहित्य, आदी क्षेत्रांतलं विशेष ज्ञान तसंच अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपालांमार्फत
नियुक्ती करण्याची तरतूद घटनेत आहे. मात्र, या तरतुदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी
असलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, सचिन सावंत, आदींच्या नावांची शिफारस
मुख्यमंत्र्यांनी केली, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. यावर येत्या २४ नोव्हेंबरला
सुनावणी होणार आहे. सदर व्यक्तींना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना
देण्यात आली आहे.
****
कार्तिकी
एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी उद्या २२ नोव्हेंबरच्या
रात्री १२ वाजेपासून ते २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूरसह परिसरातल्या दहा गावांमध्ये संचारबंदी
लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला असल्याची
माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी कार्तिकी यात्रा भरू
न देण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूर कडे येणाऱ्या
मार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून, २२ ते २६ नोव्हेंबर पर्यंत या मार्गावरची एस टी
बस सेवाही बंद राहणार असल्याचं पोलिस अधीक्षकांनी सांगितलं. दरम्यान, कार्तिकी एकादशीला
उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाच्या शासकीय महापूजेसाठी विधी
आणि न्याय विभागानं परवानगी दिली आहे.
****
राज्यानं
एक कोटी कोविड १९ चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही
माहिती दिली.
राज्यात
काल आणखी पाच हजार ६४० कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१७ लाख ६८ हजार ६९५ झाली आहे. काल १५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार ५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सहा हजार
९४५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ४२ हजार
९१६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७८ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ८९ टक्के इतका आहे.
****
मराठवाड्यात
काल ६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४१७ रुग्णांची नोंद झाली.
परभणी जिल्ह्यात काल तीन कोविड बाधितांचा मृत्यू झाला तर १७ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद,
जालना तसंच बीड जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात
नवे ९६ रुग्ण, जालना जिल्ह्यात ६३ नवे रुग्ण, तर बीड जिल्ह्यात नवे ४५ रुग्ण आढळले.
उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ८७ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात काल ७६ नवे रुग्ण
आढळले, लातूर जिल्ह्यात ३२, तर हिंगोली जिल्ह्यात काल एका कोविडबाधिताची नोंद झाली.
****
राज्यातल्या
ग्रामीण भागातल्या नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या
गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत “महाआवास
अभियान-ग्रामीण” राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल या अभियानाचा
शुभारंभ झाला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात
सुमारे आठ लाख ८२ हजार घरकुलांची निर्मिती
करण्याचा निर्धार करण्यात आला असून, सर्वांनी एकत्रित अभियान यशस्वी करावं,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
राज्यात
सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसंच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता
देऊन या शंभर दिवसात घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचं ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
कृषीमंत्री
दादा भुसे यांनी काल जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा पिंपळे इथं विद्युत शॉक लागून विहिरीत
बुडून मृत्यमुखी पडलेल्या तीन भावांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. मृतांच्या
कुटुंबियास शासनाच्या गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन
त्यांनी यावेळी दिलं. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये मदत द्यावी, तसंच
रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या दोन तरुणांनी
दुपारी पेट्रोलची कॅन सोबत घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. मागण्या मान्य
न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला. यावेळी मृतांच्या कुटुंबीयास भेटण्यासाठी गेलेले
शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलक तरुणांशी संवाद साधला. मृत कुटुंबीयास
आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक तरुण टाकीवरून खाली उरतले.
****
ग्रामीण
भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर, नल से जल’ या योजनेमधून पाणीपुरवठा
करण्यात येणार असल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
घुगे यांनी सांगितलं. भोकर तालुक्यातल्या चितगीरी इथं पाणी पुरवठा योजना आणि नळ जोडणीच्या
कामांची काल पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत
जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध
करण्यात येणार असून, या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिव्यक्ती किमान ५५ लीटर याप्रमाणे
पाणी उपलब्ध करणं अपेक्षित असल्याचं त्या म्हणाल्या.
****
खरेदीदार
आणि आडत व्यापारी यांच्या वाद सुरु असल्यामुळे लातूरचा आडत बाजार गेल्या दोन दिवसांपासून
बंद आहे. बाजारात सध्या दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. त्यामुळे बाजार
लवकरात लवकर सुरु झाला नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा
शेतकरी संघटनेने दिला आहे. हमाल कामगारांनी हमाली दर वाढवून देण्याची मागणी केली असून,
या प्रकरणी बाजार समितीने स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी, महाराष्ट्र
माथाडी कामगार जनरल युनियनचे नेते शिवाजी कांबळे यांनी केली. खरेदीदार आणि हमाल यांच्या
वादात शेतकऱ्यांना वेठीस धरु नये असं आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार
सस्तापुरे यांनी केलं आहे.
****
अहमदनगर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ.राजश्री घुले पाटील यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी
त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
लातूर
शहरात एक दिवस एक वार्ड उपक्रमांतर्गत महावितरण कर्मचारी ग्राहकांशी संवाद साधणार आहेत.
महावितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम
चालू करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत रोहित्रांची दुरुस्ती, तारा ओढणे, ग्राहकांच्या
विज देयकांच्या तक्रारींचे निरसन करुन ग्राहकांना थकीत विज देयकं भरण्यासाठी प्रोत्साहित
करणं तसंच देयकं भरुन घेणं, वीजेच्या तारांना अडथळा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणं
इत्यादी कामे करण्यात येत आहेत.
****
ग्रामीण
भागातल्या महिलांचं आरोग्य आणि सन्मान अबाधित राहावा यासाठी प्रत्येक नागरिकानं महिलांच्या
सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचं आवाहन स्वच्छ भारत मिशन चे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या
पिंपळा भत्या इथं राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जागतिक शौचालय दिन
उपक्रमाला काल तुबाकले यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
****
लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे महामंडळास आर्थिक पॅकेज देण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक
अध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केली आहे. ते काल लातूर इथं
वार्ताहरांशी बोलत होते.
****
No comments:
Post a Comment