Friday, 20 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळून लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले सुरक्षा दलाचे आभार

** टाळेबंदीच्या काळातल्या वाढीव वीज बिलाच्या बाबतीत सरकार गंभीर  - ऊर्जामंत्री नितीन राऊत

** राज्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

आणि

** औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या तळागाळातल्या लोकशाही प्रक्रियेवर लक्ष्य साधून केलेला दहशतवादी हल्ल्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षा दलाचे आभार मानले आहेत. जम्मू काश्मीरमधल्या नरगोटा इथं झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं. २६/११ च्या वर्षपूर्ती दिनानिमित्त हे दहशतवादी मोठं षडयंत्र राबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली. आपल्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा महान शौर्य दाखवलं असून, त्यांच्या सावधानतेमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळण्यास यश मिळालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, या चकमकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव आणि सर्व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

****

टाळेबंदीच्या काळातल्या वाढीव वीज बिलाच्या बाबतीत सरकार गंभीर असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यासंदर्भात विचार सुरु असून, यासंदर्भात एका अभ्यास गटाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी वीज धोरणास सरकारनं मंजुरी दिली असून, सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज पुरवठा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं थकबाकी वाढवली आणि त्याची चौकशी करणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. वीजबिलावरुन विरोधकांचं राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

दरम्यान, भाजप सरकार मधल्या ऊर्जा विभागातल्या थकबाकीची चौकशी करण्याचे राज्य सरकारनं दिलेले आदेश हास्यास्पद असल्याचं माजी मुख्यमंत्री विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही थकबाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा काळातली असून, मागच्या सरकारमधले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात कमी दरात विजेची खरेदी केली होती, असं फडणवीस म्हणाले.

****

टाळेबंदीच्या काळातलं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर वीज बिलाची होळी करुन आंदोलन करण्यात येणार असल्याचं पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मार्च ते जून या चार महिन्याच्या काळात शून्य ते शंभर आणि शंभर ते ३०० या दोन श्रेणीतल्या आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय घटकांना पुढील पाच वर्षासाठी वीजबील माफ करावं, या वीज बील माफीसाठी राज्य सरकारने त्वरित पाच हजार कोटी रुपयांचं अनुदान महावितरणला द्यावं, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. महावितरण कंपनी ही राज्याच्या अखत्यारित असून, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्राकडे केलेली मदतीची मागणी अर्थहीन आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नवी मुंबईतले सुलेखनकार विनोद महाबळे यांनी केलं आहे.

****

राज्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. येत्या २३ तारखेपासून नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात, असं त्या म्हणाल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशी सूचना गायकवाड यांनी आज केली. राज्यातल्या शाळा सुरू होण्याच्या दृष्टीनं स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार असल्याचं त्या म्हणाल्या.

****

श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी कार्तिकी यात्रा भरून न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. पंढरपूर कडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून, २२ ते २६ नोव्हेंबर पर्यंत एस टी बस बंद राहणार असल्याचं पोलिस अधिक्षकांनी सांगितलं.

****

नाशिक इथल्या ओझर विमानतळावरुन आजपासून बंगळूरु आणि हैदराबादला विमानसेवा सुरु झाली. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्पाईस जेट विमानसेवेचं उद्घाटन झालं. या विमान सेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे, तसंच देशातली महत्त्वाची शहरं जोडली जाणार असल्यानं उद्योग आणि पर्यटनाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले. दिल्ली, अहमदाबाद तसंच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशिक येथून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सिल्लोड इथल्या २५ वर्षीय युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. तर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत आठ नवे रुग्ण आढळले.

****

जालना जिल्ह्यातही आज एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ३०६ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता अकरा हजार ९११ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १८ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ७१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

भंडारा जिल्ह्यात आज ६१, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ, तर  धुळे जिल्ह्यात सात नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत 'हर घर, नल से जल'  या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं. भोकर तालुक्‍यातल्या चितगीरी इथं पाणी पुरवठा योजना आणि नळ जोडणीच्‍या कामांची आज पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यात येणार असून, या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिव्यक्ती किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणं अपेक्षित असल्याचं त्या म्हणाल्या.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास आर्थिक पॅकेज देण्याची मागणी मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मातंग बांधवांना इतर कुठल्याही माध्यमातून मदतीचा हात मिळत नाही, अशा काळात महामंडळ हे एकमेव आशास्थान आहे, सरकारने निधी न दिल्यामुळे हे महामंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले.

****

खरेदीदार आणि आडत व्यापारी यांच्या वाद सुरु असल्यामुळे लातूरचा आडत बाजार गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. बाजारात सध्या दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. त्यामुळे बाजार लवकरात लवकर सुरु झाला नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

हमाल कामगारांनी हमाली दर वाढवून देण्याची मागणी केली असून, या प्रकरणी बाजार समितीने स्वतः पुढाकार घेउन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी, महाराष्ट्र माथाडी कामगार जनरल युनीयनचे नेते शिवाजी कांबळे यांनी केली.

****////****

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...