Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
दहा
लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं
महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार २०० कोटी रुपये वितरीत केले
आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरुन हा निधी जारी करण्यात आला आहे. दहा लाखांहून
अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढवणं आणि
वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याकरता या निधीचा उपयोग होईल, असं अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गुजरात,
झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल
या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एकूण निधीपैकी ३९६ कोटी रुपये इतका
निधी देण्यात आला आहे.
****
बिहार
विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होत असून, सकाळी ११ वाजेपर्यंत
१९ पूर्णांक २६ टक्के मतदान झालं. मध्य प्रदेशातल्या ११ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत
२६ पूर्णांक ५७ टक्के, तर उत्तर प्रदेशातल्या सात मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत १८ पूर्णांक
४९ टक्के मतदान झालं. यासह गुजरात, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, हरीयाणा, छत्तीसगढ, तेलंगणा
आणि नागालँड या राज्यांचा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही सध्या मतदान सुरु
आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे.
****
नाशिक
इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचं आणि सोलर
रुफटॉप पॉवर सिस्टीमचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झालं. राज्याचे
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन
भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते.
****
देशात
कोविड १९ मधून बरे होणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर
९५ टक्के इतका झाला आहे. काल देशभरात ५८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, देशात
आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७६ लाख झाली आहे. सध्या पाच लाख ४१ हजार रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. तर काल नव्या ३८ हजार ३१० रुग्णांची नोंद झाली. देशात आतापर्यंत २३
हजार ९७ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे.
दरम्यान,
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल एका दिवसात १० लाख ४६ हजार २४७ कोविड नमुन्यांची
तपासणी केली आहे. आतापर्यंत देशात एकूण ११ कोटी १७ लाख ८९ हजार ३५० चाचण्या घेण्यात
आल्याची माहिती परिषदेनं दिली आहे.
****
पद्म
पुरस्कारानं सन्मानित सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई
इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक
म्हणून काम केलं, त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठात स्कूल ऑफ म्युझिक अॅन्ड फाइन ऑर्टसचे
संचालक बनले. त्यांना पद्म पुरस्कारासह, पद्मभूषण, संगीत अकादमीचा संगीत कलानिधी, यासह
अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या
चारही कृषी विद्यापीठांतल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या
मागणीसाठी राज्यभर कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा
पहिला भाग म्हणून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलं, त्यानंतर आंदोलनाचा दुसरा
टप्पा कालपासून सुरू झाला असून, लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून प्राध्यापकांसह विद्यापीठातले सर्व कर्मचारी सहभागी
झाले. येत्या चार दिवसांत शासनानं सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय
घेतला नाही, तर सात नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी
संघटनेनं दिला आहे.
दरम्यान,
दापोली इथल्या डॉ.बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातले कर्मचारीही उद्या यासंदर्भात राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
****
मराठा
आरक्षण उपसमितीचा मराठा समाजाला काहीही उपयोग झालेला नाही, त्यामुळे ही समिती बरखास्त
करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली
आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार गंभीर नाही, मुळात भूमिका घेण्यातच सरकार
अपयशी ठरलं असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी काल मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच
आता पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, असंही पाटील यावेळी म्हणाले.
****
कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची संख्या घटल्यानं सोलापूर शहरातले तीन कोविड केअर सेंटर बंद
करण्यात आली आहेत. पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या या सेंटरमध्ये ३७४ रुग्णांना उपचार
देण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment