Thursday, 19 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 November 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आज त्यांच्या एकशे तिनाव्या जयंतीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विट संदेशातून अभिवादन केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही दिली.

मुंबईत राजभवनात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्तानं सामुहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली.

सोलापूर इथंही महानगरपालिकेच्यावतीनं इंदिराजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते इंदिराजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. नाशिक इथंही कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी इंदिराजींना आदरांजली अर्पण केली.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के इतकं झालं आहे. गेल्या चोवीस तासात ४८ हजार ४९३ हून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले, देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ८३ लाख ८३ हजार ६०३ झाली आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या एकोणनव्वद लाख अठ्ठावन्न हजार चारशे चौऱ्यांऐंशी झाली आहे. सध्या देशात ४ लाख ४३ हजार ३०३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

स्वस्थ राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वच्छतेला जन अभियान आणि सामाजिक संस्कारात समाविष्ट करा असं आवाहन, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जनतेला केलं आहे. आज जागतिक शौचालय दिनानिमित्त त्यांनी उघड्यावर शौच न करण्याचा संकल्प करु या असा संदेश ट्विटरद्वारे दिला आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा भागातल्या बान टोल नाक्याजवळ भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या भागात कडक बंदोबस्तात वाहनांची तपासणी केली जात असतांना ट्रकमध्ये हे दहशतवादी आढळले. ते पळून जात असतांना ही चकमक झाल्याचं गुप्तचर विभागानं सांगितलं.

****

राज्यातल्या महाविकास आघाडीने नागपूर कराराचा भंग करत हिवाळी अधिवेशन नागपुरात न घेण्याचा निर्णय घेतला, विदर्भ वैधानिक विकास मंडळ बरखास्त केलं, नागपुरात शेतकरी समस्या, वाढीव पीक नुकसान, वीज बिल देयके या विषयांवर मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतील या भीतीने सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरमध्ये पत्रकार परिषदेत केला. वाढीव वीजबीला संदर्भात दिलासा देण्याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कुठलेही अर्थसहाय्य राज्य सरकारमार्फत मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात तीन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का लागून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव अशी मृतांची नावं आहेत. विद्युत मोटार सुरु करत असतांना ज्ञानेश्वर याला विजेचा धक्का लागला त्याला वाचवतांना अन्य दोन भाऊही विजेचा धक्का लागून विहीरीत पडले. भोकरदन तालुक्यात पळसखेडा इथं काल रात्री ही घटना घडली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ४१ हजार ९१४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गाने एकूण १ हजार १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४० हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात ६२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

धुळे जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून शिक्षकांची कोरोना विषाणू चाचणी करुन घेण्यासाठी गर्दी झाली. आज एक हजार ३६४ शिक्षकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी दिली. येत्या सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शिक्षक तपासणी करुन घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातलं नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य उद्या शुक्रवारपासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे. हिवाळ्यात विदेशातले पाहुणे पक्षी या अभयारण्यात येत असतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी पर्यटकांची गर्दी होते. यंदा मात्र कोविडसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या अटी आणि आरोग्य नियमांचे पर्यटकांना पालन करावं लागणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 5 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...