Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** मध्यप्रदेशमध्ये बस कालव्यात कोसळून ३८ प्रवाशांचा मृत्यू
** राज्यातलं दूधसंकलन वाढवून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून
द्यावा - पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार
** देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक
३२ शतांश टक्के
आणि
** भारताची इंग्लंडवर ३१७ धावांनी मात, अष्टपैलू खेळाडू अश्र्विन
सामनावीर
****
मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात आज सकाळी साडे सातच्या सुमाराला
एक बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातामध्ये ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये
सुमारे ६० प्रवासी होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून
या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
या दूर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज भारतीय रिझर्व बँकेच्या
केंद्रीय मंडळ संचालकांच्या बैठकीत मार्गदर्शन केलं. वर्ष २०२१-२२च्या केंद्रीय अर्थसंकल्पामागचा
विचार आणि सरकारच्या प्राथमिकतेबद्दल अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माहिती दिली. मंडळाच्या
सदस्यांनी यावेळी सरकारनं विचार करावा यासाठी अनेक सूचना केल्या. रिझर्व बँकेच्या केंद्रीय
मंडळाची ही ५८७वी बैठक होती. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी
बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास होते. सद्य स्थितीमध्ये देशाची आर्थिक स्थिती, जागतिक
तसंच स्थानिक आव्हानं आणि बँकांमध्ये तक्रारी दूर करण्याच्या यंत्रणेला बळकट करण्यासह
रिझर्व बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध
विषयांची समीक्षा या बैठकीत करण्यात आली.
****
राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातलं दूधसंकलन वाढवून राज्यातल्या
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय
विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिल्या आहेत. ते आज मुंबईत या संदर्भात आयोजित एका
बैठकीत बोलत होते. `मदर डेअरीनं` नागपूर इथं पाच लाख लिटर दूध संकलन करून त्याद्वारे
दूधाची विविध उत्पादनं तयार करावीत आणि यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असं त्यांनी
यावेळी सांगितलं. राज्यात विविध प्रकारचे दूध उत्पादन होते. त्याविषयी माहिती घेण्यात
येईल. राज्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात
येणार असल्याचं केदार यांनी यावेळी सांगितलं.
****
गाव विकासासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मोठा
निधी मिळत असुन त्याचा उपयोग पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकासकामांसाठी करावा असं
आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर इथं आर.
आर. पाटील सुंदर ग्राम योजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळ्यात
बोलत होते. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना चाळीस
लाख रुपये तर तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाख रुपयांचं पारितोषिक
दिलं जातं.
****
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत
नेते आर. आर. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमीत्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना
अभिवादन केलं आहे. आबा म्हणजेच आर. पाटील यांनी राज्यात डान्सबार बंदी तसंच गुटखाबंदीसारख्या
निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी केली, भ्रष्टाचारमुक्त पोलिस भरतीच्या माध्यमातून ग्रामीण
युवकांना पोलिस दलाची दारं खुली केली, त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांसाठी ते राज्यातल्या
जनतेच्या कायम स्मरणात राहतील असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशात आतापर्यंत ८७ लाख २० हजार ८२२ लोकांना कोरोना विषाणू संसर्ग
प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. दरम्यान, या संसर्गातून रूग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक
३२ शतांश टक्के झाला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत देशात कोरोना विषाणू
संसर्गाचे नऊ हजार १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात अकरा हजार ८०५ रूग्ण या आजाराच्या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
सध्या देशात एक लाख ३६ हजार ८७२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क कार्यालयातर्फे आज
जालना इथं कोरोना विषाणू संसर्ग लसीकरणाबाबत लोककला पथकांच्या माध्यमातुन फिरत्या रथातून
जनजागृती अभियानाची सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. हे पथक पुढील दहा दिवस जिल्ह्यात अभियान राबवणार आहे.
****
मागिल पंधरा दिवसांपासून अकोला जिल्ह्यात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपासुन ते २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी
लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार
जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात आता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र
जमता येणार नाही. यामुळे मिरवणूक आणि फेरी काढण्यास प्रतिबंध घालण्यात आले असुन शाळा
आणि महाविद्यालयं पुन्हा बंद होणार आहेत तर धार्मिक संस्था आणि प्रार्थना स्थळांवर
पोलिसांचं लक्ष असणार आहे.
****
हिंदू विचारधारा ही भारताच्या लोकशाहिचा मूलाधार आहे, असं विधानसभेतले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज साप्ताहिक विवेकचे माजी संपादक
रमेश पतंगे यांच्या अमृतमहोत्सानिमीत्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सध्या
अनेक मार्गांनी देशाची लोकशाही कमकुवत करायचे प्रयत्न होत आहेत, मात्र आपली विचारधाराच
यातनं मार्ग दाखवत असते असं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर
३१७ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी आवश्यक ४८१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा
डाव १६४ धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलनं पाच, रविचंद्रन अश्विननं तीन
तर कुलदीप यादवनं दोन गडी बाद केले. इंग्लंडकडून मोईन अलीनं सर्वाधिक ४३ तर कर्णधार
जो रूटनं ३३ धावा केल्या. सामन्यात सुरेख अष्टपैलू कामगिरी बजावणारा अश्र्विन सर्वोत्कृष्ट
खेळाडू ठरला. या विजयाबरोबरचं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक
- एक अशी बरोबरी केली आहे. मालिकेतला तिसरा सामना येत्या २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद
इथं खेळला जाणार आहे.
****
पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेता परभणी जिल्ह्यातल्या
पालम शहरात १७ कोटी २८ लक्ष रुपयांची स्वच्छ
पाणीपुरवठा योजना राबवली जाणार असल्याची माहिती परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक
यांनी आज दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पालम शहर पाणीपुरवठा
योजनेच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पालम तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आपण
कटिबद्ध असून येणाऱ्या काळात नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर
आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी खासदार सुरेश जाधव,
माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, भरत घनदाट, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, नगर पंचायत प्रशासक
सुधीर पाटील, मुख्याधिकारी संतोष लोंमटे कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
परभणी महापालिकेसह अन्य शासकीय यंत्रणा दिव्यांगांच्या विविध मागण्यां
संदर्भात सातत्यानं उदासीनतेचं धोरण अवलंबत असल्याच्या निषेधार्थ संतप्त दिव्यांगानी
आज सकाळपासुन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरू केलं आहे. या संदर्भात
कृती होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलु तालुक्याच्या २१ गावांना अद्यापपर्यंत
अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्यामुळं सेलु उपविभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू
आहे. सेलु तालुक्यातल्या पाच महसुल मंडळांपैकी चार मंडळांतल्या शेतीचं अतिवृष्टीनं
नुकसान झालं आहे. तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडं लेखी आणि
तोंडी निवेदनं देऊनही प्रशासनानं कार्यवाही केली नसल्यामुळं हे आंदोलन करत असल्याचं
आंदोलकांनी म्हटलं आहे.
****
मुंबई - पुणे दृतगती मार्गावर आज पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरनं
चार वाहनांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर पाच जखमी झाले आहेत.
ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय
अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे.
अपघातातल्या दोन जखमींना पनवेलला तर तिघांना वाशीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment