Wednesday, 17 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** दूरसंचार क्षेत्रातल्या उत्पादनांशी निगडित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

** ग्रेटा थनबर्ग टूल किट प्रकरणातील आरोपी निकिता जेकबला अंतरिम जामीन मंजूर

** इंधन दरवाढीच्या विरोधात लातूर इथं शहर युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

आणि

** जालना जिल्ह्यात आज ६६ नवे कोविडग्रस्त; कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

****

दूरसंचार क्षेत्रातल्या उत्पादनांशी निगडित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी एकशे २१ अब्ज ९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, या योजनेमुळे ४० हजारावर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती प्रसाद यांनी दिली.

 

किशोरवयीन न्याय देखभाल तसंच बाल संरक्षण कायद्यात सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सुधारणेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रत्येक जिल्ह्यात किशोर न्याय देखभाल कायद्यान्वये कार्यरत संस्थांवर देखरेख ठेवता येणार आहे.  

****

ग्रेटा थनबर्ग टूल किट प्रकरणातील आरोपी निकिता जेकबला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजारांच्या जात मुचलक्यावर तीन आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर, दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाले, त्यानंतर निकिताने अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निकिता जेकबला या मुदतीत अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

याच प्रकरणात बीडच्या शंतनू मुळूक याला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने काल अंतरिम जामीन दिला आहे.

****

नवा भारत हा मातृशक्तीचा- भगिनीशक्तीचा असेल, असा विश्वास राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी वर्तवला आहे. ते आज मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी विद्यापीठाचा ७० वा दीक्षांत समारंभात दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संबोधित करत होते. आपल्या उपस्थित झालेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात सुवर्णपदकं पटकावण्यात मुली आघाडीवर असल्याचं निरीक्षण कुलपतींनी नोंदवलं. शिक्षण फक्त अर्थार्जनापुरतं न राहता ते मूल्यांवर आधारित असावं, असंही कोश्यारी यांनी नमूद केलं. या दीक्षांत समारोहात विविध विद्या शाखांमधल्या १६ हजार ४८३ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका तसंच आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. ७३ सुवर्ण पदकं तसंच २१८ पारितोषिकंही यावेळी प्रदान करण्यात आली.

****

भिवंडी इथल्या जिलानी इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यात येईल.

या दुर्घटनेत ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना एकूण १ कोटी १४ चौदा लाख रुपये निधी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरीत होणार आहे.

****

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या रेबीज मुक्त अभियान २०२५ या उपक्रमास राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असून संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी म्हटलं आहे. जीव - जंतु कल्याण दिन २०२१ निमित्त आज मंत्रालय परिसरात रेबीज मुक्ती अभियानाचा शुभारंभ केदार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष विधीज्ञ दगडू लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. केदार यांच्या उपस्थितीत यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात श्वानाला रेबीज लसीकरण करण्यात आलं. संस्थेचे अध्यक्ष दगडू लोंढे यांनी यावेळी बोलताना, देशात वर्षाला ३० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होत असल्याची माहिती दिली. हे थांबवण्यासाठी संस्थेने २०२५ पर्यंत राज्य रेबीज मुक्त करण्याचा संकल्प केला असल्याचं लोंढे यांनी सांगितलं.

****

इंधन दरवाढीच्या विरोधात आज लातूर इथं शहर युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर नियंत्रित केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. केंद्र सरकारने दिलेले अच्छे दिन शोधण्यासाठी युवक काँग्रेसने उपहास म्हणून, दुर्बिणीद्वारे अच्छे दिन शोधमोहीमही राबवली. काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात ६६ नवीन कोविडग्रस्त आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १४ हजार २५३  झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार ६१५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या कोविड बाधित असलेल्या २६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात आज नव्याने ७ कोविडबाधित आढळले आहेत. तर दोन जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ८३५ झाली असून, यापैकी ३ हजार ७१९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नागरिकांनी कोविडविषयीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत. नागरिकांनी देखील सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, गाफीलपणा दाखवू नये, मास्कशिवाय घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर राखावे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर पावले उचलावीत, नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

****

कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईतल्या कूपर रुग्णालयातल्या भूलतज्ज्ञ प्राध्यापक डॉ नयना दळवी यांनी काल कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. ही लस सर्वांनी घेण्याचं आवाहन डॉ दळवी यांनी केलं आहे.

१६ जानेवारीला कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. या पहिल्या डोसनंतर मला काहीही त्रास झाला नाही. महिना भरात आम्हाला त्याचे कुठलेही दुष्परिणाम जाणवले नाही. आज आम्ही दुसरा डोस घेतला आहे. आम्ही आमच कर्तव्य पार पाडले आहे. माझी सामान्य जनतेला हीच विनंती आहे कि त्यांनी सुध्दा जाऊन लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. कसलीही भीती मनात न बाळगता त्यांनी आपले लसीकरण पुर्ण करावे. लसीकरण जास्तीत जास्त होणं गरजेच आहे. तरच आपण कोरोनावर मात करु शकतो.

****

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्या वतीने कोव्हिड -19 लसीकण तसंच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबवण्यात येत आहे. आज हिंगोली इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या उपस्थितीत या अभियानाला प्रारंभ झाला. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये बीडचे शाहीर विठ्ठल काटे आणि संचाकडून गीत तसंच नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. पुढचे दहा दिवस जिल्ह्यात हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत तसंच औंढा नाथनाथ या तालुक्यात हा चित्ररथ फिरणार आहे.

****

लातूर जिल्हा परिषदेतले जे कर्मचारी पालकांचा सांभाळ करत नाहीत, असे कर्मचारी आणि त्यांचे पालक यांची आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी बैठक घेऊन समुपदेशन केलं. यासंदर्भात १३ पालकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी तीन तक्रारी निकाली काढल्या असून, उर्वरित प्रकरणी कर्मचारी आणि पालकांमध्ये समेट घडवून आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं, केंद्रे यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आतापर्यंत १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांचाही समावेश आहे

****

माजी मंत्री दिवंगत आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत उस्मानबाद जिल्ह्याचे २०१९-२० चे तालुका तसंच जिल्हास्तरीय पुरस्कार आज जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गोपाळवाडी, काटी, जेवळी, तुरोरी, हसेगाव, बागलवाडी, पारा, जवळा, आदी गावांना आर. आर. पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

****

इंग्लंडसोबत सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाला. शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. विजय हजारे चषक स्पर्धेसाठी शार्दुलला वगळल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सांगितलं आहे. २४ फेब्रुवारी आणि ४ मार्चला नियोजित दोन्ही कसोटी सामने अहमदाबाद इथं होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद इथंच पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार असून, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात खेळवली जाणार आहे.

****///****

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...