Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15
February 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
सर्वोच्च
न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं आज सकाळी साडे नऊ वाजता पुण्यात निधन
झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. प्रारंभी मुंबई
आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर १९७३ मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे
न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर १९८९ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
झाले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी
आपल्या कारकिर्दीत दिले. १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची भारतीय वृत्तपत्र
परिषद-प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया वर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जागतिक वृत्तपत्र
परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. राजकीय आणि सामाजिक कार्यातही
न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते. देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक
होते. २००२ मधल्या गुजरात दंगल प्रकरणी नियुक्त न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर
चौकशी समितीचे ते सदस्य होते तर २००३ मध्ये तत्कालीन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील,
सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी
करणाऱ्या समितीचे ते प्रमुख होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी पुण्यात बाणेरमध्ये
अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
ग्राहकांची
वैयक्तिक माहिती फेसबुकला पुरवण्यासंदर्भात आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी
करताना सर्वोच्च न्यायालयानं आज व्हॉट्सॲपला नोटीस बजावली आहे. येत्या ४ आठवड्यात न्यायालयानं
व्हॉट्सॲपला उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.
****
जळगाव
जिल्ह्यात यावल तालुक्यातल्या अपघातात १५ मजुरांच्या झालेल्या मृत्यु बद्दल राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी
झालेले मजूर लवकर बरे होवोत अशी कामना ही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल
मध्यरात्रीच्या सुमारास यावल तालुक्याच्या किनगावजवळ आयशर वाहन उलटून झालेल्या या अपघातात
रावेर तालुक्यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये आभोडा गावातल्या एकाच कुटुंबातल्या
११ जणांचा समावेश आहे. या ११ जणात ६ महिला तर २ लहान बालकं आहेत. या वाहनात एकूण २१
मजूर होते. अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैंकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गेल्या
२४ तासांत देशभरात २१ हजारांहून अधिक लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. ९ हजारांहून अधिक लोक गेल्या २४ तासांत या आजारातून
बरे होऊन घरी परतले आहेत. आता पर्यंत देशभरात २० कोटी ६७ लाख जणांची कोविड चाचणी करण्यात
आली असून गेल्या २४ तासांत ८६ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान
संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.
****
मित्र
आणि भागीदार देशांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस पुरवण्याच्या व्हॅक्सिन मैत्री अभियानामुळं
भारताची जगभरात स्तुती होत आहे. लस पुरवण्याच्या जागतिक स्पर्धेत भारत हा सर्वांत पुढं
असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या एरिक बेलमन यांनी सांगितलं. भारतानं त्यांच्या लसीकरण
मोहिमेत कोणताही अडथळा किंवा कमतरता येऊ न देता, देशातल्या जनतेला दिल्या त्यापेक्षा
तिप्पट प्रमाणात लसी निर्यात केल्या असल्याचं बेलमन म्हणाले. बेलमन आणि यारास्लाव ट्रोफीमोव्ह
यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये याबाबत एक लेख लिहिला असून त्यात भारताला लस महाशक्ती
असं संबोधण्यात आलं आहे.
****
चेन्नई
इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी विराट कोहली
आणि रविचंद्रन अश्विननं संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला आहे. शेवटचं वृत्त हाती
आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात सहा बाद १८३ धावा झाल्या होत्या. विराट कोहली ५५
तर रविचंद्रन अश्विन ४४ धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा २६, शुभमन गिल १४, रहाणे १०,
ऋषभ पंत आठ तर चेतेश्वर पुजारा आणि अक्षर पटेल प्रत्येकी सात धावा काढून बाद झाले.
इंग्लंडकडून जॅक लिचनं तीन तर मोईन अलीनं दोन गडी बाद केले. भारतानं एकूण ३७८ धावांची
आघाडी घेतली आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात पोलीस आणि भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स तुकडीच्या
जवानांनी काल तपास नाक्यावर दोन दहशतवाद्यांना अटक केली. हे दहशतवादी लष्करे तोयबा
आणि तेहरिक उल मुजाहिदीन या संघटनांचे सदस्य आहेत.
****
No comments:
Post a Comment